मुंबई : स्थानिक प्रश्नांना बगल देण्याचे काँग्रेस पक्षाचे धोरण तसेच प्रादेशिक अस्मितेची धार यातून देशात प्रादेशिक पक्षांचा उदय झाला. प्रादेशिक पक्षांना यशही मिळत गेले. अशा या प्रादेशिक पक्षांमध्ये घराणेशाहीचीच पाळेमुळे रुजली. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांची पत्नी सूनेत्रा पवार यांच्याकडे सूत्रे आल्याने आणखी एका प्रादेशिक पक्षात घराणेशाहीची पंरपरा कायम राहिली.

काँग्रेसमध्ये घराणेशाहीची परंपरा मोठी आहे. पंडित नेहरू. इंदिरा गांधी, संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी अशी मोठी यादी आहे. भाजपमध्ये राष्ट्रीय पातळीवर नेतृत्वात घराणेशाहीला अजून तरी आलेली नाही. नवे पक्षाध्यक्ष नितीन नबीन यांचे वडिल बिहारममधील भाजप नेते असले तरी त्यांच्या पश्चात त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. भाजपच्या दुसऱ्या फळीत घराणेशाही आता उघडपणे दिसू लागली आहे. तरीही काँग्रेसच्या तुलनेत भाजपमध्ये तेवढी घराणेाशाही नाही. डाव्या पक्षांमध्ये कधीच घराणेशाहीला स्थान मिळाले नाही. प्रादेशिक पक्षांमध्ये मात्र राजघराण्याच्या धर्तीवर उत्तराधिकारी नेमला जातो, असेच अनुभवास येते.

राज्यातच प्रादेशिक पक्षांचा विचार केल्यास शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पक्षाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली. शिवसेनेत आता उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हे पिता-पुत्र पक्षात धोरणात्मक निर्णय घेतात. शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर त्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हेच सारी जबाबदारी हाताळतात. मनसेत राज ठाकरे यांचे उत्तराधिकारी म्हणून पुत्र अमित ठाकरे पुढे येत आहेत. एकत्रित राष्ट्रवादीत शरद पवार यांचे पुतणे अजित पवार व कन्या सुप्रिया सुळे हेच पक्षाच्या कारभारात बारीक लक्ष घालत असत. पवारांनी सुप्रियाला राजकीय उत्तराधिकारी म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू केल्यानेच अजित पवार बिथरले होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आता पत्नी सूनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली. पुत्र पार्थ व जय पवार कोणते पद भूषवितात का, याची उत्सुकता आहे.

तमिळनाडूत द्रमुकमध्ये करुणानिधी, त्यांचे पुत्र व मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, आता त्यांचे पुत्र उपमुख्यमंत्री उदयनिधी अशी घराणेशाहीची परंपरा आहे. याशिवाय करुणानिधी यांची कन्या कानीमोझी या खासदार आहेत. दुसरे पुत्र अलगिरी हे केंद्रात मंत्री होते. पंजाबमध्ये प्रकाशसिंह बादल व सुखबिरसिंग बांदल हे पितापुत्राची जोडी होती. बांदल यांची सून खासदार आहे. हरियाणात लोकदलात देवीलाल यांच्या घरातील ओमप्रकाश चौटाला, अभय चौटाला, अजय चौटाला, दृश्यंत चौटाला हे सारे राजकारणात सक्रिय होते वा आहेत.

ओडिशामध्ये बिजू पटनायक यांच्यानंतर त्यांचे पुत्र नवीन पटनायक यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले. तेगुलू देशममध्ये एन. टी. रामाराव यांच्या विरोधात त्यांचे जावई व विद्यमान मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी बंड करून सत्ता हस्तगत केली. रामाराव यांची कन्याही खासदार आहे. चंद्राबाबूंये पुत्र नारा लोकेश हे आंध्रचे मंत्री आहेत. शेजातील तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीत के. चंद्रशेखर राव, त्यांचे पुत्र रामाराव, भाचे हरिश राव तर कन्या के. कविता यांनी विविध पदे भूषविली आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल काॅन्फरन्समध्ये शेख अब्दल्ला, डॉ. फारुक अब्दुल्ला व आता ओमर अब्दुल्ला अशा तीन पिढ्यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले. पीडीडीमध्ये मुफ्ती मोहंमद सईद व त्यांची कन्या मेहबुबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रीपद भूषवून धराणेशाहीची परंपरा कायम ठेवली. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव, राबडीदेवी, तेजस्वी यादव अशी घराणेशाहीची परंपरा आहे.

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून भाचा अभिषेक याचेच नेतृत्व पुढे करी त्याच्याकडे पक्षातील दुसरे स्थान सोपविले आहे. कर्नाटकात माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या जनता दलात मुलगा कुमारस्वामी हे केंद्रात मंत्री व माजी मुख्यमंत्री, अन्य एक पुत्र रेवण्णा हे माजी मंत्री. नातू माजी खासदार, जावई खासदार, सून आमदार अशी मोठी यादी आहे. समाजवादी पार्टीत मुलायमसिंह यादव यांचे पुत्र अखिलेश माजी मुख्यमंत्री, सून खासदार, एक भाऊ खासदार, दुसरा भाऊ माजी मंत्री अशी सारी धराणेशाही आहे. बसपा नेत्या मायावती यांनी भाच्याला आपला राजकीय उत्तराधिकारी नेमला आहे.

डाव्या पक्षांनी घराणेशाहीबद्दल कितीही नाके मुरडली तरीही केरळमध्ये मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्या मंत्रिमंडळात त्यांचे जावई मोहंमद रईस हे मंत्री आहेत.