पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि गटबाजीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने गेल्या आठवड्यात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. अखिल भारतीय काँग्रेस समितीने पंजाबचे प्रभारी म्हणून भूपेश बघेल यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी सचिन पायलट यांची नियुक्ती केली. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या भूपेश बघेल यांच्यावर पंजाब प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वडिंग यांची तळी उचलल्याचा आरोप होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या अमरिंदर सिंह आणि जालंधरचे खासदार चरणजीत सिंह चन्नी यांच्यात तीव्र वाद सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधी अमरिंदर सिंह यांची प्रदेशाध्यपदावरून हकालपट्टी करून त्यांच्या जागी आपल्या पसंतीच्या व्यक्तीची नियुक्ती करण्याची मागणी चन्नी यांनी केली आहे.
पंजाबमधील काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?
भूपेश बघेल यांनी दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चन्नी यांनी तडजोडीचे सर्व प्रयत्न फेटाळून लावल्याचे दिसून आले. पंजाब काँग्रेसमधील या वादावर पक्षातील एका ज्येष्ठ खासदाराने दी इंडियन एक्स्प्रेसला प्रतिक्रिया दिली. पंजाबचे प्रभारी म्हणून भूपेश बघेल यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी सचिन पायलट यांची नियुक्ती करण्यात आल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणखीनच बळ मिळेल. सचिन पायलट यांच्यासारख्या तटस्थ नेत्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आल्याने ते नव्याने सुरुवात करतील आणि सर्वांचे म्हणणे ऐकून घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यादरम्यान काँग्रेस पक्षश्रेष्ठीने भूपेश बघेल यांना आता आसामचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली. या निवडीनंतर त्यांनी पक्षनेतृत्वाचे आभार मानले असून नव्याने नियुक्त करण्यात आलेले सर्व सरचिटणीस आणि राज्य प्रभारींचेही अभिनंदन केले. त्याचबरोबर पंजाबमधील सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांनी आपल्याला केलेल्या सहकार्याचेही त्यांनी कौतुक केले आहे.
चरणजीत सिंह चन्नी यांनी मानले पक्षाचे आभार
दुसरीकडे- चरणजीत सिंह चन्नी यांनीही पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या फेरबदलाच्या निर्णयाचे तातडीने स्वागत केले. पंजाब काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस म्हणून नियुक्त झाल्याबद्दल सचिन पायलट यांचे मनःपूर्वक अभिनंदन. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचे मनापासून आभार, असे त्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले. या फेरबदलाचे स्वागत करतानाच प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वडिंग यांनी भूपेश बघेल यांच्या कामाचे कौतुक केले. पंजाबमधील आपल्या कार्यकाळात बघेल यांनी पक्षाची तळागाळात मोट बांधण्यासाठी मोठा हातभार लावला. तसेच त्यांचे मार्गदर्शन अत्यंत महत्वाचे ठरले. वैयक्तिकरित्या मी बघेल यांच्याकडून खूप काही शिकलो आहे आणि त्यांचा सदैव ऋणी राहीन, असे अमरिंदर सिंह यांनी नमूद केले. सचिन पायलट यांच्या ‘ऊर्जा आणि गतिमान नेतृत्वामुळे’ आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला नवी ताकद आणि जोश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनीही पायलट यांच्या नियुक्तीचे स्वागत केले.
भूपेश बघेल यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप
यादरम्यान चरणजीत सिंह चन्नी यांच्या निकटवर्तीय असलेल्या काँग्रेसच्या एका नेत्याने भूपेश बघेल यांच्या पक्षपाती भूमिकेमुळेच त्यांची प्रभारीपदावरून बदली झाल्याचा दावा केला. “हा निर्णय आमच्यासाठी मोठा दिलासा आहे. बघेल यांना जनतेची तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नाडी ओळखण्यात अपयश आले. राज्यात काँग्रेसच्या काम करण्याच्या पद्धतीत बदलाची गरज असल्याचे आम्ही त्यांना वारंवार सांगितले; पण त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही. आगामी काळात अमरिंदर सिंह यांनाही प्रदेशाध्यपदावरून हटवले जाईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यानंतर काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला पूर्ण ताकदीने सुरुवात करू शकेल,” असे या नेत्याने सांगितले. गुरदासपूरचे खासदार आणि राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा यांनीही सचिन पायलट यांचे अभिनंदन केले.
