पुणे : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या रुपाली चाकणकर यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्षपद कायम आहे. मात्र, आता त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यासाठी पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून मागणी करण्यात येत असल्याने चाकणकर यांचे ‘राष्ट्रवादी‘चे महिला प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या पुणे शहर कार्याध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी चाकणकर यांना अटक करून त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून काढून टाकण्याची उघडपणे मागणी केली आहे. चाकणकर यांच्या पदाचा राजीनामा घेतला नाही, तर पक्ष सोडण्याची तयारी असल्याचेही रुपाली पाटील-ठोंबरे यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांच्या पदाच्या राजीनाम्यासाठी अन्य पदाधिकारी आग्रही असल्याचे सांगण्यात आले.
रूपाली पाटील-ठोंबरे आणि रूपाली चाकणकर यांच्यातील राजकीय संघर्ष नवीन नाही. मात्र, यावेळी रूपाली पाटील यांनी उघडपणे ही मागणी केल्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. केवळ रूपाली पाटील-ठोंबरेच नव्हे, तर पक्षातील इतरही महिला पदाधिकाऱ्यांकडून चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली जाणार असल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवून देण्यात आल्यानंतर या पक्षातील काही महिला पदाधिकारी या प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक होत्या. मात्र, चाकणकर यांच्याकडेच या पदाची जबाबदारी देण्यात आल्याने महिला पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. आता त्या पदाधिकाऱ्यांकडून चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणी करण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार ?
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे नाव आल्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी ‘सद्य:परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर चाकणकर यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टिकाेनातून चाकणकर यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत आहे.’ अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमावरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. आता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाबाबत त्या काय निर्णय घेणार, याकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
चाकणकरांच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडीपासूनच पक्षांतर्गत नाराजी?
रुपाली चाकणकर यांची तत्कालीन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून २०१९ मध्ये नियुक्ती करण्यात आली. तत्पूर्वी त्या पुण्याच्या शहराध्यक्षा होत्या. चाकणकर यांच्यापूर्वी हे पद चित्रा वाघ यांच्याकडे होते. मात्र, चित्रा वाघ यांनी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर चाकणकर यांची या पदावर वर्णी लागली. तेव्हा प्रदेशाध्यक्ष पदासाठी रुपाली पाटील ठोंबरे यांचे नाव चर्चेत होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर, अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’च्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून चाकणकर यांची नियुक्ती झाली. त्यांच्या या निवडीपासूनच पक्षात नाराजी असल्याचे चित्र निर्माण झाले होते. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाकडे ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
