Rupali Chakankar Controversy Details Regarding Ashok Kharat And Past Political Disputes : अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या सिन्नर तालुक्यातील भोंदू अशोक खरातविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याच्या कार्यालयातून५८ चित्रफिती असलेला पेन ड्राईव्ह सापडला आहे. या चित्रफितींमध्ये राजकीय मंडळींसह विविध क्षेत्रातील नामांकित महिलांचाही समावेश आहे. त्यामुळे गोपनियता पाळली जात आहे. राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांच्याबरोबरही अशोक खरातचे छायाचित्र असून खरातच्या श्री शिवनिका संस्थानमध्ये त्या विश्वस्त आहेत. त्यामुळे महिला अत्याचाराचा गुन्हा असलेल्या आरोपीबरोबर रुपाली चाकणकरांचे फोटो प्रसिद्ध झाल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. याआधीही रुपाली चाकणकर विविध वादांमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी राहिल्या असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती.

रुपाली चाकणकर कोण आहेत? (Who is Rupali Chakankar)

रुपाली चाकणकर या मुळच्या दौंडमधील असून रयत शिक्षण संस्थेच्या साधना महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलंय. त्यांच्या माहेरच्या घरी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. परंतु, सासरी राजकीय पार्श्वभूमी असल्याने त्या या क्षेत्रात आल्या. रुपाली चाकणकर यांच्या सासूबाई रुक्मिणी चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. त्यामुळे रुपाली चाकणकर यांना राजकारणात येण्याचा मार्ग सुकर झाला.

२००२ पासून त्यांनी ५ ते ६ वर्षे महिला बचत गटासाठी काम केलं होतं. त्यानंतर त्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या महिला अध्यक्षा झाल्या. येथून त्या थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या पुण्यातील शहर अध्यक्ष बनल्या. दरम्यानच्या काळात म्हणजेच २०१९ मध्ये तत्कालीन राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ भाजपात गेल्याने सुप्रिया सुळे यांनी तडकाफडकी रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती केली.

२०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पावणे दोन वर्षे राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे महाविकास आघाडीवर सातत्याने टीका होत होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांना या पदाची जबाबदारी २०२१ मध्ये देण्यात आली. मात्र पुढे राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांना महिला संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सोडण्यास सांगितले गेले. तेव्हापासून रुपाली चाकणकर सातत्याने चर्चेत राहिल्या.

अशोक खरात प्रकरण

अंकगणिताच्या आधारे भविष्य सांगणाऱ्या अशोक खरातकडे अनेक राजकीय नेत्यांचे येणे-जाणे असते. त्यातच, रुपाली चाकणकर यांचाही समावेश आहे. रुपाली चाकणकर यांचे त्यांच्याबरोबरचे अनेक फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. ज्यात चाकणकरांनी खरातचे पाद्यपूजन केले आहे. त्याच्या डोक्यावर छत्री धरली. या फोटोंमुळे रुपाली चाकणकरांवर सोशल मीडियावर टीका होत आहे. याप्रकरणी चाकणकरांनी प्रतिक्रियाही दिली आहे. “शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून काहीवेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात, त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेले होतो. ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही, आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलिस निष्पक्षपणे चौकशी करतील, पोलिस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरण

यावर्षीच्या सुरुवातीलाच दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला. उच्च शिक्षित असलेल्या दीप्तीने सासरच्या जाचाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याने राज्य महिला आयोगावर ताशेरे ओढले गेले. वैष्णवी हगवणे प्रकरण झाल्यानंतर, अशा घटनांना आळा घालण्याकरता राज्य सरकारकडून कठोर पावले उचलली जात असताना पुन्हा अशी प्रकरणे राज्यात वारंवार का घडतात असा प्रश्न उपस्थित करून दीप्ती चौधरीच्या कुटुंबियांनी रुपाली चाकणकर यांना घेरलं होतं.

संपदा मुंडे प्रकरण

फलटण येथील डॉ. संपदा मुंडे प्रकरणातही रुपाली चाकणकर वादात सापडल्या होत्या. २०२५ च्या ऑक्टोबर महिन्यात डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी आत्महत्या केलेल्या मुलीच्याच चारित्र्याचे हनन केल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तत्कालीन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली होती. महिला आयोग महिलांच्या सुरक्षिततेसाठी आहे. त्यांनी प्रथम पीडित कुटुंबाला भेटायला हवे होते, असं अजित पवार म्हणाले होते. रुपाली चाकणकरांनी आरोपीच्या घरी जाऊन त्यांचे निवेदन घेतल्याने पवारांनी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर आला होता. तसंच, अजित पवारही त्यांच्यावर नाराज असून त्यांचा राजीनामा घेण्याची शक्यता आहे, अशी तेव्हा चर्चा होती.

वैष्णवी हगवणे प्रकरण

गेल्यावर्षी मे महिन्यात पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या हुंडाबळीच्या प्रकरणामुळे पुरोगामी महाराष्ट्राच्या संस्कृतीला यामुळे धक्का लागला होता. या प्रकरणावरूनही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर चर्चेत आल्या. कारण, या प्रकरणी वैष्णवी हगवणे यांच्या जाऊबाई मयुरी हगवणे यांनी महिला आयोगाला तक्रार करून सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाविषयी माहिती दिली होती. मात्र, त्याची दखल घेतली नाही असा दावा मयुरी हगवणे यांनी केला. हे पत्र पाठवल्यानंतर सहा महिन्यांनी वैष्णवी हगवणेने आत्महत्या केली. त्यामुळे महिला आयोगावर आक्षेप घेण्यात आले. दरम्यान, याविषयीही रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली होती. मयुरी हगवणे यांच्या पत्रावर २४ तासांच्या आता कार्यवाही केली होती, असा दावा रुपाली चाकणकर यांनी केला होता. दरम्यान, हे प्रकरण अद्यापही न्यायप्रविष्ट आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण

भाजपाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिशा भिसे यांचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडून उपचारासाठी पैशांची अडवणूक केल्याने गर्भवती तनिशा यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. यावेळीही रुपाली चाकणकर वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या.