अमरावती : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला दमदार यश मिळाले असले, तरी अमरावती विधानसभा मतदारसंघातील नव्या समीकरणांमुळे भाजप आणि काँग्रेससमोरील अडचणी वाढल्या आहेत. भाजपमधून निष्कासित माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता आणि निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवून लक्ष वेधून घेणारे आझाद समाज पार्टीचे अलीम पटेल यांनी महापालिका निवडणुकीसाठी तयारी चालवल्याने धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी येणार आहे.
अमरावतीतून महायुतीच्या उमेदवार सुलभा खोडके या निवडून आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते संजय खोडके यांची मोर्चेबांधणी यशस्वी ठरली. त्यांचा गट महापालिकेच्या राजकारणात सक्रीय आहे. दुसरीकडे, भाजपची महापालिकेवर एकहाती सत्ता होती. त्यानंतरच्या काळात बऱ्याच घडामोडी घडून गेल्या आहेत. भाजपमधील एक गट हा सुलभा खोडके यांच्या प्रचारात व्यस्त असताना युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांच्या गटाने भाजपचे बंडखोर जगदीश गुप्ता यांना पाठिंबा दिला होता. महायुतीत हा विसंवाद असूनही सुलभा खोडके यांनी चक्रव्यूह भेदून विजय संपादन केला. आता आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. त्यात महायुती एकत्रितपणे निवडणूक लढविणार की, स्वबळावर शक्ती आजमावणार, हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी विविध राजकीय गटांमध्ये संघर्ष अटळ मानला जात आहे.
हेही वाचा >>> चंद्रपूर जिल्ह्याला मिळाले दोन तरुण आमदार आणि पराभवानंतरही काही आश्वासक युवा चेहरे
जगदीश गुप्ता यांनी येत्या ४ डिसेंबरला समर्थकांच्या मेळाव्याचे आयोजन केले असून या मेळाव्यात महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची राजकीय भूमिका मांडली जाणार आहे. समर्थकांशी चर्चा करून हिंदुत्वाच्या मुद्यावर स्वतंत्रपणे निवडणूक लढायची की, हिंदुत्ववादी पक्षाला पाठिंबा द्यायचा, याविषयी निर्णय घेणार असल्याचे जगदीश गुप्ता यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नवीन समीकरणे तयार होणार आहेत. युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांचीही भूमिका यावेळी महत्वाची ठरणार आहे. नवनीत राणा या भाजपच्या नेत्या आहेत, तर रवी राणांचा युवा स्वाभिमान हा स्वतंत्र पक्ष आहे. भाजप आणि युवा स्वाभिमान एकत्रित लढल्यास जागा वाटपावरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. बडनेरामधून रवी राणांच्या विरोधात बंडखोरी करणारे भाजपचे माजी नगरसेवक तुषार भारतीय हे काय भूमिका घेतात, याकडेही अनेकांचे लक्ष आहे.
हेही वाचा >>> प्रस्थापितांनाच मतदारांची साथ, नवख्यांना नाकारले; अकोला, वाशीम जिल्ह्यात पाच आमदारांना पुन्हा संधी
दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत तब्बल ५४ हजार ६७४ मते मिळवून लक्ष वेधून घेणारे आझाद समाज पार्टीचे अलीम पटेल यांनीही महापालिकेच्या निवडणुकीची तयारी चालवली आहे. मुस्लीम आणि दलितबहुल भागावर ते लक्ष केंद्रित करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके यांचा गट पुन्हा एकदा महापालिकेच्या राजकारणात वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांचा संघर्ष हा राणा गटासोबत आहे. भाजपचे आमदार प्रवीण पोटे आणि रवी राणा यांच्या गटांमध्ये वितुष्ट दिसून आले आहे. त्याचे पडसाद महापालिकेच्या निवडणुकीतही उमटण्याची शक्यता आहे.