West Bengal Election BJP Strategy : गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. भाजपाने या निवडणुकीत १४९ मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले होते, त्यापैकी तब्बल १३२ जागांवर त्यांना दणदणीत विजय मिळाला. महायुतीला मिळालेल्या या प्रचंड श्रेय लाडकी बहीण योजनेला दिलं जात असलं तरी पडद्यामागून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पार पाडलेली भूमिकाही तितकीच महत्वाची ठरल्याचं सांगितलं जातं. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची पिछेहाट झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत संघाचे भाजपाच्या विजयासाठी मोठे प्रयत्न केल्याचं दिसून आलं होतं. आता महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही भाजपाला मदत करण्यासाठी संघाने तशीच रणनीती आखल्याचं दिसून येत आहे.
पुढील वर्षी म्हणजेच २०२७ मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीआधी हिंदू मतदारांची मोट बांधण्यासाठी भाजपाने आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. बंगालमधील हिंदू मतदारांचा भाजपासह तृणमूल काँग्रेसलाही मोठा पाठिंबा आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रत्येक शहरात “हिंदू संमेलन” आयोजित केले जाणार आहे. पश्चिम बंगालमधील हिंदू मतदारांना एकत्रित करणे हा त्यामागचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे.
पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्र पॅटर्न?
हिंदूंनी कोणत्याही परिस्थितीत आपल्या मतांमध्ये फूट पडू द्यायची नाही, असं आवाहन संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी केलं होतं. त्यांच्या या आव्हानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ नारा दिला. पुढच्याच दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी एक घोषणा दिली. याच घोषणांमुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर परिणाम होऊन महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं, असं राजकीय विश्लेषक सांगतात.
आणखी वाचा : ठाकरे गट की भाजपा, मनसेबरोबरची युती कुणासाठी फायदेशीर? आकडेवारी काय सांगते?
दरम्यान, पश्चिम बंगालमधील हिंदू मतदारांना एकत्रित आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केलेले हे अभियान संघाच्या स्थापनेच्या १०० वर्षांचा भाग म्हणून राबविले जाणार आहे, ज्याची सुरुवात दुर्गापूजेनंतर होणार आहे. मात्र, हा उपक्रम केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता, राज्यातील तळागाळात हिंदूमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एक व्यापक सामाजिक प्रयत्न असेन, असं संघाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितलं आहे.
बंगालमधील हिंदू मतांचे विभाजन
- २०११ च्या जनगणनेनुसार, पश्चिम बंगालची लोकसंख्या सुमारे ९.१३ कोटी होती, त्यापैकी सुमारे ७०.५% लोक हे हिंदू समुदायातील आहेत.
- मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसलाही बऱ्याच हिंदू मतदारांनी पाठिंबा दिलेला आहे.
- २०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाला एकूण ३८.१% मते मिळाली होती.
- लोकनिती-सीएसडीएसच्या अभ्यासानुसार, या निवडणुकीत भाजपाला जवळपास ५० टक्के हिंदू मतदारांनी पाठिंबा दिला होता.
- विशेष बाब म्हणजे, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही बंगालमधील ५७% हिंदू मतदारांनी भाजपालाच समर्थन दिले होते. तरीही विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचाच विजय झाला.
- उत्तर प्रदेश आणि आसाममधील विभाजित हिंदू मतदारांना आपल्याकडे खेचून आणण्यास भाजपाला याआधी यश मिळालं आहे.
- पश्चिम बंगालमध्ये मात्र भाजपाला हिंदू मतदारांची मोट बांधण्यात काहीसं अपयश आलेलं आहे,अजूनही बरेच हिंदू मतदार हे तृणमूल काँग्रेसच्याच पाठिशी असल्याचं सांगितलं जात आहे.

आरएसएसचे हिंदू अभियान कसे असेल?
दरम्यान, हिंदू मतदारांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी भाजपा पश्चिम बंगालच्या विविध भागात भव्य अभियान राबविणार आहे. तळागाळातील हिंदू मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाकडून स्थानिक वस्तीत संमेलने घेण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे, या कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केले जाणार आहे. कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो, सर्व हिंदूंना कोणत्याही भेदभावाशिवाय कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येईल, असे संघाच्या सूत्रांनी सांगितले आहे.
संघाचे संमेलन कधीपासून सुरू होणार?
संघाच्या काही कार्यक्रमांना महालया (दुर्गापूजेपूर्वीचा दिवस) पासूनच सुरुवात होणार आहे, ही वेळ देशातील इतर भागांतील विजयादशमीच्या कार्यक्रमांपेक्षा आधीची असेल. हिंदू संमेलने जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण स्वरूपात सुरू होतील, असा अंदाज आहे. दक्षिण बंगाल प्रांतातील संघाचे प्रचारप्रमुख बिप्लब रॉय यांनी ‘News18’ला सांगितले की, “आरएसएस गेली १०० वर्षे समाजासाठी कार्य करीत आहे. बंगालच्या प्रत्येक भागात जाऊन आम्ही हा संदेश पोहोचवणार आहोत. आम्ही प्रत्येक खंडामध्ये हिंदू संमेलने घेणार असून लोकांशी थेटपणे संवाद साधणार आहोत. यादरम्यान घरोघरी जाऊन अभियान राबवले जाईल. काही संमेलनांमध्ये हिंदू धर्माचे संतही मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, प्रत्येक गावातील ‘मोरोल’ म्हणजे प्रभावशाली व्यक्तींना यामध्ये सहभागी करून त्यांचा प्रभाव वापरण्याचा प्रयत्न केला जाईल.”
हेही वाचा : मंत्रिमंडळातून हकालपट्टी होताच भाजपा आमदाराने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; गोवा विधानसभेत नेमकं काय घडलं?
हिंदू संमेलनामुळे बंगालचे चित्र बदलेल का?
भेदभाव न करता सर्व हिंदूंना सहभागी करून घेण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टिकोन पश्चिम बंगालच्या राजकारणात अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. कारण, गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाला बंगालमध्ये हिंदू मतांची एकजूट घडवून आणण्यास अपयश आलेलं आहे. दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत यांनी फेब्रुवारीमध्ये पश्चिम बंगालचा दौरा केला होता. यावेळी बर्धमान येथील एका सभेला संबोधित करताना ‘संघ नेहमी हिंदू समाजाकडेच का लक्ष देतो असे लोक विचारतात. हिंदू समाज हा देशासाठी जबाबदार आहे,’ असे ते म्हणाले.
“हिंदू हे संपूर्ण देशाची विविधता एकसंध ठेवतात”
संघाविषयी माहिती विचारणाऱ्या लोकांना उत्तर द्यायचे असेल तर संघ हिंदू समाजाला एकजूट करू इच्छितो कारण देशासाठी जबाबदार असलेला समाज हिंदू आहे. भारतात कोणीही सम्राट-महाराजांची आठवण ठेवत नाही, पण पित्याने दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी १४ वर्षे वनवासात गेलेला राम आणि बंधू भरत आठवतात, हीच वैशिष्ट्ये भारताची व्याख्या करतात असेही मोहन भागवत म्हणाले होते. या मूल्यांचे पालन करणारे लोक हिंदू आहेत आणि ते संपूर्ण देशाची विविधता एकसंध ठेवतात. आम्ही इतरांना दुखावणाऱ्या कृती करत नाही असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, भाजपाने पश्चिम बंगालमधील हिंदूंची एकजूट करण्यासाठी सुरू केलेलं अभियान नेमकं किती यशस्वी ठरणार? याचा पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.