SP Congress Loksabha Battle Plan लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये अखेर समाजवादी पार्टी (सपा) आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. दोन्ही पक्षात जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. परंतु, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांना मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचारात समन्वय राखण्याचे आव्हान आहे. २०१७ मधील उत्तर प्रदेश निवडणुकीत समाजवादी पार्टी (सपा) आणि काँग्रेस एकत्र आले होते, परंतु मतांचे हस्तांतरण करण्यात त्यांना अपयश आलं. पक्षातील स्थानिक नेत्यांनी सांगितले की, त्यांना अद्याप निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करण्यासाठी युतीतील पक्ष श्रेष्ठींकडून कोणत्याही सूचना मिळाल्या नाहीत.

२५ फेब्रुवारीला गोंडा येथील सपा नेत्यांनी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाला भेट दिली होती आणि माजी केंद्रीय मंत्री बेनी प्रसाद वर्मा यांची नात, सपा उमेदवार श्रेया वर्मा यांच्या समर्थनार्थ मिळून काम करण्यावर चर्चा केली. या आठवड्यात सपाचे आंबेडकर नगरचे उमेदवार लालजी वर्मा यांनी काँग्रेस जिल्हा कार्यालयाला भेट दिली आणि बैठक घेतली. यासह सपाचे फैजाबादचे उमेदवार आणि विद्यमान आमदार अवधेश प्रसाद यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष निर्मल खत्री यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली.

काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये देण्यात आलेल्या १७ जागांसाठी अद्याप उमेदवार घोषित केले नाहीत. परंतु, गेल्या आठवडाभरात बाराबंकी येथील त्यांचे संभाव्य उमेदवार तनुज पुनिया यांनी माजी राज्यमंत्री अरविंद सिंग गोपे आणि राकेश कुमार वर्मा यांसारख्या सपा नेत्यांची भेट घेतली होती. पुनिया यांनी आझाद समाज पक्षाच्या (कांशीराम) जिल्हा कार्यालयाला भेट देत, स्थानिक पदाधिकाऱ्यांशीदेखील चर्चा केली.

सपा आणि काँग्रेसच्या युतीतील समन्वय

२०१७ मध्ये सपा आणि काँग्रेसच्या युतीचा परिणाम यंदाच्या युतीत पाहायला मिळत आहे. गेल्यावेळी पक्षांना योग्य समन्वय साधता आला नाही. दोन्ही पक्षांनी अनेक मतदारसंघात एकमेकांविरुद्धच उमेदवार उभे केले; ज्याचा परिणाम निवडणुकीत दिसला. त्यामुळे यंदा कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्न करत आहेत. पुढे पक्ष कार्यकर्ते एकत्र राहतील, त्यांच्यात संभ्रम किंवा पेच निर्माण होणार नाही याची खात्रीदेखील केली जात आहे.

मात्र, अद्याप दोन्ही पक्षातील पक्षश्रेष्ठींकडून सूचना न मिळाल्याने काहीसा गोंधळ कायम आहे. “कामाच्या वाटपाबाबत संभ्रम आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना इथे काय जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील, आमच्या कार्यकर्त्यांना बूथ लेव्हल प्रतिनिधी म्हणून काम करावे लागेल की नाही हे आम्हाला माहीत नाही. आमच्या पक्षाने आमचे जिल्हाध्यक्ष आणि लोकसभा समन्वयकांना बूथ अध्यक्षांची नियुक्ती करण्यास सांगितले आहे, परंतु त्यांची कामे काय असतील किंवा ते सपा नेत्यांशी कसे समन्वय साधतील हे आम्हाला माहीत नाही”, असे आंबेडकरनगरमधील काँग्रेस नेत्याने सांगितले. या जागेसाठी सपाने लालजी वर्मा यांना उमेदवारी दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यात जबाबदारी सोपवण्यासाठी आणि मतभेद दूर करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा समावेश असणारी समन्वय समिती स्थापन करण्यात यावी, असेही काँग्रेस नेते म्हणाले.

