scorecardresearch

“होय, आम्ही स्वातंत्र्यलढ्यात उतरलो होतो; पण काँग्रेसच्या…”, RSS नेते सुनील आंबेकर यांचे मोठे विधान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्य चळवळीत उतरला होता. तसेच आम्ही तिरंगा फडकविण्याचा कधीही विरोध केला नाही, असे स्पष्टीकरण सुनील आंबेकर यांनी दिले आहे.

“होय, आम्ही स्वातंत्र्यलढ्यात उतरलो होतो; पण काँग्रेसच्या…”, RSS नेते सुनील आंबेकर यांचे मोठे विधान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचे मत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वातंत्र्यलढ्यात काहीच योगदान नव्हते, असा आरोप सातत्याने काँग्रेस आणि त्यांच्या समविचारी पक्षांकडून करण्यात येत असतो. या आरोपाला आता संघाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पाञ्चजन्य पत्रिकेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या हीरक महोत्सवात विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, “स्वातंत्र्य लढ्यात आमच्या स्वयंसेवकांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून एकत्र लढा दिलेला आहे. देशाला स्वातंत्र्य केवळ काही लोकांच्या प्रयत्नामुळेच मिळाले हे खरे नाही.” तसेच संघ भारतीय ध्वज फडकवत नाही, या आरोपावर देखील त्यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे.

आम्ही स्वातंत्र्यलढ्यात उतरलो होतो; पण काँग्रेसच्या बॅनरखाली

सुनील आंबेकर आपला मुद्दा सविस्तर सांगताना म्हणाले, “संघाच्या स्वयंसेवकांनी स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने पुढाकार घेतला होता. विविध संघटनांमध्ये सामील होऊन तसेच काँग्रेसच्याही बॅनरखाली स्वयंसेवक देशासाठी लढले. डॉ. हेडगेवारांना राजकीय पक्ष किंवा संघटना काढायची नव्हती. त्यामुळे स्वयंसेवकांनी इतर संघटनांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला, हा इतिहास आहे.”

फक्त भारतीय स्वातंत्र्यलढाच नव्हे तर त्यानंतर दादरा आणि नगर हवेल, गोवा स्वातंत्र्यसंग्राम आणि निजाम राजवटीत हिंदूवर होत असलेल्या अन्यायाविरोधात देखील स्वयंसेवक त्याच ताकदीने उभे राहिले होते, असेही ते म्हणाले. काही लोकांच्या प्रयत्नांमुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले, असे म्हटले जाते. सुभाष चंद्र बोस यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केले जाते किंवा त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता देशाचा अमृत काळ सुरु असून लोकांना सर्व इतिहास ज्ञात होईल, अशीही अपेक्षा त्यांनी पाञ्चजन्यचे संपादक हितेश शंकर यांच्याशी बातचीत करताना व्यक्त केली.

संघ तिरंगा का फडकवत नाही?

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्याबाबत जो संघर्ष झाला त्याबाबत विधान केले होते. त्यांच्यानंतर आता त्याच धर्तीवर संघाकडूनही तशाच भूमिकेचा पुर्नउच्चार होताना दिसत आहे. तसेच संघाने भारताचा तिरंगा ध्वज फडकवला नाही, असा आरोप केला जातो. या प्रश्नावर आंबेकर म्हणाले की, ज्यांच्याकडे बोलण्यासाठी खरे आणि वास्तव मुद्दे नाहीत, ते असे मुद्दे उकरुन काढत असतात. आपल्या देशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. याकाळात अनेक चिन्हे, प्रतिके उदयास आली. सध्या भारताचा जो राष्ट्रध्वज आहे, तो येण्यापूर्वी काँग्रेसनेही अनेक झेंडे वापरले आहेत. जेव्हा भारताचा राष्ट्रध्वज अधिकृतपणे फडकविण्याची परवानगी मिळाली तेव्हापासून संघाने आपल्या कार्यालयावर केवळ तिरंगाच फडकविला आहे, अशी स्पष्टोक्तीही आंबेकर यांनी दिली.

आरएसएसच्या भविष्याबद्दल बोलत असताना आंबेकर म्हणाले की, संघ हा दीर्घकालीन उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करत असतो. समाजातील प्रत्येक घटकाचा वापर देश घडविण्यासाठी करण्याचे आमचे ध्येय असते. त्याप्रमाणे आमचे सर्व स्वयंसेवक भविष्यात देखील काम करत राहतील.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 13:39 IST

संबंधित बातम्या