पुणे : कसब्याचे माजी आमदार, शिवसेना (शिंदे) पक्षाचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी पत्नी प्रतिभा आणि चिरंजीव प्रणव या दोघांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून भाजपपुढे आव्हान उभे केले आहे. भाजपने महापालिका निवडणुकीचे प्रमुख म्हणून माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. मात्र, धंगेकर हे दरराेज टाकत असलेल्या डावपेचांमुळे बीडकर हे शहरातील अन्य उमेदवारांच्या प्रचाराला जाण्याऐवजी आपल्याच मतदार संघात अडकून पडले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आता धंगेकर यांनी बीडकर यांची डान्सबारमधील कथित ध्वनिचित्रफीत प्रसारित केल्याने दोघांमधील वाद पेटला असून, मतदान तीन दिवसांवर आले असताना धंगेकर यांना थोपवायचे कसे, या विवंचनेत भाजप पडले आहे.
पुण्याच्या राजकारणात धंगेकर आणि बीडकर हे पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. प्रभाग २४ कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल-केईएम हॉस्पिटल या मतदार संघातून बीडकर हे स्वत: निवडणुकीच्या रिंगणात आहेत. धंगेकर यांनी त्यांच्याविरोधात चिरंजीव प्रणव यांना उभे केले आहे. कुख्यात गुंड बंडू आदेकर हा अपक्ष असून, तुरुंगातून निवडणूक लढवित आहे.
या मतदार संघाच्या नावावरूनच सुरुवातीला धंगेकर आणि बीडकर यांच्यात संघर्ष झाला. या मतदार संघाच्या नावात ‘कसबा’ हा शब्द नव्हता. त्यासाठी धंगेकर यांनी हरकत घेत आक्रमक भूमिका घेतल्याने या मतदार संघाच्या नावात ‘कसबा गणपती’ हा शब्द जोडण्यात आला. प्रभागाच्या नावाची लढाई जिंकल्यानंतर आता प्रत्यक्ष लढत सुरू आहे. धंगेकरांकडून करण्यात येणाऱ्या प्रचारावर बीडकर यांना बारकाईने लक्ष ठेवावे लागत असल्याने ते सध्या प्रभागातच अडकून पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महापालिकेचा प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ-नाना पेठ, प्रभाग २४ कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल-केईएम हॉस्पिटल हे दोन्ही प्रभाग लक्षवेधी झाले आहेत. कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल-केईएम हॉस्पिटल या प्रभागात भाजपचे गणेश बीडकर, शिवसेना (शिंदे) पक्षाचे रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव आणि अपक्ष सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर हे तिघे समोरासमोर आहेत. गेल्या निवडणुकीत बीडकर आणि रवींद्र धंगेकर यांच्यात लढत झाली होती. तेव्हा धंगेकर हे काँग्रेसपुरस्कृत अपक्ष उमेदवार होते. धंगेकर यांनी बीडकर यांचा पराभव केला होता. आता बीडकर यांच्यासमोर धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव आहेत.
निवडणुकीत ऐनवेळी एखादा घोटाळा काढून चर्चा घडवून आणण्यात धंगेकर हे वाकबगार आहेत. भाजपने बीडकर यांच्यावर निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. मात्र, धंगेकर यांच्यामुळे ते आपल्याच प्रभागात अडकून पडल्याचे दिसून येते. आता धंगेकर यांनी बीडकर यांची डान्सबारमधील कथित ध्वनिचित्रफीत प्रसारित केल्याने वादाला तोंड फुटले आहे.
पत्नीला निवडून आणण्यासाठी धंगेकरांचे बेरजेचे राजकारण
मुलगा आणि पत्नी या दोघांनाही निवडून आणण्यासाठी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.पत्नीला निवडून आणण्यासाठी धंगेकर यांनी बेरजेचे राजकारण केले आहे. रविवार पेठ-नाना पेठ या प्रभागात ब जागेवर शिवसेना (शिंदे) पक्षाकडून धंगेकर यांची पत्नी प्रतिभा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’कडून दिवंगत नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर या आहेत. सोनाली यांना आयुष कोमकर याच्या खून प्रकरणात अटक झाली असून, त्या तुरुंगातून निवडणूक लढवित आहेत.
आंदेकरच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी गुंड बंडू आंदेकरची कन्या आणि आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकर या अपक्ष निवडणूक लढवित आहेत. भाजपने अनुराधा मंचे आणि शिवसेना (ठाकरे) गटाने निकिता मारटकर यांना उमेदवारी दिली आहे. धंगेकर यांनी या प्रभागात बेरोजेचे राजकारण केले आहे. आंदेकर कुटुंबातील उमदेवाराविरोधात आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक विरेंद्र किराड हे लढत देत आले आहेत. या प्रभागात काँग्रेसची एकगठ्ठा मते आहेत.
धंगेकर यांनी किराड यांची कन्या डॉ. वैष्णवी किराड यांना काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश देऊन या प्रभागातील क जागेवर उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून निवडणूक लढवित आहेत. त्या सध्या तुरुंगात आहेत. भाजपने ऋतुजा गडाळे, काँग्रेसने नीलम करपे यांना उमेदवारी दिली. काँग्रेसच्या पारंपरिक मतांची विभागणी करण्याचा धंगेकर यांचा प्रयत्न असणार आहे. त्या आधारे पत्नीला निवडून आणण्याचा धंगेकर यांचा प्रयत्न यशस्वी होणार का, याबाबात उत्सुकता असणार आहे.