भूपेश बघेल यांचा प्रभाव कसा कमी झाला?
पंजाबमध्ये गेल्या काही महिन्यांपासून चरणजीत सिंह चन्नी आणि अमरिंदर सिंह राजा वडिंग यांच्या गटांमध्ये सत्तासंघर्ष सुरू आहे. सध्याच्या प्रदेशाध्यक्षांच्या कामकाजाच्या पद्धतीवर नाराज असलेल्या चन्नी गटाकडून अमरिंदर सिंह यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली जात आहे. पंजाब काँग्रेसमधील हा अंतर्गत संघर्ष मिटवण्यासाठी भूपेश बघेल यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. याकरिता त्यांनी चंदीगडमध्ये बैठका घेतल्या तसेच वडिंग यांच्यासोबत अनेक जिल्ह्यांचे दौरे केले. यादरम्यान बघेल यांनी दोन्ही गटांमधील वादाला सार्वजनिकपणे ‘मतभेद’ असे स्वरूप दिले आणि पक्षातील शिस्तभंग खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही दिला. जवळपास ९२ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर बघेल यांनी १५ जुलै रोजी काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे अहवाल सादर केला. विद्यमान नेतृत्व व्यवस्थेत तातडीने बदल करण्याची गरज नसल्याचे त्यांनी या अहवालातून सूचित केले. यानंतर पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने पंजाब काँग्रेसच्या नेतृत्व व्यवस्थेत तातडीने कोणताही बदल केला नाही. त्यामुळे चन्नी गटात नाराजी वाढली आणि माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याबद्दल असंतोष निर्माण झाला.
भूपेश बघेल यांना का हटवण्यात आले?
भूपेश बघेल यांच्या अथक प्रयत्नांनंतरही पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष थांबला नाही. जुलैच्या अखेरीस बघेल दुसऱ्यांदा पंजाब दौऱ्यावर गेले असताना चन्नी गटाने त्यांच्या विरोधात ‘बघेल वापस जाओ’ अशी घोषणाबाजी केली. गेल्या महिन्यात श्री मुक्तसर साहिब शहरात पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी चन्नी गटाने बघेल यांना लक्ष्य करणारे पोस्टर्सही लावले होते. याबाबत काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वातील एका वरिष्ठ सूत्राने सांगितले की, पंजाबमधील पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात भूपेश बघेल यांच्याविषयी पक्षपातीपणाची भावना निर्माण झाली होती. ते अमरिंदर सिंह यांनाच झुकते माप देत असल्याचे अनेकांचे म्हणणे होते. कार्यकर्त्यांचीह हीच नाराजी लक्षात घेता पक्षनेतृत्वाने त्यांना प्रभारी पदावरून हटवले. दुसरीकडे- काँग्रेसमधील एका गटाने या फेरबदलाचा पंजाब काँग्रेसमधील नाराजीशी संबंध नसल्याचा दावा केला. हा केवळ ‘नियमित फेरबदलाचा’ भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसमधील इतर महत्त्वाच्या नियुक्त्या
या संघटनात्मक फेरबदलाचा एक भाग म्हणून काँग्रेसने आणखी काही महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या. रणदीप सिंह सुरजेवाला यांच्याकडे गुजरातच्या प्रभारी सरचिटणीसपदाची धुरा सोपवण्यात आली. २०२७ च्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. यासोबतच सुरजेवाला यांच्याकडे कर्नाटकचे प्रभारीपदही कायम राहणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. झारखंडमधील लोहरदगा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार सुखदेव भगत यांची छत्तीसगडच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली असून, ते सचिन पायलट यांची जागा घेतील. तसेच, महाराष्ट्राच्या काँग्रेस प्रभारीपदी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी केरळचे माजी गृहमंत्री रमेश चेन्निथला यांची जागा घेतली आहे. याशिवाय, कर्नाटकचे आमदार पी. व्ही. मोहन यांच्याकडे आंध्र प्रदेशच्या पक्षकारभाराची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी मणिकम टागोर यांची जागा घेतली असून, टागोर यांची आता तामिळनाडू प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
