Rohit Pawar Interview on Ajit Pawar plane crash: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला मुलाखत दिली आहे. माजी मुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास, एफआयआर दाखल करण्यासाठी झालेला उशीर तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण याबाबत रोहित पवार यांनी भूमिका मांडली. रोहित पवार यांना स्वत:च्याच व्यवसायाबाबत शंका का आली, याचा उलगडा त्यांनी केला. राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षाला २०२९ च्या आधी काहीतरी वेगळे करून दाखवावे लागेल, असे रोहित पवार म्हणाले. रोहित पवार नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
प्रश्न – अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशीची मागणी तुम्ही करत आहात. हा लढा तुम्ही एकटेच लढत आहात असे दिसून येते. तुमच्या पक्षातील वरिष्ठ नेते तुमच्या या मागणीसाठी तुम्हाला जाहीरपणे समर्थन का देत नाहीत?
रोहित पवार – जर पक्ष म्हणून आम्ही हा मुद्दा उचलला तर तो राजकीय मुद्दा होईल. शरद पवार हे माध्यमांपासून दूर आहेत. त्यांना कोणी प्रभावित करू शकत नाही. ते जेव्हा बोलतील त्यावेळी ते त्यांची भूमिका मांडतील. पक्षातील इतर नेत्यांनी मला त्यांच्या पद्धतीने या मुद्द्यावर पाठींबा दिला आहे. कोणी साथ देत नसेल तर माघार घेणाऱ्यांपैकी मी नाही. मला लोकांचा पाठिंबा आहे. त्यांचा पाठिंबा नसता तर माध्यमांनी हा मुद्दा दाखवला नसता, आणि सरकारही दबावात आलं नसतं.
प्रश्न – पण हा मुद्दा तुमच्या पक्षातील नेत्यांनीही तुम्ही जितक्या प्रकर्षाने मांडता तितक्याच प्रकर्षाने लावून धरावा, असे तुम्हाला वाटत नाही का?
रोहित पवार – हा एक संवेदनशील आणि क्लिष्ट मुद्दा आहे. तुम्हाला जर तो समजला नसेल, तर तुम्ही त्यावर बोलू शकणार नाही. तुम्ही जर योग्य माहिती घेऊन बोलत नसाल, तर हा मुद्दा चुकीच्या मार्गाने जाईल. हा एक सामाजिक, राजकीय आणि भावनिक मुद्दा आहे. यावर बोलताना कोणती तरी एक बाजू घेण्याचा धोका पत्करणे अनेकांना नको वाटत आहे.
मी दिल्लीत राहुल गांधींना भेटलो. आम्ही चाळीस मिनिटे चर्चा केली. पायलट असल्याने विमानाबाबत त्यांना माहिती आहे. सखोल चर्चा झाल्यानंतर त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला. तो म्हणजे एफआयआर नोंद का झाली नव्हती? ते (राहुल गांधी) म्हणाले, चाळीस वर्ष महाराष्ट्रासाठी काम केलेल्या एका नेत्यासाठी महाराष्ट्रात एफआयआर नोंद होत नसेल, तर न्याय मिळवण्यासाठी दुसऱ्या राज्याकडे का जाऊ नये?
प्रश्न – तर तुम्ही पुढे जाऊन कर्नाटकात झिरो एफआयआर नोंद केला. जे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आवडले नाही…
रोहित पवार – मुख्यमंत्र्यांना झिरो एफआयआरबद्दल गैरसमज झाला आहे. मी सगळी कागदपत्रे आणि नियम समजावून सांगितले आहेत. जर कर्नाटकाने तपास केला असता तर ते चुकीचे ठरले असते. त्यामुळे कर्नाटकने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांकडे प्रकरण वर्ग केले.
