पुणे: भाजप-शिवसेना (शिंदे) युतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत शिवसेना (शिंदे) पक्षाचे महानगरप्रमुख, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवून ते आमच्या खिसगणतीत नसल्याचे दाखविणाऱ्या भाजपला धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’बराेबर आघाडी करण्यासाठी पवार यांची भेट घेऊन केलेल्या राजकीय खेळीने भाजप कोंडीत सापडली आहे. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ‘हू इज धंगेकर?’ असा प्रश्न विचारून त्यांना कमी लेखल्यावर धंगेकरांनी विजय साकारून उत्तर दिले. आता महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपापासून दूर असलेले धंगेकर यांनी शेवटच्या काही तासांमध्ये केलेल्या डावपेचांमुळे भाजपवर ‘व्हेअर इज धंगेकर?’ अशी विचारण्याची वेळ आली.
भाजप आणि धंगेकर यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे धंगेकर यांना महापालिका निवडणुकीत भाजप नेत्यांच्या सूचनेमुळे जागा वाटपाच्या चर्चेपासून दूर ठेवण्यात आले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार विजय शिवतारे यांच्याकडे याबाबतची जबाबदारी सोपविण्यात आली. शिवतारे आणि शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्यात झालेल्या वादानंतरही धंगेकर हे जागा वाटपाच्या चर्चेपासून दूर राहिले. भाजपबरोबर जागा वाटपाच्या वाटाघाटी करताना शिवसेना शिंदे गटाचे नेते हे धंगेकर यांच्याशी चर्चा करत होते. त्यामुळे पडद्यामागून धंगेकर हेच होते. मात्र, भाजपने त्यांचा मुलगा प्रणव धंगेकर यांना उमेदवारी देण्यास नकार दिल्यानंतर डिवचले गेलेल्या धंगेकर यांनी डावपेच सुरू केले. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाबरोबर आघाडी करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू केल्याने भाजपवर धंगेकर यापुढे कोणती खेळी खेळणार, याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे.
कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूक लढणाऱ्या धंगेकर यांचा पराभव करण्यासाठी भाजपने फौज मैदानात उतरवली होती. प्रचारसभा, कोपरा सभा घेतल्या. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील मैदानात उतरले. त्या वेळी चंद्रकांत पाटल यांनी प्रचार सभेत धंगेकर यांना डिवचले. भरसभेत त्यांनी ‘हू इज धंगेकर’ असा प्रतिप्रश्न करत ते आमच्यासमोर टिकू शकत नाहीत, असे वक्तव्य केले. त्यानंतर धंगेकर यांचे समर्थक पेटून उठले. त्यानंतर धंगेकर हे कसबा या भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले. तेव्हापासून भाजप आणि धंगेकर यांच्यात वितुष्ट आहे. महापालिका निवडणुकांच्या उमेदवारी निश्चित करण्याच्या प्रक्रियेपासून धंगेकर त्यांना दूर ठेवण्यात आले. मात्र, शेवटच्या क्षणी त्यांनी केलेल्या हालचालींमुळे आता भाजपवर ‘व्हेअर इज धंगेकर?’ अशी विचारण्याची वेळ आली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून, चिरंजीव प्रणव यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी धंगेकर हे कोणत्या राजकीय चाली करणार, यावर भाजप लक्ष ठेवून आहे. त्यामुळे ‘हू इज धंगेकर?’ असा प्रश्न करून धंगेकर यांची खिल्ली उडविणाऱ्या भाजपला धंगेकरांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवावी लागत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
