प्रल्हाद बोरसे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनतील फुटीनंतर येत्या ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत आपापल्या गटाचा स्वतंत्र दसरा मेळावा दणक्यात होण्यासाठी ठाकरे आणि शिंदे या सेनेच्या दोन्ही गटांमध्ये मोठी रस्सीखेच होणार असल्याची चिन्हे पदोपदी दिसत आहेत. शिंदे गटाच्या येथे पार पडलेल्या बैठकीच्या निमित्ताने त्याचेच प्रत्यंतर आले आहे. खरी शिवसेना कुणाची याची कसोटी लावण्यासाठी कळीचा मुद्दा ठरणाऱ्या या मेळाव्यांमधील शक्ती प्रदर्शन ही उभय गटांची नितांत गरज ठरणार आहे. त्याच अनुषंगाने आपापल्या भागातून अधिकाधिक गर्दी जमवण्याची जबाबदारी आता बंडखोर आमदारांनी आपल्या शिरावर घेतल्याचे या बैठकीतून समोर आले आहे.

दरवर्षी मुंबईतील ऐतिहासिक शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतो. परंतु शिवसेनेत बंडखोरी करत भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी राज्यात नुकतेच सत्तांतर घडवून आणले आहे. त्यानंतर सेनेच्या उध्दव ठाकरे गटावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून सातत्याने होत आहे. त्याचाच भाग म्हणून खरी शिवसेना आमचीच असा दावा करत यंदा चक्क दसरा मेळावा पळविण्याचा शिंदे गटाकडून प्रयत्न होताना दिसतो. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दसरा मेळाव्यासाठी दादरच्या शिवाजी पार्कची मागणी केली असली, तरी अद्याप मुंबई महानगरपालिकेने कोणताही निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे पर्यायी जागा म्हणून वांद्रे कुर्ला संकुलातील मैदान मिळण्यासाठी शिंदे गटाने केलेला अर्ज एमएमआरडीने मंजूर केला आहे. तर महापालिकेने अद्याप मंजुरी दिली नसली तरी शिवाजी पार्कवरच मेळावा घेण्यावर ठाकरे गट ठाम आहे.

हेही वाचा… भाजपची ‘मोदी@२०’ जनसंपर्क मोहीम गतिमान, दोन आठवड्यांमध्ये आणखी ५०० मेळाव्यांची तयारी

या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी शिवसेना शिंदे गटाची बैठक बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्या येथील संपर्क कार्यालयात पार पडली. यावेळी पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय दुसाने, तालुका प्रमुख मनोहर बच्छाव, माजी उपमहापौर नीलेश आहेर, बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील देवरे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रमोद पाटील, युवानेते अविष्कार भुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आपल्याच गटाचा दसरा मेळावा कसा जंगी होईल, यावर खल झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मालेगावचे विशेष नाते होते. त्यामुळे बाळासाहेबांच्या हयातीत तसेच त्यांच्या पश्चात दरवर्षी दसरा मेळाव्यास हजेरी लावणाऱ्या मालेगावकर शिवसैनिकांची उपस्थिती लक्षणीय असल्याचे दिसून येत असे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटणे हा शिवसैनिकांसाठी परवलीचा शब्द झाला होता. नंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याविषयीदेखील कडवट शिवसैनिकांची तशीच भावना होती. आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर मात्र शिंदे गटातर्फे आयोजित येथील बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी दसरा मेळाव्यात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, अशी मांडणी केली गेली. हा बदल ठाकरे ते शिंदे हा निष्ठेचा प्रवास भविष्यात कसे वळण घेणार आहे, हेच अधोरेखित करणारा असून शिंदे गटाचा इरादाही त्याद्वारे सूचित होत आहे. याच बैठकीत प्रत्येक गावातून निघणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या गावापासून वाजत-गाजत आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावांचा जयजयकार करत मुंबई गाठावी, असा निर्णय घेण्यात आला. तसेच शिंदे गटाशी संबंधित इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हा मेळावा दणक्यात होण्यासाठी कंबर कसण्याचा निर्धारही बैठकीत केला गेला.

हेही वाचा… जळगावमध्ये शिंदे गटाच्या आशा पल्लवीत

सेनेतील बंडखोरीनंतर ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्यात मालेगावचे दादा भुसे व शेजारच्या नांदगावमधील सुहास कांदे या आमदार द्वयींचा आणि नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा समावेश आहे. हे तिघे शिंदे गटात दाखल झाले तरी नाशिक जिल्ह्यातील शिवसेना पक्ष संघटनेतील बहुसंख्य पदाधिकारी उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री पदावर स्थानापन्न झाल्यावर ग्रामीण महाराष्ट्राचा दौरा करताना एकनाथ शिंदे यांनी सर्वप्रथम मालेगाव येथे मेळावा घेण्यास पसंती दिली होती. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या दसरा मेळाव्यात शक्तीप्रदर्शन होण्यासाठी जिल्ह्यातून अधिकाधिक कार्यकर्ते उपस्थित कसे राहतील, याची आखणी शिंदे गटातर्फे करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rebels are taking responsibility of to show strength at eknath shindes dussehra rally print politics news asj
First published on: 21-09-2022 at 18:13 IST