RSS chief statements राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी (१७ फेब्रुवारी) लखनौ येथील सरस्वती शिशू मंदिर येथे आयोजित सामाजिक समरसता बैठकीत मोठे विधान केले. भारतात राहणारे मुस्लिमही हिंदूच आहेत, असे ते म्हणाले. त्यांचे हे विधान चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच हिंदू कुटुंबांनी किमान तीन मुले जन्माला घालण्याचा विचार करावा, असेही त्यांनी म्हटले. त्यांनी हिंदूंची लोकसंख्या कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि हिंदू समाज संघटित व सशक्त करण्याचे आवाहन केले.

त्यांनी सांगितले की, कोणताही धोका नसला तरी सतर्कता आवश्यक आहे. ते म्हणाले, भारतात राहणारे मुस्लीमदेखील हिंदूच आहेत, ते काही अरब देशांतून आलेले नाहीत. त्यांचीही घरवापसी करायची आहे; पण हे काम हळूहळू होईल. याच वेळी त्यांनी उच्च शिक्षण संस्थांमधील समानतेच्या प्रसारासाठी असलेल्या नवीन ‘यूजीसी’ मार्गदर्शक तत्त्वांचेही समर्थनही केले. मोहन भागवत नक्की काय म्हणाले? जाणून घेऊयात….

तीन अपत्यांचे धोरण

मोहन भागवत म्हणाले की, हिंदू कुटुंबांनी किमान तीन अपत्यांचा विचार करावा. सध्या लोकसंख्या दर २.१ आहे, तो किमान ३ असावा. हा समाज भविष्यात नष्ट होऊ शकतो, अशा वैज्ञानिक मतांचा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात केला. नवविवाहित जोडप्यांना याबद्दल जागरूक केले पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांच्या मते, विवाहाचा उद्देश केवळ वैयक्तिक इच्छा पूर्ण करणे हा नसून, या सृष्टीला पुढे नेणे हा आहे.

कायदे, जात आणि जागतिक भूमिकेवर भागवत यांचे विधान

यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांवरील प्रश्नाला उत्तर देताना भागवत म्हणाले की, कायद्यांचे पालन केलेच पाहिजे आणि त्रुटी असलेले कायदे घटनात्मक मार्गाने बदलले जाऊ शकतात. जातीपातीच्या भेदांमुळे संघर्ष होऊ नये, असे ते म्हणाले आणि त्यांनी वंचितांना आपलेपणाच्या भावनेने मुख्य प्रवाहात आणण्याचेही आवाहन केले. भागवत पुढे म्हणाले की, नजीकच्या भविष्यात भारत जगाला मार्गदर्शन करील. जगातील अनेक समस्यांची उत्तरे देशाच्या सांस्कृतिक नैतिकतेमध्ये आहेत. तसेच, त्यांनी अमेरिका आणि चीनमधील काही घटक भारतातील सामाजिक सौहार्दतेच्या विरोधात काम करत असल्याचे सांगितले.

घुसखोरीबद्दल चिंता

घुसखोरीबद्दल चिंता व्यक्त करताना भागवत म्हणाले की, घुसखोरांना शोधून काढून, त्यांना मतदार यादीतून वगळले पाहिजे आणि त्यांना हद्दपार केले पाहिजे. त्यांना रोजगार दिला जाऊ नये, असे ते म्हणाले. समरसतेच्या अभावामुळे भेदभाव निर्माण होतो, असे सांगत त्यांनी सर्व नागरिक एकाच देशाचे आणि एकाच मातृभूमीचे असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी सनातन विचारांचे वर्णन समरसतेचे तत्त्वज्ञान असे केले. मतभेद हे सामंजस्य आणि आचरणातून सोडवले पाहिजेत, असेही ते म्हणाले.

“भारतात राहणारे मुस्लीमही हिंदूच”

‘डेक्कन हेराल्ड’ने दिलेल्या वृत्तानुसार मोहन भागवत म्हणाले की, भारतात राहणारे मुस्लीमदेखील हिंदूच आहेत आणि आपल्याला त्यांची घरवापसी करायची आहे. या विधानाने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भागवत म्हणाले, “भारतात राहणारे मुस्लीमही हिंदूच आहेत. ते अरब देशांतून आलेले नाहीत. त्यांच्या घरवापसीला प्रोत्साहन दिले पाहिजे. ही (घरवापसी) अशी गोष्ट नाही, जी सामाजिक संवाद आणि समंजसपणाच्या माध्यमातून हळूहळू साध्य केली पाहिजे.”

“मुस्लिमांची मुळे या देशातच आहेत. त्यांचे पूर्वज याच मातीचे पुत्र आहेत. समाजाचे विभाजन करणे नव्हे, तर त्याला संघटित करणे ही काळाची गरज आहे,” असे मोहन भागवत म्हणाले. भागवत यूजीसीच्या नवीन नियमावलीचा संदर्भ देत म्हणाले की, हे कोणाच्याही विरोधात नाही. “जर कोणाला आक्षेप असेल, तर तो आपली मते घटनात्मक पद्धतीने मांडू शकतो.”

सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातिव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. भाषण करताना सरसंघचालक म्हणाले की, समाजात संवाद आणि संपर्क दोन्ही बाजूंनी असणे आवश्यक आहे. मुघल आणि ब्रिटिशांच्या प्रदीर्घ राजवटीतही भारतीय संस्कृती आणि सनातन परंपरा टिकून राहिल्या. त्यामुळे समाजाने आजही आत्मविश्वासाने पुढे जावे, असे भागवत यांनी सांगितले.

भारत टिकला, तरच जग टिकेल

जैन समाजाच्या आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक आणि महामस्तकाभिषेक महोत्सवात बोलताना भागवत म्हणाले की, मानवी जीवन आणि सृष्टीचे चक्र सतत सुरू राहावे, यासाठी अहिंसा, अनेकांतवाद व अपरिगृह या त्रिसूत्रीचा मार्ग सांगितला गेला आहे. हा मार्ग सांगणाऱ्या आणि त्याचे अनुकरण करणाऱ्या महापुरुषांची भारतात मोठी परंपरा आहे. त्याचा आपल्याला खूप लाभ होत आहे. याच आधारावर भारतवर्ष टिकून राहील आणि भारत टिकला, तरच जग टिकेल.

ते म्हणाले की, धर्माचा समतोल आणि शिस्त सोडून जगाने भौतिक विकासाची वाट धरली, त्यावर जग २००० वर्षे चालले; मात्र त्याचे अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत. सोई-सुविधा खूप मिळाल्या; पण सुख लांब गेले आहे. अशा स्थितीत आधुनिक ज्ञान व प्राचीन ज्ञान यांची सांगड घालून, धर्म अनुशासनानुसार लोकांनी पुढे जावे आणि सृष्टीला पुढे न्यावे, असे त्यांनी म्हटले.