INDIA Alliance Crisis 2025 बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मोठा विजय मिळवीत तब्बल २०२ जागा जिंकल्या आहेत; तर विरोधकांच्या महाआघाडीला फक्त ३५ जागांवरच समाधान मानाले लागले. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत महाआघाडीला मोठा धक्का बसला. बिहारमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर ‘इंडिया’ आघाडीत दुफळी निर्माण झाल्याचे चित्र आहे. अनेक प्रादेशिक पक्ष आता काँग्रेसच्या नेतृत्वाखालील या युतीची रणनीती, नेतृत्व व विश्वासार्हता यावर उघडपणे प्रश्नचिन्ह उभे करीत आहेत. सुरुवातीला याविषयीची केवळ कुजबुज होती; मात्र आता आघाडीबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी किंवा तोडण्यासाठी अनेक पक्षांमध्ये सक्रिय चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे, असे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिले आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष बाहेर पडणार, अशा चर्चांनी जोर धरला आहे. इंडिया आघाडीत नक्की काय घडतंय? त्याविषयी जाणून घेऊयात…

झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम)ची माघार

बिहार निवडणुकीपूर्वी आरजेडी, काँग्रेस, डावे, व्हीआयपी यांच्यातील महाआघाडीतील धुसफूस स्पष्टपणे दिसत होती. जागावाटपावरूनही आरजेडी व काँग्रेसममध्ये मतभेद असल्याचे चित्र होते. निवडणुकीच्या अगदी आधीच झारखंड मुक्ती मोर्चाने बिहारमध्ये महाआघाडीबरोबर निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतला. हा इंडिया आघाडीसाठी सर्वांत मोठा धक्का होता. पूर्वी जी बोलणी झाली होती आणि त्यात जी आश्वासने दिली होती ती पूर्ण न केल्याचा आरोप जेएमएमने केला. जेएमएमच्या नेत्यांनी म्हटले की, महाआघाडीत प्रादेशिक मित्रपक्षांना दुय्यम वागणूक दिली जात आहे. त्यामुळे आता हा पक्ष पुढील काळात, विशेषतः शेजारच्या झारखंडमध्येही इंडिया आघाडीबरोबर राहण्याबाबत फेरविचार करीत आहे.

निवडणुकीच्या अगदी आधीच झारखंड मुक्ती मोर्चाने बिहारमध्ये महाआघाडीबरोबर निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतला. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

शिवसेनेनेही (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिला इशारा

बिहारच्या निकालावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत, विरोधी पक्षांसाठी हा धोक्याचा इशारा असल्याचे म्हटले आहे. ज्येष्ठ नेत्यांनी केवळ निवडणूक यंत्रणेवरच नव्हे, तर इंडिया आघाडीच्या अंतर्गत समन्वयावरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे. शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी निदर्शनास आणून दिले आहे की, राज्य स्तरावरील काँग्रेस युनिट्सने घेतलेल्या एकतर्फी निर्णयामुळे सामूहिक रणनीती कमकुवत झाली. त्यात काही जागांवर एकट्याने निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचाही समावेश होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मत आहे की, मोठ्या पक्षांनी महत्त्वाच्या राज्यांमध्ये महत्त्वाचे निर्णय घेताना मित्रपक्षांशी सल्लामसलत केली नाही, तर इंडिया आघाडी कार्य करू शकत नाही.

बिहारच्या निकालावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत, विरोधी पक्षांसाठी हा धोक्याचा इशारा असल्याचे म्हटले आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

समाजवादी पक्षाचा संरचनात्मक बदलांसाठी आग्रह

समाजवादी पक्षाने (सपा) आघाडीला सुधारणेची गरज आहे, असे ठामपणे सांगितले आहे. समाजवादी पक्षप्रमुख अखिलेश यादव यांनी बिहारमधील अडचणींविषयी बोलले. सपाच्या एका आमदाराने म्हटले आहे की, अखिलेश यादव यांनी विरोधी आघाडीचे नेतृत्व करावे. विरोधी पक्षांच्या पटलावरील काही नेत्यांनी आघाडीचे नेतृत्व बदलण्यावर जोर दिला आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांना, विशेषत: ज्यांचा राज्यात मजबूत आधार आहे. त्यांना राष्ट्रीय रणनीतीमध्ये अधिक महत्त्व मिळेल. या चर्चेत समाजवादी पक्ष आघाडीवर आहे.

समाजवादी पक्षाने (सपा) आघाडीला सुधारणेची गरज आहे, असे ठामपणे सांगितले आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

आम आदमी पक्षाच्या स्वतंत्र धोरणाला महत्त्व

निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी आम आदमी पक्षाने (आप) बिहारमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता, असे अनेकांचे म्हणणे आहे. ‘इंडिया’ आघाडीने समन्वय आणि जागावाटपाबद्दल सुरु असलेल्या चिंता दूर न केल्यास, इतर प्रादेशिक मित्रपक्षही याच स्वरूपाचा निर्णय घेऊ शकतात.

काँग्रेसच्या प्रतिमेची लढाई

बिहारच्या निकालामुळे काँग्रेससमोर आघाडीतूनच काही अडचणीचे प्रश्न उभे राहिले आहेत. हिंदी पट्ट्यातील एका मोठ्या राज्यात पक्षाच्या कमकुवत कामगिरीमुळे जागांच्या वाटाघाटीतील निर्णय चुकल्याचे अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मान्य केले आहे. आघाडी टिकून राहावी, असे वाटत असल्यास काँग्रेसने आपला संघटनात्मक दृष्टिकोन, निवडणूक व्यवस्थापन व उमेदवार निवड प्रक्रिया यांत बदल करायला हवा, असे अनेक मित्रपक्षांनी सांगितले आहे. इतर काही जणांचे म्हणणे आहे की, निर्णय घेण्याच्या पारदर्शक यंत्रणेशिवाय राष्ट्रीय आघाडी यशस्वी होऊ शकत नाही.

बिहारच्या निकालामुळे काँग्रेससमोर आघाडीतूनच काही अडचणीचे प्रश्न उभे राहिले आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की, इंडिया आघाडीला पराभवाच्या कारणांचे विश्लेषण करणे, मित्रपक्षांचा विश्वास वाढविणारे उपाय करणे आणि जागावाटपावर स्पष्टता आणणे आवश्यक आहे. प्रादेशिक पक्षांच्या ताकदीचा अधिक चांगल्या पद्धतीने उपयोग करण्यासाठी काँग्रेस आपली रणनीती बदलण्यास करण्यास तयार आहे की नाही, हे इंडिया आघाडीत सध्या महत्त्वाचे आहे. आता ज्या युतीचे नेतृत्व दबावाखाली आहे, त्यात राहायचे की नाही, राज्य स्तरावरील त्याचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी स्वतंत्र मार्ग काढायचा का, हा मित्रपक्षांसमोरील मोठा प्रश्न आहे.