पुरीतील बहुप्रतीक्षित जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात झाली आहे. या वर्षी यात्रेला तब्बल ३० लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहतील, अशी शक्यता आहे. मात्र, जगन्नाथ रथयात्रेतील रथ ओढण्यास उशीर झाल्याने आणि गर्दी व्यवस्थापनामुळे भाजपा सरकार अडचणीत आले आहे. पुरीमधील वार्षिक रथयात्रेदरम्यान गर्दी व्यवस्थापनातील त्रुटींमुळे भाजपा सरकारवर विरोधक टीका करताना दिसत आहे. रविवारी पहाटे ४ वाजता गुंडीचा मंदिरासमोर भगवान जगन्नाथाच्या नंदीघोष रथाजवळ गर्दीत चेंगराचेंगरी झाली. यादरम्यान तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे.

जग्गनाथ रथयात्रेवरून वाद

शुक्रवारी जगन्नाथ रथयात्रेतील सर्व विधी वेळेवर पार पाडल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. जगन्नाथ मंदिरापासून गुंडीचा मंदिराचे अंतर सुमारे तीन किलोमीटर आहे. मात्र, रथयात्रेतील तीन रथ अंतराच्या अर्ध्या अंतरावरही ओढता आले नाहीत, असे विरोधकांचे म्हणणे आहे. भगवान जगन्नाथाचा रथ धार्मिक पद्धतीने फक्त काही मीटर पुढे सरकला, असे त्यांचे म्हणणे आहे. ओडिशाचे मंत्री पृथ्वीराज हरिचंदन म्हणाले की, भाविकांची गर्दी आणि भगवान बलभद्रांचा रथ ओढत असताना काही कारणास्तव अडकल्यामुळे रथ ओढण्यात विलंब झाला आहे. अधिकाऱ्यांनी मान्य केले की, भाविकांची गर्दी वाढल्याने व्यवस्थापनात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

जगन्नाथ रथयात्रेतील रथ ओढण्यास उशीर झाल्याने आणि गर्दी व्यवस्थापनामुळे भाजपा सरकार अडचणीत आले आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

उच्च आर्द्रता आणि वाढती गर्दी यांमुळे २०० हून अधिक भाविक आजारी पडले. त्यातील बहुतेकांना ग्रँड रोडजवळील प्रथमोपचार केंद्रांमध्ये आणि पुरीमधील विविध रुग्णालयांमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर सोडण्यात आले आहे. रुग्णालये आणि प्रथमोपचार केंद्रांमध्ये त्यांच्यावर किरकोळ दुखापत, उलट्या व बेशुद्धी या त्रासांवरून उपचार करण्यात आले आहेत. या संदर्भात एका अधिकाऱ्याने, त्यात कोणालाही जीवितहानी, मोठ्या दुखापती झाल्या नाहीत किंवा त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्याची आवश्यकता भासली नाही, अशी माहिती दिली.

विरोधी पक्षांनी राज्यातील भाजपा सरकारवर हल्ला चढवला आहे. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जास्त कॉर्डन पास दिल्याचा आरोप विरोधकांनी केला; ज्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते नवीन पटनायक म्हणाले, “नंदीघोष रथ ओढण्यास झालेल्या विलंबाबद्दल प्रशासनाकडे बोट दाखवण्याचा किंवा त्यांना दोष देण्याचा आमचा हेतू नाही. परंतु, परिस्थिती कशी घडली याबद्दल त्यांनी चिंता आणि दुःख व्यक्त न करणे हे न पटणारे आहे.”

त्यांनी आपल्या ‘एक्स’वर लिहिले, “गेल्या वर्षी, आडपा बिजे पहाडीदरम्यान भगवान बलभद्राची मूर्ती कशी घसरली, हे विसरणे कठीण आहे. या घटनेने असंख्य भक्तांना हादरवून टाकले होते. आता या वर्षी आम्ही संध्याकाळी ७.४५ वाजेपर्यंत सिंहद्वारावर नंदीघोष रथ उभा असल्याचे पाहिले. हा रथ केवळ काही दिवस संपण्यापूर्वी काही मीटर पुढे सरकला.” पटनायक पुढे म्हणाले की, या विलंबामुळे भाविक निराश झाले आहेत. आपण फक्त प्रार्थना करू शकतो. महाप्रभू जगन्नाथ या वर्षी या दिव्य उत्सवात घडलेल्या भयानक गोंधळासाठी जबाबदार असलेल्या सर्वांना क्षमा करोत. सरकारमधील सर्वांनी याबाबत आत्मपरीक्षण करावे,” असे त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. काँग्रेसने गैरव्यवस्थापनासाठी राज्य सरकारवरही निशाणा साधला. ओडिशाचे कायदा मंत्री म्हणाले की, सर्व काही परमेश्वराच्या इच्छेनुसार घडते म्हणून या मुद्द्यावर कोणतेही राजकारण होऊ नये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी

ओडिशातील पुरी येथे जगन्नाथ रथयात्रेदरम्यान रविवारी सकाळी गुंडीचा मंदिराबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. भगवान जगन्नाथाच्या नंदीघोष रथाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी जमली असताना पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. तिघांचे मृतदेह पुरी मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या मते, गुंडीचा मंदिरासमोर जमलेल्या भाविकांच्या अनियंत्रित गर्दीमुळे हा अपघात झाला. दरम्यान, धार्मिक साहित्य घेऊन जाणारे एक वाहन गर्दीत घुसले आणि त्यामुळे भाविकांमध्ये भीती निर्माण झाल्यामुळे धावपळ सुरू झाली. त्यामुळे खाली पडून चिरडल्यामुळे अनेक लोक जखमी झाले.