मुंबई : भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या जवळीकीमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्याव्या लागलेल्या रुपाली चाकणकर यांचे गेल्या सहा-सात वर्षांत राष्ट्रवादीच्या अंतर्गत वर्तुळात एकदम महत्त्व वाढले होते. तक्रारींमुळे पुणे शहर महिला अध्यक्षपदावरून त्यांची उचलबांगडी करण्यात आल्यावर थेट महिला प्रदेशाध्य तसेच राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविण्याची त्यांना संधी मिळाली. चाकणकर यांची एवढी राजकीय अपरिहार्यता का होती, याचाच पक्षातील भल्याभल्यांना प्रश्न पडला आहे.
अशोक खरात या भोंदूबाबाचे लैगिक शोषणाचे चाळे उघड झाले तेव्हा रुपाली चाकणकर यांची या भोंदूबाबाबरोबरची छायाचित्रे समाज माध्यमातून प्रसारित झाली. चाकणकर यांच्यावर विविध आरोप होऊ लागले. भोंदूबाबाबरोबरील जवळीक व त्यातून समोर आलेली छायाचित्रे यावरून चाकणकर या वादग्रस्त ठरल्या होत्या. आरोप होत असताना सुरुवातीला दोन दिवस चाकणकर या गप्प होत्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही काही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत नव्हती. हे प्रकरण अधिक चिघळू लागताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करीत चाकणकर यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला. राष्ट्रवादीच्या नेत्यांचाही नाईलाज झाला. शेवटी चाकणकर यांनी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यावरही चाकणकर यांची खुमखुमी कमी झालेली नाही. त्यांचे सारे प्रताप उघड करणाऱ्यांच्या विरोधात बदनामीचा खटला गुदरण्याची भाषा त्यांनी केली आहे.
कोण आहेत रुपाली चाकणकर ?
रुपाली चाकणकर या पुण्याच्या. त्यांचे पती आधी राष्ट्रवादीत सक्रिय होते. त्यानंतर रुपाली चाकणकर या पक्षात काम करू लागल्या. पुणे महानगरपालिकेची निवडणूक त्यांनी लढविली होती व त्यात त्यांचा पराभव झाला. पक्षात काम करीत असतानाच त्यांची पुणे शहर महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पण तेव्हा त्यांच्या विरोधात तक्रारी आल्या होत्या. यातूनच त्यांची महिला अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. या घडामोडी घडत असतानाच तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. नवीन चेहऱ्याला संधी म्हणून राष्ट्रवादीने रुपाली चाकणकर यांची राज्य महिला अध्यक्षपदी निवड केली. तेव्हापासून त्यांनी राजकीय प्रवासात मागे वळून बघितले नाही. पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची त्यांची इच्छा होती. पण पक्षाने तेव्हा उमदेवारी दिली नव्हती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर महिला आयोगाचे अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आले. राष्ट्रवादीने मग चाकणकर यांना संधी दिली. २०२१ पासून गेली पाच वर्षे चाकणकर या पदावर कायम होत्या.
राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविताना त्यांची भूमिका वादग्रस्त ठरली होती. गेल्याच वर्षी पुण्यातील वैशाली हगवणे यांच्या हत्येप्रकरणी अनेक आरोप झाले. राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे यांना वाचविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप झाला होता. तेव्हा चाकणकर यांची भूमिका संशयास्पद ठरली होती. महाविकास आघाडीचे सरकार असताना संजय राठोड यांच्यावर एका युवतीच्या आत्महत्या प्रकरणावरून आरोप झाला होता. त्यातून राठोड यांना मंत्रिपदाजा राजीनामा द्यावा लागला होता. पण चाकणकर यांनी यावर मौन बाळगले होते. त्यावरून भाजपने त्यांच्यावर टीकाही केली होती. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करीत भाजपशी हातमिळवणी केली. सरकारमध्ये राष्ट्रवादी सहभागी झाला. ऑक्टोबर २०२४ मध्ये चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची मुदत संपताच त्यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असताना महिलांच्या प्रश्वांवर चाकणकर या कधीच ठाम राहिल्या नाहीत, अशी टीका त्यांच्यावर सातत्याने होत असे.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड होण्यापूर्वी चाकणकर या कधी महिला चळवळीत सक्रिय होत्या, असेही कधी बघायला मिळाले नाही. अजित पवार यांनी रुपाली चाकणकर यांना पक्षात नेहमीच संधी दिली. यामुळेच अजित पवारांच्या बंडानंतर चाकणकर यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनीही कायम चाकणकर यांची पाठराखण केली. नेतृत्वाचा आशीर्वाद असल्याने चाकणकर यांचे पक्षात महत्त्व वाढले होते. २०२४च्या विधानसभा निवडणुकीत खडकवासला मतदारसंघ युतीत भाजपकडे असल्याने चाकणकरांना निवडणूक लढण्याची संधी मिळाली नव्हती. विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू होता. लवकरच होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत संधी मिळणार, असे सांगण्यात येत होते. पण भोंदूबाबाशी जवळीक त्यांना नडली.
यापूर्वी वादात अडकल्यावर अजित पवार किंवा पक्षातील नेते सांभाळून घेत असत. अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार वा पार्थ पवार तेवढे महत्त्व देण्याची शक्यता नाही. अन्य नेतेही त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची चिन्हे दिसत नाही. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे किंवा स्वपक्षीय रुपाली ठोंबरे या महिला नेत्यांनी चाकणकर यांच्या साऱ्या प्रतापांवर प्रकाश टाकला. त्यामुळे महिला आयोगाचे अध्यक्षपद गेले व आमदारकी मिळण्याची शक्यताही मावळली आहे.
