राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भावी सरसंघचालकांची नियुक्ती कशी होते, तसेच एससी, एसटी प्रवर्गातील व्यक्ती सरसंघचालक बनू शकते का? या प्रश्नांवर भाष्य केले आहे. संघात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती कशी केली जाते, हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले. तसेच वयाची पंचाहत्तरी पूर्ण केल्यानंतर आता थांबण्याबाबत भागवत यांनी कार्यकर्त्यांना विचारणा केली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना काय उत्तर दिले हे मोहन भागवत यांनी सांगितले आहे.
संघात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती कशी केली जाते?
संघात पदाधिकाऱ्यांची नियुक्ती कशी केली जाते? याबाबत मोहन भागवत यांनी विधान केले आहे. ते म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्ताजी होसबाळे आणि क्षेत्र, प्रांत, विभाग, जिल्ह्याचे संघचालक यांची दर तीन वर्षांतून एकदा निवडणूक होते. यांना निवडून आणणारा मतदार वर्गदेखील स्वयंसेवकांकडून निवडून दिला जातो. ५० स्वयंसेवकांमागे एक प्रांत प्रतिनिधी असतो, आणि ४० प्रांत प्रतिनिधींच्या मागे एक अखिल भारतीय प्रतिनिधी असतो. अखिल भारतीय प्रतिनिधी हे सहकार्यवाह (सरचिटणीस) आणि क्षेत्र संघचालकांना निवडून आणतात. आणि त्यांच्या बरोबर मिळून प्रांत प्रतिनिधी हे प्रांत, विभाग, जिल्हा संघचालकांना निवडून देतात. या सगळ्याला अपवाद म्हणजे सरसंघचालकांची नियुक्ती.” संघाच्या सरसंघचालकांची नियुक्ती आणि निवृत्ती कशी होते तेही सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले आहे.
सरसंघचालकांची नियुक्ती कशी होते ?
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, “सरसंघचालक पदावर जो कोणी आहे, तोच पुढच्या सरसंघचालकांची नियुक्ती करतो. सरसंघचालक पदाला एक श्रद्धेचं स्थान मानलं जातं. त्यासाठी निवडणूक होत नाही. त्या पदावर जो कोणी असेल त्याच्याप्रती स्वयंसेवकांना श्रद्धा असते. तो त्या व्यक्तीचा मान नाही, आसनाचा मान आहे, अशा प्रकारे सरसंघचालकांची नियुक्ती होते. तर निवृत्ती कधीही होऊ शकते. कार्याने निवृत्ती आयुष्यभर होत नाही. शरीर कार्य करत असेल तर मरेपर्यंत निवृत्ती होणार नाही, पण सामान्यपणे ७५ वर्षांनंतर कोणत्याही पदाविना काम केले पाहिजे. पण संघाने त्यास अनुमती दिली तरच पद सोडता येईल. जसं की माझे ७५ वर्ष पूर्ण झाले आहेत. मी कार्यकर्त्यांना म्हणालो, आता माझे ७५ वर्ष पूर्ण झाले. ते म्हणाले, तुम्हाला काय झालं आहे, तुम्ही चालत-फिरत तर आहात. अजून काम करा. त्यामुळे मी सरसंघचालक पदावर कायम राहिलो आहे.”
निवृत्तीबाबत सरसंघचालक मोहन भागवत काय म्हणाले ?
सरसंघचालक मोहन भागवत काय म्हणाले, “मी सरसंघचालक पदावर राहावं ही माझी इच्छा नाही, कारण कार्यकर्त्याची तशी इच्छा नसावी. मी या पदावर राहू नये, असा पर्याय माझ्याकडे नाही. तो संघाकडे आहे. त्यामुळे संघ ज्यावेळी सांगेल त्यावेळी पदावरून निवृत्त होईल, कार्यापासून नाही. संघाचं काम तर जीवनभर सुरूच राहतं. निवृ्त्तीची कोणतीही निश्चित पद्धती नाही. शेवटचा थेंब (रक्ताचा) शोषून घेईपर्यंत आम्ही कोणाला निवृत्त होऊ देत नाही. कोणाला निवृत्त करावं लागलं असा क्षण आतापर्यंत आलेला नाही. तो इथून पुढेही येऊ नये अशी इच्छा आहे.”
एससी, एसटी प्रवर्गातील स्वयंसेवक सरसंघचालक होईल का ?
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, “बाकी प्रश्न राहिला संघाचा सरसंघचालक कोण बनेल ? तर कोणी ब्राह्मण संघाचा सरसंघचालक नाही बनू शकत. कोणी क्षत्रिय, वैश्य, शूद्र नाही बनू शकत. जो हिंदू आहे तोच सरसंघचालक बनेल. सरसंघचालक जो एससी, एसटी आहे तोही बनू शकतो किंवा अजून कोणी असेल तरी बनू शकतो. हे सगळं पाहून आमच्याकडे आम्ही कार्यकर्त्याची नियुक्ती करत नाही. जो काम करेल तो सरसंघचालक होईल.”
संघाला लोक “ब्राह्मणांचा संघ” का म्हणायचे ?
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, “संघाचं काम एका ब्राह्मण वस्तीतून सुरू झालं होतं. त्यावेळी लोक म्हणायचे की हा ब्राह्मणांचा संघ आहे. आम्ही त्यांना सांगायचो नाही, नाही पण लोक ऐकत नव्हते. ते पाहायचे कि आपले (जातीचे) संघात किती आहेत. आता संघाचं काम वाढलं आहे. अखिल भारतीय स्तरावरही संघात आज कोणत्या एका जातीचे लोक नाहीत, सगळ्या जातींचे लोक आहेत. सगळ्या समूहांना आज प्रतिनिधित्व मिळालं आहे. कारण संघाचं काम सर्वदूर पोहोचलं आहे. त्यामुळे उद्या एससी, एसटी सरसंघचालक होईल की नाही? याचं उत्तर मी नाही देऊ शकत. कारण ज्याला जेव्हा करायचं आहे त्यावेळी तो विचार करेल. मला जेव्हा करायचं आहे त्यावेळी मी विचार करेन. पण, त्या पदासाठी योग्य आणि उपलब्ध कोण आहे याचा विचार मी करेन. एससी, एसटी असणं ही अपात्रता नाही आणि ब्राह्मण असणं ही सरसंघचालक पदासाठी पात्रता नाही. जो उपलब्ध आणि योग्य आहे, त्याला त्या त्या वेळचे सरसंघचालक पुढील सरसंघचालक म्हणून नियुक्त करतील.”

