आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात असतानाच आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्यात एकच खळबळ उडाली… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व राजकीय आघाड्यांवर जिंकले असले तरीही विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात ते सपशेल अपयशी ठरले, असा संताप बच्चू कडूंनी व्यक्त केला… मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले… अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचे राजकारण सुरू असल्याची टीका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली… २०४७ पर्यंत मुंबई महानगर क्षेत्र हे पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा उचलणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
रोहित पवारांच्या आरोपांनी राज्यात खळबळ
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. या अपघाताबाबत अनेकांकडून शंका उपस्थित केल्या जात असताना आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या अपघाग्रस्त विमानात अतिरिक्त इंधनाचा साठा होता. मुंबईहून बारामतीला जाण्यासाठी फार इंधनाची गरज नव्हती. तरीही विमानाच्या पंखातील इंधनाच्या टाक्या पूर्णपणे भरण्यात आल्या होत्या. एवढेच नव्हे तर विमानाच्या टॉयलेटजवळ इंधनाचे अतिरिक्त कॅनही ठेवले होते. या सगळ्यात वैमानिकाचा वापर करून विमानाचा अपघात घडवून आणला असावा, असा आरोप रोहित पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेतून केला आहे. बारामतीच्या धावपट्टीवर उतरण्यासाठी कमी दृश्यमानता असूनही वैमानिकाने मागे न फिरता मुद्दामहून विमान खाली उतरवले आणि स्फोट घडवून आणला, असेही रोहित पवार म्हणाले. त्यांच्या या आरोपांमुळे अजित पवार यांच्या विमान अपघाताचा संशय अधिकच बळावला आहे.
बच्चू कडू यांचा फडणवीसांवर संताप
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू यांनी अमरावती येथील जाहीर पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. देवेंद्र फडणवीस सर्व राजकीय आघाड्यांवर जिंकले; पण विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या ते रोखू शकले नाहीत. त्याशिवाय येथील लोकांची मनेही त्यांना जिंकता आली नाही, असा संताप बच्चू कडू यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. मात्र, या विषयाकडे गाभीर्याने पाहिले जात नाही. इतर राज्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) आधारे जंगलांमध्ये तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर आहे, तर विदर्भ हा जगामध्ये अव्वल आहे. आत्महत्यांचा प्रदेश म्हणून या भागाची ओळख होणार आहे. फडणवीस विदर्भातील नेते असले तरी त्यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखता आलेल्या नाहीत, या बाबतीत ते सपशेल अपयशी ठरले, अशी टीकाही कडू यांनी केली.
राज ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीची चर्चा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचानक भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बंद दाराआड चर्चेमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या भेटीदरम्यान कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांचे आभार मानल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज यांनीही शिंदेंना महापालिका सभागृहातील कामकाजात मनसेचे सहकार्य राहील, असे आश्वासन दिल्याचे सांगितले जात आहे. या भेटीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एपीबी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे जरी आमचे विरोधी नेते असले तरी ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. तसेच राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी कोणाला भेटायला जावे किंवा जाऊ नये, यावर आम्ही काही बोलू शकत नाही, असे अंधारे यांनी स्पष्ट केले आहे.
रोहित पवारांनी राजकारण थांबवावे : मंत्री विखे
अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचे राजकारण सुरू असल्याची टीका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. आमदार रोहित पवार यांनी राजकारण थांबवावे आणि पवार कुटुंबाला आधार द्यावा, असा सल्लाही विखे यांनी दिला. छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना मंत्री विखे म्हणाले की- अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही डायरेक्टर जनरल ऑफ क्राईम इन्व्हेस्टिगेशन यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. मात्र, दुसरीकडे वेगवेगळ्या गोष्टी पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा घटनेवर राजकारण करणे हे अधिक दुर्दैवी आहे. यादरम्यान आमदार रोहित पवार यांना राजकारण थांबवण्याचा आणि कुटुंबाला आधार देण्याचा सल्लाही मंत्री विखे यांनी दिला.
हेही वाचा : मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद? कोण आहेत? टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद कसा निर्माण झाला?
मुंबई महानगर भारताचे भविष्य : मुख्यमंत्री फडणवीस
२०४७ पर्यंत मुंबई महानगर क्षेत्र हे पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा उचलणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबई देशाची मनोरंजन, वाणिज्य आणि आर्थिक राजधानी आहे आणि मुंबई एमएमआर क्षेत्र (महानगर) हे भारताचे भविष्य आहे, असेही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे ‘फेडेक्स हब’चे भूमिपूजन झाले. यावेळी फेडेक्सचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राज सुब्रमण्यम, फेडेक्सच्या विमान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड स्मिथ, फेडेक्सच्या मध्य पूर्व, भारतीय उपखंड आणि आफ्रिका (एमईआयएसए) क्षेत्र अध्यक्षा कामी विश्वनाथन आणि एएएचएलचे डायरेक्टर जीत अदानी हे देखील यावेळी उपस्थित होते. उत्पादन क्षेत्रासाठी तसेच संबंधित उद्योगांसाठी फेडेएक्सची ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरेल असा दावा फडणवीसांनी केला. या नव्या सुविधेमुळे महाराष्ट्र राज्यातील कार्गो हाताळणीला मोठी चालना मिळणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

