remaining bastion of NCP in Solapur is also on BJP`s radar | Loksatta

सोलापुरात राष्ट्रवादीचे उरले सुरले गडही भाजपच्या रडारवर

माढा आणि मोहोळची वाटचालही भाजपच्या दिशेने

सोलापुरात राष्ट्रवादीचे उरले सुरले गडही भाजपच्या रडारवर
भाजपचा बालेकिल्ला असतानाही दोन देशमुखांमधील भांडणात सोलापूरची उपेक्षा

एजाजहुसेन मुजावर

सोलापूर : दहा वर्षांपूर्वीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य गड मानल्या गेलेल्या आणि शरद पवार यांच्या पाठिशी राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यात आता माढा आणि मोहोळ हे दोनच तालुके कसेबसे शिल्लक राहिले आहेत. परंतु झपाट्याने बदलत चाललेल्या राजकीय परिस्थितीत हे दोन्ही तालुकेही भाजपच्या रडारवर आले आहेत. मोहोळचे वजनदार नेते, माजी आमदार राजन पाटील-अनगरकर हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत नाराज आहेत. ते आपल्या पुत्रांसह भाजपमध्ये दाखल होण्याच्या निर्णायक स्थितीत पोहोचले आहेत. तर दुसरीकडे माढा तालुक्यातही भाजपने लक्ष केंद्रित करून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्याची तयारी सुरू केली आहे.

मागील २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शरद पवार यांचे निष्ठावंत मानले गेलेले मोहरे एका पाठोपाठ एक पक्ष सोडून भाजप किंवा शिवसेनेत गेले. मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची अवस्था तर खूपच केविलवाणी झाली होती. माढ्याचे विद्यमान ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे व त्यांचे बंधू आमदार संजय शिंदे, पक्षाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष, माजी आमदार दीपक साळुंखे आदी बहुसंख्य मंडळी कुंपणावर बसली होती. तर माजी मंत्री दिलीप सोपल, करमाळ्याच्या रश्मी बागल, दीपक साळुंखे व इतरांनी पक्ष सोडून शिवसेनेचे शिवबंधन बांधले होते. या सर्वांना त्या वेळी राष्ट्रवादीत राहून काही हशील होणार नाही, या भीतीने पछाडले होते.

हेही वाचा नांदेडमधून भाजपचा एक तरी मंत्री व्हावा यासाठी चिखलीकरांची मोर्चेबांधणी

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पक्षाची पडझड रोखण्यासाठी याच सोलापुरातून राज्याचा दौरा सुरू केला होता. त्या वेळी झालेल्या बैठका, मेळाव्यांमध्ये मोहोळचे राजन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे ही मोजकीच मंडळी पवारांच्या पाठिशी निष्ठेने उभी राहिली होती. पुढे विधानसभा निवडणुकीत माढा आणि मोहोळ या दोनच जागा राष्ट्रवादीला राखता आल्या. एव्हाना, राज्यात राजकीय नाट्य घडले आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा सत्तेत शिरकाव झाला. परंतु जिल्ह्यात पक्षाला पुन्हा उभारी घेता आली नाही.

मोहोळचे राजन पाटील हे पूर्वी १९९५ पासून ते २००९ पर्यंत विधानसभेवर प्रतिनिधित्व करीत होते. त्यानंतर मोहोळ मतदारसंघ संघ राखीव झाला असता रमेश कदम (हे सध्या म. फुले आर्थिक विकास महामंडळातील कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणी अटकेत आहेत.) यांच्यासह माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे व आता यशवंत माने यांना विधानसभेत निवडून पाठविण्याची जबाबदारी राजन पाटील यांनी पार पाडली होती. त्या तुलनेत पक्षाने त्यांचे कोठेही पुनर्वसन न करता उपेक्षित ठेवले आहे. यात भर म्हणून की काय, त्यांच्याच मोहोळ तालुक्यातील मूळ नरखेडचे असलेले राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्याशी उघडपणे वैर घेतले. जनता दरबारच्या नावाने मोहोळ तालुक्यात गावोगावी फिरताना उमेश पाटील यांनी राजन पाटील यांना डिवचण्याचा एककलमी कार्यक्रम चालविला आहे. ही बाब पवार काका-पुतण्यांच्या कानावर घालूनही त्यांनी काणाडोळाच केला. उमेश पाटील यांचा बोलविता धनी अजित पवार मानले जातात. या साऱ्या घडामोडीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हेही जेरीला आले आहेत. मध्यंतरी साठे यांच्यावर जिल्हाध्यक्षपद सोडण्यासाठी तरुण तुर्कांनी दबाव आणला होता. शरद पवार यांनी हस्तक्षेप केल्यामुळे साठे यांचे जिल्हाध्यक्षपद शाबूत राहिले आहे. तथापि, साठे यांची राजन पाटील यांना साथसोबत असणे हे उमेश पाटील, दीपक साळुंखे आदींना सहन होत नाही. पक्षांतर्गत कुरघोड्यांच्या राजकारणात राजन पाटील व त्यांचे पुत्र विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील व अजिंक्यराणा पाटील हे वैतागले आहेत. त्यातच कोल्हापूरचे भाजपचे खासदार धनंजय महाडिक हे मोहोळ तालुक्यातील स्वतःच्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून स्थानिक राजकारणात राजन पाटील यांना शत्रूच लेखतात. दुसरीकडे राजन पाटील कुटुंबियांच्या मालकीच्या नक्षत्र डिस्टिलरी प्रकल्पात अबकारी कर चुकवेगिरीच्या झालेल्या घोटाळ्यात पाटील कुटुंबियांवर पाच वर्षांपूर्वी गुन्हा नोंदवला गेला होता. शिवाय त्यांचा लोकनेते साखर कारखाना वादग्रस्त मानला जातो. त्यामुळे खासदार धनंजय महाडिक हे पाटील कुटुंबियांच्या कारनाम्यांची फाईल आपल्याकडे तयार असल्याचे धमकावतात. अशा परिस्थितीत स्वपक्षीय आणि विरोधक या दोहोबाजूने होत असलेल्या उपद्रवामुळे राजन पाटील आणि त्यांचे पुत्र आता राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचले आहेत. भाजपला हेच अपेक्षित आहे. त्यांना पक्षात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूत पाठवत आहेत.

हेही वाचा राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरलेली विद्यापीठे राष्ट्रीय क्रमवारीत मात्र अव्वल

दुसरीकडे सलग सहावेळा विधानसभेवर निवडून गेलेले माढ्याचे आमदार आणि तब्बल पाच साखर कारखाने, बँका, शिक्षण संस्थांच्या रूपाने संस्थानिक बनलेले बबनराव शिंदे यांनाही राजकीय भवितव्याची भीती दाखवून भाजपच्या जाळ्यात खेचण्याची खेळी खेळली जात आहे. शिंदे पिता-पुत्रांविरुध्द एका कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावली होती. हे प्रकरण सध्या प्रलंबित आहे. शिंदे हे मागील २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकांच्या वेळीच भाजपमध्ये जाण्याच्या विचारात होते. नंतर गणित बिघडल्यामुळे त्यांना राष्ट्रवादीतच राहणे भाग पडल्याचे मानले जाते.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-07-2022 at 09:23 IST
Next Story
नांदेडमधून भाजपचा एक तरी मंत्री व्हावा यासाठी चिखलीकरांची मोर्चेबांधणी