Vijay’s Political Journey through Tamil Cinema: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सी. जोसेफ विजयचा तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मागील तीन दशकांत विजय चित्रपटांच्या माध्यमातून तमिळनाडूतील घराघरांत पोहोचला आहे. विजयच्या चित्रपटांचे फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्याचे वेड, कॉलेजमध्ये त्याच्या गाण्यांवर होणारे डान्स, वारंवार येणाऱ्या त्याच्या युट्यूब क्लिप्स या माध्यमांतून विजयला प्रसिद्धी मिळत गेली. २०२४ मध्ये विजयने टीव्हीके पक्षाची घोषणा केली. त्यावेळी तो समर्थकांना म्हणाला, “टीव्हीकेची घोषणा झाल्यानंतर मी आता लोकांच्या घरी जाणार नाही, कारण मी त्यापूर्वीच चित्रपटांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलो आहे.” विजयची चित्रपटातील कारकिर्द कशी होती? चित्रपटांतून राजकारणात विजयने कसा प्रवेश केला, ते जाणून घेऊयात.
चित्रपटसृष्टीतून तामिळनाडूला यापूर्वीही मिळाले राजकीय नेते
तामिळनाडूला सिनेक्षेत्रातून यापूर्वीही अनेक राजकीय नेते मिळाले आहेत. त्यात सीएन अण्णादुराई, एम करूणानिधी, एम.जी. रामचंद्रन आणि जे. जयललिता यांचा समावेश आहे. तमिळ चित्रपटांच्या माध्यमातून या अभिनेत्यांनी तमिळ/ द्रविडीयन संस्कृतीचा प्रचार प्रसार केला होता. तसेच तमिळ अस्मिता जपली होती. त्याचा त्यांना राजकारणात फायदा झाला. विजयला मिळालेल्या यशानंतर त्याची तुलना एकेकाळी सुपरस्टार असलेल्या व नंतर मुख्यमंत्री पद सांभाळलेल्या एमजी रामचंद्रन यांच्याशी होत आहे. दोन वर्षांतच एमजी रामचंद्रन यांनी सत्ता मिळवली होती. द्राविडियन चळवळीतून एमजी रामचंद्रन यांनी एआयएडीएमके पक्ष स्थापन केला होता. त्यांच्या पक्षाला चळवळीची, आंदोलनांची पार्श्वभूमी होती. पण विजयने फक्त फॅन्डम, चाहत्यांच्या पाठिंब्यावर सत्ता मिळवली आहे. त्यामुळे विजय सत्तेची धुरा कशी सांभाळतो याबद्दल राजकीय वर्तुळात गूढ आहे. विजय यांना मिळालेल्या यशाने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. परंतु, चित्रपटांच्या माध्यमातून यापूर्वीच विजय तमिळनाडूतील घराघरांत पोहोचला होता.
रोमँटिक हिरो ते थलपती
विजयचे राजकारण समजून घेण्याआधी त्याला चित्रपटांतून मिळालेली ओळख समजून घेणे आवश्यक आहे. विजयला अभिनय कौशल्यामुळे त्याच्या फॅन्सनी ‘थलपती’ उपाधी दिली. थलपतीचा अर्थ कमांडर असाही होतो. १९९० मध्ये त्याला रोमँटिक हिरो म्हणून ओळख मिळाली. त्याच्या भू्मिकांनी मध्यमवर्गीय कुटुंब हुरळून जात होते. पूवी उनाक्कगा, कधालुक्कू मरियाधाई, लव्ह टुडे आणि थुल्लाधा मनमम थुल्लूम या चित्रपटांत साकारलेल्या भूमिकेमुळे विजयला प्रसिद्धी तसेच ओळख मिळाली. सुरूवातीच्या चित्रपटांतून आई, बहीण आणि कॉलेजच्या मुलींशी प्रेमाने, सामंजस्याने, काळजीने वागणारा अभिनेता अशी ओळख विजयला मिळाली होती.
