Mohan Bhagwat Yogi Adityanath meeting राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची स्वतंत्रपणे भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. आरएसएसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी संध्याकाळी लखनऊच्या निराला नगर भागातील सरस्वती शिशु मंदिर येथे भागवत यांची सदिच्छा भेट घेतली. भागवत आणि आदित्यनाथ यांच्यात ही एकांतात झालेली चर्चा जवळपास ३० मिनिटे चालल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीने उत्तर प्रदेशच्या राजकारणात चर्चेला उधाण का आले? योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक भागवत यांच्या भेटीचा अर्थ काय? काय आहे ‘मिशन यूपी’ जाणून घेऊयात…
बैठकीत नक्की काय झाले?
बैठकीच्या अजेंड्याबाबत आरएसएस किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. आरएसएसच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले, “ही केवळ एक सदिच्छा भेट होती. भाजपाचे अनेक मंत्री आणि नेत्यांनी सरसंघचालकांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती. सरसंघचालकांच्या दौऱ्यादरम्यान अशा भेटी होतच असतात. अशा सदिच्छा भेटींमध्ये राजकीय निर्णय घेतले जात नाहीत, तिथे केवळ चर्चा होते.”
बैठकीच्या अजेंड्याबद्दल बोलताना भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, उत्तर प्रदेशच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर निश्चितपणे चर्चा झाली असेल, याचे कारण म्हणजे उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी आता फक्त एक वर्ष उरले आहे आणि राज्य सरकार तसेच भाजपा संघटना दोन्हीही ‘इलेक्शन मोड’मध्ये येत आहेत. तसेच, राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे.” काही तासांनंतर, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी गुरुवारी सकाळी त्याच ठिकाणी भागवत यांची भेट घेतली. ती बैठकही जवळपास ३० मिनिटे चालली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांची स्वतंत्रपणे भेट झाल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले.
भाजपातील अंतर्गत मतभेद आणि भागवतांच्या भेटीचे महत्त्व
केशव प्रसाद मौर्य आणि आदित्यनाथ यांच्यातील मतभेदांच्या सततच्या बातम्यांमुळे या भेटी महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. मौर्य हे भाजपाचे जुने निष्ठावान नेते असून त्यांनी आरएसएस आणि व्हीएचपीमध्येही काम केले आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा भाजपाने विजय मिळवला होता, तेव्हा ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. तेव्हापासून मौर्य हे राज्य प्रशासन आणि भाजपा संघटनेत एक शक्तिशाली नेते राहिले आहेत. असे असले तरी सत्तेची समीकरणे आदित्यनाथ यांच्या बाजूने झुकली आहेत.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मौर्य यांना त्यांच्या सिराथू मतदारसंघातून धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांच्या समर्थकांनी यासाठी अंतर्गत घातपाताला जबाबदार धरले होते, त्यामुळे मौर्य आणि आदित्यनाथ यांच्यातील संबंध अधिक ताणले गेले. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही मौर्य यांना उपमुख्यमंत्रिपदी कायम ठेवण्याचा भाजपाचा निर्णय हा पक्षांतर्गत शांतता टिकवण्याचा प्रयत्न मानला गेला.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश भाजपाच्या खराब कामगिरीनंतर योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका झाली होती, तेव्हा मौर्य यांनी पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत म्हटले होते, “पक्ष हा सरकारपेक्षा मोठा असतो.” हा मुख्यमंत्र्यांवर केलेला अप्रत्यक्ष
हल्ला मानला गेला आणि त्यातून असा संकेत दिला गेला की, मुख्यमंत्री कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून नोकरशाहीद्वारे राज्य चालवत आहेत.
गेल्या ऑक्टोबरमध्ये जेव्हा आदित्यनाथ यांच्यासह उत्तर प्रदेश सरकारमधील प्रमुख नेते दीपोत्सव साजरा करण्यासाठी अयोध्येत जमले होते, तेव्हा मौर्य यांच्या अनुपस्थितीमुळे भाजपामधील मतभेद चव्हाट्यावर आला. मौर्य यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, बिहार विधानसभा निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांनी शेवटच्या क्षणी भेट रद्द केली; तर पक्षाच्या नेत्यांनी याला प्रशासकीय गोंधळ कारणीभूत असल्याचे म्हटले. इतर काही भाजपा सूत्रांच्या मते, जाहिरातींमध्ये आपले नाव नसल्यामुळे आणि कार्यक्रमाच्या आसनव्यवस्थेची माहिती न मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी काढता पाय घेतला होता.
ब्रिजेश पाठक आणि त्यांचा ब्राह्मण समाजाशी संपर्क
दुसरे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी गुरुवारी सकाळी त्यांच्या लखनऊ येथील निवासस्थानी १०१ ‘बटुक ब्राह्मण’ (वेदांचे तरुण संस्कृत अभ्यासक) यांचा स्वागतासह सन्मान केला. त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले. पाठक यांनी आपल्या कुटुंबासह या बटुक ब्राह्मणांच्या कपाळावर टिळा लावला आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. ‘बटुकांचा सन्मान, आमचे सौभाग्य,’ असे पाठक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले. एका सूत्राने सांगितले की, सामान्यतः तक्रारींच्या निवारणासाठी अनेक लोक दररोज उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी येतात. आज बटुक ब्राह्मणही आले होते आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्या सर्वांचे स्वागत करून त्यांचा गौरव केला.
या घडामोडी उत्तराखंडमधील ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि भाजपा, तसेच आदित्यनाथ सरकार यांच्यात तणाव निर्माण झाल्यानंतर काही दिवसांतच घडल्या आहेत. जानेवारी महिन्यात, मौनी अमावास्येला त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्यापासून स्थानिक प्रशासनाने त्यांना रोखल्याबद्दल स्वामी सरस्वती यांनी प्रयागराजमध्ये ११ दिवसांचे आंदोलन केले होते. त्यांनी सत्ताधारी भाजपा सरकारवर सनातन धर्माचा अनादर केल्याचा आरोपही केला होता.
२०२७ च्या विधानसभा निवडणुका जवळ येत असताना भाजपा, समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि बहुजन समाज पार्टी (बसपा) विविध जाती समूहांचा, विशेषतः ब्राह्मण आणि दलितांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अलीकडेच, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) जातीभेद नियमांवरील स्थगितीनंतर उच्चवर्णीय समुदायांमध्ये रोष निर्माण झाला आणि राज्यभर निदर्शने झाली होती.

