पुणे : लोकमान्य टिळकांचे खापरपणतू रोहित टिळक यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने कसबा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची अडचण होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. २०१४ मध्ये कसब्यात एकमेकांविरोधात निवडणूक लढविणारे टिळक आणि धंगेकर हे एकाच पक्षात येणार असल्याने ‘कसब्या’तील राजकारणाला आता नवे वळण मिळणार आहे.

रोहित टिळक यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचे जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लोकमान्य टिळक पुरस्कार’ देण्यात आल्यापासून काँग्रेस नेतृत्व आणि टिळक यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे) पक्षाकडून विचारणा करण्यात आल्यानंतर काँग्रेस हायकमांड आणि टिळक यांच्यात अंतर वाढत गेले. त्यामुळे त्यांनी आता शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाने कसबा मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राजकीय प्रतिस्पर्धी आता एकाच पक्षात

कसबा मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला असून, ते शिवसेनेचे पुणे महानगरप्रमुख आहेत. रोहित टिळक आणि धंगेकर हे एकेकाळचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. २०१४ मध्ये झालेल्या कसबा विधानसभा मतदार संघातील निवडणुकीत काँग्रेसकडून रोहित टिळक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून धंगेकर यांनी निवडणूक लढविली होती. त्या निवडणुकीत भाजपचे दिवंगत आमदार गिरीश बापट हे विजयी झाले होेते. टिळक यांना ३१ हजार, तर धंगेकर यांना २६ हजार मते मिळाली होती. आता हे दोन्ही प्रतिस्पर्धी एकाच पक्षात येणार असल्याने कसबा मतदार संंघातील राजकीय समीकरणेही बदलणार आहेत.

धंगेकरांच्या अडचणीत भर?

धंंगेकर यांनी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढविली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात त्यांनी चांगली लढत दिली. मात्र, त्यांना पराभवाला समोरे जावे लागले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने यांनी त्यांचा पराभव केला. त्यावेळी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून साथ न मिळाल्याने त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला. त्यांच्याकडे महानगरप्रमुख पद देण्यात आले. त्यानंतर महापालिका निवडणुकीत त्यांनी पत्नी प्रतिभा आणि चिरंजीव प्रणव या दोघांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून भाजपपुढे आव्हान उभे केले. मात्र, दोघांचाही पराभव झाला. मात्र, महापालिका निवडणुकीत धंगेकर यांनी वेगवेगळे आरोप करून भाजपच्या नेत्यांपुढे प्रश्न निर्माण केले होते. कोथरुडमधील गुन्हेगारी आणि जैन बोर्डिंग प्रकरणावरून त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांंच्यावर उघडपणे टीका केली. सभागृह नेते गणेश बीडकर आणि धंगेकर हे एकमेकांचे राजकीय शत्रू आहेत. बीडकर यांच्यावरही ते सातत्याने टीका करत राहिले. आता टिळक यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने धंंगेकर यांच्या अडचणीत आणखी भर पडली असल्याचे चर्चा सुरू झाली आहे.