गुजराती यात्रेकरूना घेऊन जाणाऱ्या बसवर २५ मे २००६ रोजी श्रीनगरच्या मुघल गार्डन येथे दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. ही बस बटपोराच्या बाजूने चालली होती. यावेळी झालेल्या ग्रेनेड स्फोटात चार पर्यटकांना जीव गमवावा लागला. ज्यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश होता तर सहा जण जखमी झाले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय गोलमेज परिषदेचा शेवटच्या दिवशी हा हल्ला करण्यात आला. परिषदेनिमित्त कडक सुरक्षा असल्याने गार्डन जवळून जाणाऱ्या बटपोरा येथून यात्रेकरूना घेऊन जाण्यात येत होते.  

मागील आठवड्यात कॉँग्रेसला रामराम ठोकणारे गुलाम नबी आझाद त्यावेळी कॉँग्रेस-पीपल्स डेमोक्रेटीक पार्टी (पीडीपी) सरकारचे मुख्यमंत्री होते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. आगामी काळात जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आझाद नवा पक्ष स्थापन करणार असल्याचे सांगितले जाते. त्याचवेळी दुसरीकडे आझाद यांचा नवा पक्ष भाजपासोबत युती करेल अशीही चर्चा आहे. मात्र या साऱ्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात आझाद यांना राज्यसभेचा सदस्य म्हणून निरोप देताना भावूक झाल्याचे पहायला मिळाले होते. त्यावेळी आझाद यांच्याही अश्रूंचा बांध फुटला.

या प्रसंगाची आठवण करून “अशिक्षित” कॉँग्रेसी विपर्यास करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आझाद म्हणाले. त्यावेळी दु:खद प्रसंगाचे स्मरण झाल्याने भावना अनावर होणे साहजिक होते. या भावना एकमेकांसाठी (मी आणि मोदी) नव्हत्या असा खुलासा आझाद यांनी केला. आझाद मुख्यमंत्री असताना २९ जुलै २००७ रोजी असाच एक शक्तिशाली हल्ला शालीमार गार्डन बाहेर बसमध्ये झाला होता. त्यावेळीही गुजराती पर्यटक श्रीनगर फिरण्यासाठी बसमधून आले होते. हल्ल्यात पाच पर्यटकांसह एका काश्मिरी व्यक्तिचा मृत्यू झाला होता.