हे प्रकरण सीबीआयकडे का दिले नाही, हे मी मुख्यमंत्र्यांना विचारले. त्यावर, हे प्रकरण सीबीआयकडे देऊ. याबाबत गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली आहे. तपास अहवालाची आम्ही वाट पाहतोय, असं मुख्यमंत्री म्हणाले. पण हे प्रकरण त्यांनी एएआयबी (विमान अपघात तपास ब्युरो) कडे दिले आहे. विमानातील तांत्रिक बिघाड तपासून भविष्यात काय काळजी घ्यावी हे एएआयबीच्या तपास अहवालातून सुचवले जाते. तर सीबीआय आणि सीआयडी गुन्ह्याचा तपास करतात. एएआयबीच्या अहवालावरून सीबीआय तपासाबाबत निर्णय घेतला जाणार आहे, त्यामुळे तपासाबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.
यापलीकडे व्हिके सिंग (अजित पवार प्रवास करत होते त्या विमान कंपनी व्हिएसआर एव्हिएशनचे संचालक) आणि त्यांच्या कंपनीचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांशी वैयक्तिक संबंध असल्याचे दिसून आले. यामुळे घातपाताचा संशय वाढत आहे. जर अपघातानंतर दोन किंवा तीन दिवसांत एफआयआर नोंद झाली असती, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला असता, तर हा मुद्दा इतका वाढला नसता. तपासासाठी होत असलेला उशीर आणि विमान कंपनीला मिळत असलेले संरक्षण यांमुळे हा मुद्दा गंभीर वाटतोय.
प्रश्न – सुनेत्रा पवार, पार्थ, जय या मुद्द्यावर तुमच्याबरोबर आहेत का?
रोहित पवार – मला घातपाताचा संशय येतोय त्यामुळे मी प्रेझेंटेशन देणार आहे, हे मी अजित पवार गेल्यानंतर पहिल्या १३ दिवसांमध्ये त्यांना (अजित पवारांच्या कुटुंबियांना) भेटून सांगितलं होतं. त्यांनी मला त्यासाठी परवानगी दिली. जयने मला नंतर बोलावले होते. त्यानंतर त्याने ट्विट केले. जय देखील प्रेझेंटेशन देणार होता पण त्याने दिले नाही. ते का दिले नाही ते मला माहिती नाही.
प्रश्न – कोणताही घातपात नव्हता किंवा मानवी चूक अथवा निष्काळजीपणामुळे अपघात झाला असे तपास अहवालातून समोर आले तर तुम्ही ते स्वीकाराल का?
रोहित पवार – पारदर्शकपणे तपास व्हावा एवढीच माझी मागणी आहे. जर कोणताही घातपात नसेल, तर ठीक आहे. पण तपास न करताच आपण ते कसे मानू शकतो? जर एफआयआर नोंद होत नसेल, सीआयडीकडून तपास होत नसेल तर त्यात घातपात झाल्याचा संशय बळावतो. अशावेळी त्या दृष्टीने तपास होणे आवश्यक आहे. तांत्रिक तपास करून (टेक्निकल डिटेल्सचा) काही होणार नाही.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारने सीबीआय तपास करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. तो केंद्र सरकारने दुसऱ्याच दिवशी मान्य केला. अजितदादांचा अपघात होऊन आता ५८ दिवस झाले आहेत. राज्य सरकारने ४२ दिवसांपूर्वी प्रस्ताव पाठवला होता. तो आजच्या तारखेपर्यंत स्वीकारण्यात आलेला नाही. यामुळे फक्त संशय वाढतोय.
मागील दोन महिन्यांपासून मला स्वत:च्या व्यवसायाबाबतच शंका येतेय. राजकारण खुप घाणेरड्या पद्धतीने सुरू आहे. अशोक खरात प्रकरणात एसआयटी (विशेष तपास पथक) स्थापन झाली आणि दहा दिवसांत खूप गोष्टी बाहेर आल्या. हे चांगली गोष्ट आहे. पण या प्रकरणात (अजितदादा अपघात) तपास सुरू होण्यासाठीच दोन महिने लागले.