त्यानंतर त्याच्या भूमिकेत बदल झाला. त्याला ‘मास हिरो’ दाखवण्यात आले. थिरूपाची, सिवाकासी, पोक्कीरी आणि नंतर थुप्पाक्की, कथीथी, मेरसाल, सरकार, मास्टर, बिस्ट, वारीसू आणि लिओ या चित्रपटांतून विजयला वेगळ्या भूमिकेत दाखवण्यात आले. डान्स, जोक, प्रेम, अपमान सहन करणारा, अन्यायाविरोधात प्रसंगी हिंसेचा वापर करणारा अशी प्रतिमा विजयची तयार झाली होती. लोकांच्या समस्या मांडणाऱ्याच्या भूमिकेत विजयला दाखवण्यात आले होते. विजय त्याच्या डान्सच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे प्रसिद्ध झाला. विजयने केलेल्या डान्सच्या मूव्हजवर शाळेतील विद्यार्थी नृत्य स्पर्धेत सहभागी होत असत. रजनीकांत जसे त्यांच्या स्टाइलसाठी ओळखले जात, तसा विजय डान्ससाठी प्रसिद्ध झाला. तमिळनाडूत तरूणाईला डान्सची लवकरच भुरळ पडते.
चित्रपटांतून सामाजिक, राजकीय विषय कसे दाखवले?
चित्रपटांत विजयवर वारंवार अन्याय होतो पण तो खचून जात नाही. तो सत्तेची थट्टा उडवतो, पण तो कधीही हतबल दिसत नाही. तमिळ व्यावसायिक चित्रपटांची एक ठराविक मूल्ये विजयच्या चित्रपटांतून दिसतात. दुर्बलांचे रक्षण करणे, भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा देणे, आईचा आदर करणे, गर्विष्ठ उच्चभ्रूंवर अविश्वास ठेवणे आणि नैतिकतेनुसार न्याय मिळवून देणे. तामिळनाडूमध्ये हे एखाद्या राजकीय जाहीरनाम्यासारखे वाटू शकते.
खऱ्या आयुष्यातील विजय आणि राजकारण
खऱ्या आयुष्यात विजयची प्रतिमा एका शांत, सयंमी व्यक्तीसारखी आहे. तो लाजाळू आहे. तसेच त्याचे वैयक्तिक जीवन तो जगत असतो. सार्वजनिक जीवनात त्याचा वावर कमी आहे. विजयवर जेव्हा राजकीय टीका होते, तेव्हा तो शांत राहणे पसंत करतो. त्याचे वडील चित्रपट दिग्दर्शक एसए चंद्रशेखर हे माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देतात. विजयच्या बाजूने भूमिका मांडतात. विजयच्या राजकीय जडणघडणीत त्यांच्या वडिलांचे योगदान महत्वाचे आहे. २००९ मध्ये ‘थलपती विजय मक्कल इयाक्कम’ या फॅनक्लबची स्थापना झाली होती. विजयच्या राजकीय आणि सामाजिक कार्यात या संस्थेची भूमिका महत्वाची ठरली. विजयच्या मित्रमंडळीचे एक खासगी सर्कल आहे, त्यातच राहणे तो पसंत करतो.
स्वत:च्या आई-वडिलांविरोधात का दाखल केला होता खटला?
२०२० मध्ये विजयला राजकारणात पाठवण्यासाठी त्याच्या वडीलांनी विजयच्या संस्थेचे राजकीय पक्षात रूपांतर करण्याचे प्रयत्न केले होते. विजयची परवानगी न घेताच त्याच्या वडीलांनी विजयच्या राजकीय करिअरसाठी काही पाऊले उचलली होती. त्यावेळी विजयने राजकारणात प्रवेश करण्यास विरोध करत स्वत:च्या आई-वडिलांविरोधात खटला दाखल केला होता. राजकारणात उतरणार तर माझ्या अटी व नियमांनुसार उतरणार, असा संदेशच विजय यांनी दिला होता. “विजयला कोणाच्याही वर्चस्वात काम करायला आवडत नाही. तो सल्ला देणाऱ्यांना सहन करू शकतो. पण, कोणाच्या प्रभावात तो काम करू शकत नाही”, असे टीव्हीकेची घोषणा होण्याआधी आणि घोषणेनंतर विजयबरोबर काम करणाऱ्या त्याच्या एका सहकाऱ्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.