आणखी एका काँग्रेस नेत्याने सांगितले, “आम्हाला ब्लॉक, मंडल, बूथ अध्यक्ष आणि बूथस्तरीय प्रतिनिधी नियुक्त करण्यास सांगितले आहे. पण, त्यांना संसाधनांची गरज आहे. काँग्रेस या जागेवरून लढत नसल्याने काही कार्यकर्ते निष्क्रिय झाले आहेत. सपा काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रचारासाठी संसाधन पुरवणार का? असे व्यावहारिक प्रश्न आमचे बूथ नेते विचारत आहेत. कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून त्यांना एकत्रित करणे ही दोन्ही पक्षांची जबाबदारी असली पाहिजे”, असे ते म्हणाले. पुढे त्यांनी सांगितले, “उच्च स्तरावर जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. परंतु, अद्यापही कार्यकर्त्यांमध्ये तो समन्वय नाही. यावर लवकरात लवकर तोडगा निघायला हवा, अन्यथा निवडणुकीनंतर काँग्रेसकडील मते मिळाली नाहीत, काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहकार्य केले नाही, असे आरोप केले जातील आणि काँग्रेसही सपावर असेच आरोप करेल.

काँग्रेसला हवी सपाची मदत

गोंडा येथील एका काँग्रेस नेत्याने सांगितले की, पक्षाच्या राज्यातील मुख्यालयाने राज्यभरातील त्यांच्या इंडिया आघाडीतील उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी सर्व जिल्हा युनिट्सना पत्र लिहिले आहे, परंतु सपा कुठे निवडणूक रिंगणात असेल याबद्दल काही स्पष्ट करण्यात आलेले नाही. दोन्ही पक्षांतील सूत्रांनी सांगितले की, २०१७ मध्येही असाच गोंधळ निर्माण झाला होता. “दोन वर्षांपूर्वी आम्ही येथे काँग्रेसला विरोध करत होतो. आता एकमेकांचे गुणगान गात, आघाडीच्या उमेदवाराला मत मिळवून देण्याचे आवाहन करायचे आहे”, असे बाराबंकीमधील सपा नेत्याने सांगितले. अमेठीतील सपा नेत्याने सांगितले की, “सपाच्या मदतीशिवाय काँग्रेस येथे जिंकू शकत नाही. अमेठीमध्ये तीन लाखांहून अधिक यादव मतदार आहेत. काँग्रेसला या जागेवर विजय मिळवायचा असेल तर सपा कर्यकर्त्यांनीही तितकेच प्रयत्न करणे आवश्यक आहे. राज्यातील काँग्रेसच्या रायबरेली जागेवर सपा नेत्याने आपले समर्थन दर्शवले. “आम्ही आमच्या कार्यांबाबत पक्ष श्रेष्ठींकडून येणार्‍या निर्देशांची वाट पाहत आहोत”, असे ते म्हणाले.

सपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, मतदारांना संदेश देण्यासाठी संयुक्त बैठका आयोजित कराव्या लागतील. एका काँग्रेस नेत्याने असा दावा केला की, जेव्हा आग्रा येथील भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय आणि ज्येष्ठ नेते पी. एल. पुनिया यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे निमंत्रण अखिलेश यादव यांना देण्यासाठी सपा कार्यालयात भेट दिली होती, तेव्हा समन्वय दिसून आला होता. “अखिलेश यादव यांना ईमेलद्वारे आधीच आमंत्रण पाठवण्यात आले होते. परंतु, या कृतीतून काँग्रेसने राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेला अहंकार बाजूला ठेवल्याचे दिसून आले”, असे त्यांनी सांगितले. समन्वय समित्यांची मागणी पक्षश्रेष्ठींसमोर ठेवण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : काश्मीरमध्ये लोकसभेची पहिली जागा जिंकण्यासाठी भाजपा सज्ज; पहाडी नेते मुझफ्फर बेग यांना पक्षाचा पाठिंबा मिळेल का?

काँग्रेसचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत म्हणाले की, आमच्या पुढे कोणतेही आव्हान नाही. सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. “कामगारांना एकमेकांना भेटायला पाठवले जात आहे. सध्या युतीच्या उमेदवाराच्या प्रचारावर लक्ष केंद्रित केले जात आहे,” असे ते म्हणाले. सपाचे राजेंद्र चौधरी म्हणाले, “दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये समजूतदारपणा दिसत आहे. सर्व १७ जागांवर काँग्रेस उमेदवारांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी सपा संपूर्ण निष्ठेने काम करेल. उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर उपक्रमांना वेग येईल,” असे ते म्हणाले.