मुंबई : मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्या पत्रप्रपंचामुळे तुरुंगात जावे लागलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझे या तुरुंगात असलेल्या अधिकाऱ्याने वसुलीचा आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस व अनिल देशमुख यांच्यात सध्या सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर तुरुंगात असलेल्या वाझे याचे पत्र तसेच त्याने केलेला आरोप यामुळे यामागे राजकीय किनार असल्याचीच चर्चा सुरू झाली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे स्वीय सहाय्यकाच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, असा गंभीर आरोप निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने केला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून वाझे हा तळोजा कारागृहात आहे. त्याला शुक्रवारी रात्री वैद्याकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात आणले होते, तेव्हा ‘एएनआय’ या वृत्तवाहिनीशी बोलत वाझे याने खळबळ उडवून दिली.

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांपर्यंत त्यांच्या स्वीय सहायकांमार्फत पैसे जायचे. केंद्रीय अन्वेषण विभागाकडे याचे पुरावे आहेत. मी स्वत: देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याची माहिती दिली आहे. मी सर्व पुरावे दिले आहेत. मी नार्को चाचणीसाठी तयार आहे. मी माजी मंत्री जयंत पाटील यांचेसुद्धा याप्रकरणी नाव दिले आहे. मी त्या पत्रात सर्व काही लिहिले आहे, असे वाझे याने वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. सचिन वाझे हा उद्याोगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर बॉम्ब ठेवणे आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी आहे.

हेही वाचा >>>कारण राजकारण: पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये ‘काट्या’ची लढत?

‘आपण गृहमंत्री असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईपासून वाचण्यासाठी प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर वाझे यांच्या आरोपांनी या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.

‘भाजपचे गलिच्छ राजकारण’

अनिल देशमुख यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाने आरोपपत्र दाखल केले असून त्यात या शंभर कोटी वसुलीचा कसलाही उल्लेख नाही. केवळ सत्तेत येण्यासाठी भाजपाने शंभर कोटी वसुलीचे गलिच्छ राजकारण केले होते. वाझे यांचे आरोप नियोजनपूर्वक आहेत, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. सचिन वाझे हा पोलीसांच्या ताब्यात असताना प्रसिद्धी माध्यमांशी बोलण्यास त्याला संमती कशी दिली, अशी विचारणा करत बंदोबस्तावरील पोलिसांचे निलंबन करावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेस समितीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.

जयंत पाटील यांच्या चौकशीची गरज गिरीश महाजन

नाशिक : मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्रात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव असेल तर कोणी काय कारनामे केले, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केली. अनिल देशमुख हे स्वत:चा बचाव करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

फडणवीस यांचा गुन्हेगारांशी पत्रव्यवहार जयंत पाटील

वाझे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही आरोप केले. यावर खुलासा करताना पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगातून पत्र लिहिले असे वाझे म्हणतो. यावरून तुरुंगातील गुन्हेगारांशी फडणवीस यांचा पत्रव्यवहार सुरू आहे का, असा सवाल पाटील यांनी केला. दोन वर्षे वाझे एकदम शांत होता. अचानक तो पत्र लिहितो हा काही योगायोग नाही, असेही पाटील यांनी म्हटले आहे. कोण कोणाच्या सांगण्यावरून पत्र लिहितोय हे राज्यातील जनतेला कळते आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला.