रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षवाढीसाठी अंतर्गत चढाओढ पुन्हा सुरू झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसू लागले आहे. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांची आमदार म्हणून निवड झाल्यानंतर भाजपने रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्हा “भाजपमय” करण्याचा निर्धार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे महायुतीतील दोन प्रमुख घटक पक्षांमध्ये भविष्यात संघर्ष उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपाची ताकद कोकणात वाढविण्यासाठी मंत्री तथा आमदार नीतेश राणे यांनी गेल्या काही वर्षांत मोठा प्रयत्न केला होता. संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांची बांधणी, विरोधी पक्षातील नेत्यांना पक्षात आणणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाव निर्माण करण्याचे प्रयत्न त्यांनी सातत्याने केले. त्याचा काही प्रमाणात भाजपाला फायदा झाल्याचेही दिसून आले होते.
दुसरीकडे, रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढविण्यासाठी मंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि राज्य मंत्री योगेश कदम यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. ठाकरे गटातील अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शिंदे गटात आणण्यात त्यांना मोठे यश मिळाले. माजी आमदार राजन साळवी यांच्यासह अनेक प्रभावी नेत्यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केल्याने जिल्ह्यात शिंदे गटाचे वर्चस्व अधिक मजबूत झाले होते.
याच काळात राबविण्यात आलेल्या “टायगर मिशन” मोहिमेमुळे शिंदे गटाला संघटनात्मक फायदा झाला. मात्र, मनसेचे वैभव खेडेकर आणि राष्ट्रवादीचे प्रशांत यादव यांसारख्या काही प्रभावी नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश न करता भाजपात जाणे पसंत केले. या घडामोडींमुळे भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत मतभेद प्रथमच उघडपणे समोर येऊ लागल्याचे बोलले जात होते.
आता प्रमोद जठार यांच्या आमदारकीनंतर भाजपाने जिल्ह्यात नवी रणनीती आखल्याचे दिसत आहे. भाजपाला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वतंत्र ताकद उभी करायची असून, शिंदे गटाचे वाढते वर्चस्व मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. विशेषतः उदय सामंत यांच्या प्रभावाला राजकीय आव्हान देण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
नुकत्याच झालेल्या रत्नागिरी दौऱ्यात आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाला तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. राज्यात महायुतीचे सरकार असले तरी जिल्ह्यात भाजप अधिक मजबूत करण्यासाठी “जे काही करावे लागेल ते करू” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
सध्या तरी दोन्ही पक्षातील नेते उघडपणे संघर्ष टाळताना दिसत असले, तरी स्थानिक पातळीवरील राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. भाजपाची आक्रमक संघटनात्मक भूमिका आणि शिंदे गटाचे विद्यमान वर्चस्व यामध्ये भविष्यात थेट संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मंत्री नीतेश राणे आणि आमदार प्रमोद जठार यांच्या सक्रियतेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची चिन्हे आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि भविष्यातील विधानसभा समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटातील ही अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. आता शिवसेना शिंदे गट या नव्या राजकीय आव्हानाला कशा पद्धतीने उत्तर देतो आणि महायुतीतील अंतर्गत समतोल कसा राखला जातो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
