Jammu-Kashmir Lok Sabha Election 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला आहे. उत्तर प्रदेशसह अनेक भाजपाप्रणित राज्यांमध्ये एनडीए आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मात्र, कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत मोठा बदल पाहायला मिळाला आहे. जम्मू-काश्मीरमधील महत्त्वाच्या नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. जम्मू-काश्मीर खोऱ्यातील महत्त्वाच्या जागांपैकी एक असलेल्या बारामुल्लामध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. अपक्ष उमेदवार आणि लांगेट मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेले अब्दुल राशिद शेख (इंजिनिअर राशिद) यांनी जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. ओमर अब्दुल्ला यांनी स्वतः आपला पराभव मान्य करत राशिद शेख यांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा : Lok Sabha Election Results Live Updates : पंतप्रधान मोदी दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयात दाखल, संबोधित करण्याची शक्यता

ओमर अब्दुल्ला यांनी अधिकृत निवडणूक निकाल जाहीर होण्यापूर्वीच ‘एक्स’वरील एका पोस्टमधून आपला पराभव मान्य केला आणि म्हटले, “मला वाटते की पराभव स्वीकारण्याची वेळ आली आहे. उत्तर काश्मीरमधील विजयाबद्दल इंजिनिअर राशिद यांचे अभिनंदन. राशिद इंजिनिअर यांच्या विजयाने त्यांची तुरुंगातून लवकर सुटका होईल असे मला वाटत नाही. उत्तर काश्मीरमधील जनतेला अपेक्षित असलेले प्रतिनिधित्वदेखील मिळणार नाही, पण हा मतदारांचा निर्णय आहे.” शेख अब्दुल राशिद कोण आहेत? या अपक्ष उमेदवाराने तुरुंगातून निवडणूक कशी लढवली? विजयाचे कारण काय? याबद्दल जाणून घेऊ या.

कोण आहेत इंजिनिअर राशिद?

शेख अब्दुल राशिद यांना इंजिनिअर राशिद या नावानेदेखील ओळखले जाते. त्यांनी २००८ मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी बांधकाम अभियंता म्हणून नोकरी सोडल्यानंतर राजकारणात पदार्पण केले. त्यानंतर हंदवारा येथील लांगेट मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. लांगेट विधानसभा मतदारसंघातून ते दोनवेळा विजयी झाले.

शेख अब्दुल राशिद यांना इंजिनिअर राशिद या नावानेदेखील ओळखले जाते. (छायाचित्र-फायनान्शियल एक्सप्रेस)

त्यानंतर राशिद यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक बारामुल्ला मतदारसंघातून लढवली, परंतु एनसीच्या मोहम्मद अकबर लोन यांच्याकडून सुमारे ३० हजार मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला. त्याच वर्षी, राशिद शेख यांना खोऱ्यात फुटीरतावादी कारवाया घडवून आणल्याबद्दल आणि टेरर फंडिंगशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात कायद्याच्या विविध कलमांखाली राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) अटक करण्यात आली. दिल्लीतील राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयात हे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे.

जवळपास पाच वर्षे तिहार तुरुंगात असूनही, राशिद यांनी जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि जम्मू आणि काश्मीर पीपल्स कॉन्फरन्स (जेकेपीसी) प्रमुख सज्जाद गनी लोन यांसारख्या राजकीय दिग्गजांच्या विरोधात निवडणूक लढवली. उल्लेखनीय म्हणजे, श्रीनगर आणि अनंतनाग-राजौरी विभागांव्यतिरिक्त बारामुल्ला ही काश्मीरमधील अशी जागा आहे, जिथे भाजपाने या लोकसभा निवडणुकीत कोणताही उमेदवार उभा केला नव्हता.

तुरुंगात असूनही राशिद शेख यांनी निवडणूक कशी जिंकली?

राशिद यांच्या अनुपस्थितीत त्यांचा २३ वर्षीय मुलगा अबरार आणि २१ वर्षीय मुलगा असरार यांनी खोऱ्यातील मोहिमेचे नेतृत्व केले. “मी काही राजकारणी नाही, मी एम.एससीचा विद्यार्थी आहे. माझ्या वडिलांनी मला नेहमीच राजकारणापासून दूर ठेवले, पण आता ते तुरुंगात असल्याने त्यांच्यासाठी आम्ही या मोहिमेत उतरलो आहोत,” असे अबरारने ‘द प्रिंट’ला सांगितले होते.

राशिद शेख यांची प्रचारसभा (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : सत्ताधारी ‘आप’ला पंजाबमध्ये फटका; भाजपा शून्य तर काँग्रेसला ‘इतक्या’ जागांवर आघाडी

राशिद शेख यांच्या प्रचारसभेसाठी सर्व जिल्ह्यांतील तरुण एकत्र आले होते. “आम्ही या लोकांना पैसे दिले नाहीत. इंधन किंवा वाहनांची सोय केली नाही. पोस्टर्स लावले नाहीत. हे सर्व लोक स्वतःहून आले आहेत. लोक या मोहिमेचे नेतृत्व करत आहेत,” असे अबरारने सांगितले होते. ‘द प्रिंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, राशिद शेख यांच्या समर्थकांनी त्यांच्या पगाराचा काही भाग इंधन, पोस्टर छपाई आणि अल्पोपाहारासाठी दिला. टॅक्सी आणि ट्रॅक्टरचालकांनी राशिद यांच्या प्रचारसभेसाठी त्यांची वाहनेदेखील देऊ केली होती. “राशिद साहेब विधानसभेत एकटे होते, पण त्यांनी काश्मीरसाठी, आमच्यासाठी, आमच्या प्रतिष्ठेसाठी आवाज उठवला म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी आहोत, असे राशिद यांच्या प्रचारसभेत सहभागी झालेल्या तरुणाने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले होते.