scorecardresearch

कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये काय होणार?

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकांना निकाल हा आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचे भविष्य दर्शविणारा असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

kasba by election
कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये काय होणार?

सुजित तांबडे

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकांना निकाल हा आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांचे भविष्य दर्शविणारा असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ज्येष्ठ नेत्यांपासून ते स्टार प्रचारकांपर्यंत सर्वांनीच मतदार संघ पिंजून काढत आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्याने निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कसबा हा आतापर्यंतचा भाजपचा बालेकिल्ला डगमळीत झाल्याचे चित्र निर्माण झाले असताना, मतदानाचा ‘टक्का’ कोणत्या भागातून जास्त होईल, यावर या मतदार संघाचा विजय अवलंबून आहे. चिंचवडमध्ये तिरंगी लढतीत बंडखोर उमेदवाराची बंडखोरी ही ‘नुरा कुस्ती’ ठरणार की, ‘जायंट किलर’यावर निकालाचे भवितव्य असणार आहे.

हेही वाचा >>>काँग्रेस कार्यकारिणी समितीची निवडणूक होणार नाही; रायपूरमधील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निर्णय

कसब्यामध्ये भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात अटीतटीची लढाई आहे. कसबा मतदार संघ हा भाजपने प्रतिष्ठेचा केल्याने महाविकास आघाडीनेही प्रचारासाठी राज्यभरातून प्रचाराचा फौजफाटा आणला. भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना ओंकारेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी कसब्यात आणून वातावरण निर्मिती केली. आजारी असलेले खासदार गिरीश बापट यांना प्रचारात आणून मतदारांना भावनिक आवाहन केले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापासून ते अनेक मंत्र्यांनी पुण्यात ठाण बांधले आहे. शिवाय मनसेचा पाठिंबाही मिळवला आहे.

महाविकास आघाडीने प्रचारात कसूर केली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींनी मतदार संघ पिंजून काढला. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. साधारणत: पोटनिवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण हे कमी असल्याने मतदानाचा टक्का किती आणि कोणत्या भागातून वाढणार, यावर कसब्याच्या निकालाचे भवितव्य अवलंबून आहे.

हेही वाचा >>>“मोदी हेच एकमेव पर्याय, भ्रष्टाचारमुक्त कर्नाटकासाठी आम्हाला मत द्या”, अमित शाहांकडून मतदारांना साद

कोणते भाग ‘लक्ष्य’?

कसब्यामध्ये भाजपचा पारंपरिक मतदार हा मध्यवर्ती भागातील पेठांचा आहे. त्यामुळे या भागातील मतदान वाढविण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. पेठांचा भाग वगळता अन्य भागातील कागदीपुरा, मोमीनपुरा, काशेवाडी, भवानी पेठ, रविवार पेठ, गुुरुवार पेठ या भागात काँग्रेस, शिवसेनेला मानणारा मतदार वर्ग आहे. त्यामुळे या भागातील मतदार हे घराबाहेर पडतील, यासाठी महाविकास आघाडी कामाला लागली आहे.

टक्का वाढविण्यासाठी काय-काय?

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी भाजपकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर व्यूहरचना आखण्यात आली आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी डावलल्याने नाराजी उफाळूून येऊ नये, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. पेठांतील प्रत्येक मतदाराने मतदान करावे, यासाठी भाजपच्या पुणे महापालिकेतील सर्व माजी नगरसेवकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येकाला परिसरानुसार याद्या देण्यात आल्या आहेत. काही भागात भाजपच्या उमेदवाराबाबत पक्षांतर्गत नाराजी असल्याचे लक्षात आल्यावर संबंधितांना धोक्याची सूचनाही वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात येत आहे. मतदान कमी होणाऱ्या भागातील विद्यमान नगरसेवकांना आगामी महापालिका निवडणुकीत तिकीट द्यायचे की नाही, याचा विचार केला जाईल, असेही ठणकावण्यात आले आहे. त्यामुळे नाराज हे नाईलास्तव का होईना, कामाला लागल्याचे सांगण्यात येते. या मतदार संघातील प्रत्येक समाजातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या-त्या समाजातील राज्यातील नेत्यांना मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे आदेश देण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याहून फौज पाठविली आहे. ‘करो या मरो’ अशी अवस्था असल्याने प्रत्येक मतदार हा मतदानापर्यंत येईल, याची खबरदारी भाजपने घेतली असल्याचे समजते. महाविकास आघाडीनेही मध्यवर्ती पेठावगळता अन्य भागातील मतदार मतदानासाठी घराबाहेर पडतील, यासाठी व्यूहरचना तयार केली आहे.

हेही वाचा >>>शत्रुघ्न सिन्हांकडून पुन्हा राहुल गांधींचं कौतुक; म्हणाले, “आगामी २०२४च्या निवडणुकीत…”

मतदार घराबाहेर येऊ नयेत…

भाजपने मतदार मतदानासाठी यावेत, यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर तयारी केली असताना मतदान घराबाहेर पडू नयेत, यासाठीही व्यूहरचना आखल्याची चर्चा आहे. मतदान मिळण्याची खात्री नसलेले मतदार हे घराबाहेर पडणार नाहीत किंवा त्या दिवशी पुण्यातच नसतील, यासाठीही राजकीय पक्षांनी नियोजन केल्याचे समजते. त्यामुळे कोणत्या भागातील मतदानाचा टक्का वाढणार, यावर निकालाचे चित्र स्पष्ट होणार

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-02-2023 at 11:26 IST

संबंधित बातम्या