पुणे : राज्यात आगामी तीन वर्षांत कोणत्याही निवडणुका नसल्या, तरी पुण्यात भाजपला रोखण्यासाठी शिवसेना (शिंदे) पक्षाने माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी आवश्यक ती कुमक पुरविण्याची व्यूहरचना आखली आहे. महापालिका निवडणुकीत अपयश आल्याने आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच पक्षाची पुनर्बांधणी करताना माजी आमदार धंगेकर यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. पक्षाची शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून, नवीन कार्यकारिणीमध्ये धंगेकर समर्थकांना संधी देऊन भाजपशी टक्कर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

शिवसेनेची पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कार्यकारिणी तीन एप्रिल रोजी स्थगित करण्यात आली. सध्याच्या कार्यकारिणीतील पदाधिकारी हे प्रभारी म्हणून काम पहात आहेत. महिनाभरात संघटनेच्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर चांगले काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदांवर कायम ठेवण्यात येणार असून, काम न करणाऱ्यांना पदावरून दूर करून नवे पदाधिकारी नियुक्त केले जाणार आहेत.

शिवसेना (शिंदे) पक्षाने पुणे शहरात भाजपपुढे आव्हान उभे करण्यासाठी पक्षांतर्गत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गेल्या रविवारी खासदार श्रीकांत शिंदे, पुण्याचे संपर्क प्रमुख, उद्योग मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, आमदार शरद सोनवणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत आगामी काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे ठरविण्यात आले. सदस्य नोंदणी, नवीन शाखा सुरू करणे, मतदारयादीत मतदारांची नावे आहेत का, हे तपासून पक्षवाढीसाठी प्रयत्न करणे यावर चर्चा करण्यात आली. आगामी तीन वर्षे निवडणुका नसल्याने या काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यासाठी आराखडा तयार केला जाणार आहे.

पुण्यात भाजपची ताकद असल्याने भाजपशी टक्कर देण्यासाठी शिवसेनेने माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठिशी कुमक ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी माजी आमदार धंगेकर यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. नवीन कार्यकारिणी तयार करताना धंगेकर यांच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार धंगेकर यांनी जैन बोर्डिंग प्रकरण, अमली पदार्थ तस्करी प्रकरण, कल्याणीनगरमधील पोर्शे अपघात प्रकरण, कोथरुडमधील गुन्हेगारी टोळ्या आदी विषयांवरून भाजपला लक्ष्य केले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जाहीर टीका केली. पुणे महापालिकेचे सभागृहनेते गणेश बीडकर हे त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असून, त्यांच्यावर आरोप केले. त्यामुळे शिवसेना (शिंदे) पक्षाची शहराभर चर्चा झाली. मात्र, महापालिकेत अपेक्षित यश मिळू शकले नाही. आता आगामी काळात पक्षाची नवीन कार्यकारिणी अंतिम करताना माजी आमदार धंगेकर यांच्याशी विचारविनिमय केला जाणार आहे.

लवकरच पक्षप्रवेशाला सुरुवात

पक्ष बांधणीसाठी शिवसेना (शिंदे) पक्षाने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पुणे कॅन्टोन्मेंट आणि वडगाव शेरी विधानसभा मतदार संघांतील अन्य पक्षांतील पदाधिकारी हे शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यादृष्टीने तयारी करण्यात आल्याचे एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.