TMC MP Sayoni Ghosh Rebellion updates in West Bengal : विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले. आधीच पक्षातील अनेक आमदार आणि खासदार बंडखोरीच्या तयारीत असतानाच त्यात आणखी एका नावाची भर पडल्याचे वृत्त समोर आले. तृणमूलच्या आक्रमक नेत्या तथा खासदार सायोनी घोष यादेखील बंडखोरांच्या गोटात सामील होणार असल्याची चर्चा आहे. एकेकाळी ममता बॅनर्जी यांच्या सर्वात निष्ठावान शिलेदार मानल्या जाणाऱ्या तरुण नेत्याच पक्षापासून दुरावत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर सायोनी घोष यांच्या राजकीय कारकीर्दीचा घेतलेला हा सविस्तर आढावा…

कोण आहेत सायोनी घोष?

सायोनी घोष या बंगाली चित्रपट क्षेत्रातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. २०१० मध्ये त्यांनी अभियन क्षेत्रात पर्दापण केले आणि त्यानंतर अनेक यशस्वी बंगाली चित्रपटांमधून आपली ओळख निर्माण केली. २०२१ मध्ये त्यांनी पश्चिम बंगालच्या तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पक्षाने त्यांना आसनसोल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराने सायोनी यांचा दारुण पराभव केला. तरीदेखील २०२३ मध्ये तृणमूल काँग्रेसने त्यांची पक्षाच्या युवा शाखेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सायोनी घोष यांना जाधवपूर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली, जिथे त्यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून वयाच्या ३१ व्या वर्षी संसदेत प्रवेश केला. अलीकडेच सायोनी यांची पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदीही नियुक्तीही झाली. तृणमूल काँग्रेसमधील सर्वात सशक्त आणि तरुण नेत्या म्हणून त्यांना लोकप्रियता मिळाली.

वादग्रस्त विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही सायोनी यांनी आक्रमक प्रचार करून सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. ममता बॅनर्जी यांच्या प्रचारसभेत त्या सातत्याने मंचावर दिसून आल्या. निवडणूक प्रचारादरम्यान सायोनी घोष यांचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओत त्या प्रचारमंचावरून विविध धर्मांच्या प्रार्थनांचे पठण करताना दिसून आल्या. तसेच एका सभेत त्यांनी जातीय सलोख्याचा संदेश देण्यासाठी “मेरे दिल में है काबा, और मेरी आंखों में मदीना” ही ओळ गायली होती. यानंतर त्यांचे नाव ‘काबा’ आणि ‘मदीना’ या संदर्भांमुळेही चर्चेत आले. दरम्यान, एप्रिल महिन्यात आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढा यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर सायोनी घोष यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यांनी चड्ढा यांच्या पक्षबदलाचा संदर्भ देत ‘चड्डी’ या शब्दाचा वापर केला होता, ज्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला.

Sayoni Ghosh TMC Rebellion
खासदार सायोनी घोष आणि ममता बॅनर्जी चर्चा करताना

ममतांचा भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख

भाजपाच्या काही नेत्यांनी सायोनी यांच्यावर शीख आणि पंजाबी समुदायाचा अपमान केल्याचा आरोप करत तीव्र टीका केली होती. या प्रकरणामुळे त्या राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आल्या होत्या. बंगालमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी सायोनी यांनी ममता बॅनर्जी यांना भावी पंतप्रधान म्हणून संबोधले होते. तसेच निवडणूक निकालानंतर त्यांनी मतांची चोरी झाल्याचा आरोप करत, “आम्ही पराभूत झालेलो नाही. ममता बॅनर्जी यांचा पराभव मतांची लूट करून घडवून आणला गेला आहे. २०२९ मध्ये देशातील जनता आणि २०३१ मध्ये पश्चिम बंगालमधील मतदार भाजपाच्या मतचोरीला चोख प्रत्युत्तर देईन, असे त्या म्हणाल्या होत्या. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सायोनी यांची एकूण मालमत्ता ९१.८९ लाख इतकी आहे. त्यांच्यावर ५९ लाखांचे कर्जही आहे. सायनी घोष यांचे कोलकाताच्या गोल्फ ग्रीन परिसरात ६२.६४ लाखांचा एक आलिशान बंगला असून त्यांच्याकडे अलिशान कारही आहे.

सायोनी घोष ममता बॅनर्जींची साथ सोडणार?

सायोनी घोष यांनी खासदार काकोली घोष दस्तिदार यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाला पाठिंबा दिल्याचे वृत्त आहे. हा बंडखोर गट भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. ‘न्यूज १८’ ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायोनी घोष यांनी बंडखोर गटाला पाठिंबा देणाऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षरीदेखील केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षात आपले राजकीय भविष्य आता सुरक्षित नाही, असे त्यांना वाटत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सायोनी यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक प्रचारादरम्यान जेव्हा सायोनी यांच्यावर चहुबाजूंनी टीका आणि हल्ले होत होते, तेव्हा पक्ष नेतृत्वाकडून त्यांना अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे त्या पक्षावर तीव्र नाराज होत्या. कठीण काळात पक्षातील कोणताही नेता आपल्या पाठीशी उभे राहिला नाही आणि आपल्याला एकटे पाडण्यात आल्याची भावनाही त्यांच्या मनात निर्माण झाली होती. यादरम्यान सायोनी घोष यांनी जर खरोखरच ममता बॅनर्जी यांची साथ सोडली, तर तो तृणमूल काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जाईल. कारण- नुकतीच त्यांची पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. या सर्व घडामोडींवर सायोनी घोष यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी मात्र सायोनी यांनी आपल्या गटाला पाठिंबा दिल्याचा म्हटले आहे. त्यामुळे सायोनी घोष खरंच बंडखोरांच्या गटात सामील होणार की ममतांनी एकनिष्ठ राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.