Sambhaji Brigade people going to help Shiv Sena, will attend Dussehra rally at Shivaji Park ? | Loksatta

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला संभाजी ब्रिगेडची रसद ?

शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यासाठी कोणताही गाजावाजा न करता ब्रिगेडची रसद उपलब्ध करून दिली जात असल्याची जोरदार चर्चा ठाणे, डोंबिवली तसेच आसपासच्या शहरांमध्ये आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला संभाजी ब्रिगेडची रसद ?
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला संभाजी ब्रिगेडची रसद ?

जयेश सामंत

राज्यात सत्ताबदल होताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात झालेल्या युतीचा राज्याच्या राजकारणावर नेमका कोणता परिणाम दिसेल याविषयी एकीकडे तर्कवितर्क लढविले जात असतानाच बुधवारी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या बहुचर्चित दसरा मेळाव्यासाठी ‘ब्रिगेड’कडून कार्यकर्त्यांच्या गर्दीची रसद पुरविण्यात येणार असल्याचे विश्वसनिय वृत्त आहे. शिवसेना आणि ब्रिगेड यांचे सुरुवातीपासूनच वैचारिक वैमनस्य राहिल्याचे पहायला मिळाले आहे. असे असताना राज्यातील सत्ता बदलानंतर मात्र हा विरोध मावळला आणि उद्धव ठाकरे यांनी ब्रिगेडशी हातमिळवणी केल्याचे पाहायला मिळाले.

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने गर्दीचा उच्चांक कोण मोडणार शिंदे आणि ठाकरे गटात एकीकडे स्पर्धा रंगली असताना संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्तेही या मेळाव्यात सहभागी होणार या चर्चेला उधाण आले आहे. ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र असा कोणताही आदेश आम्हाला प्रदेशाध्यक्षकडून आलेला नाही, परंतु ठाकरे यांच्या मेळाव्याला शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हेही वाचा… गाडगेबाबांच्‍या दशसूत्रीची पुनर्स्‍थापना झाली. पण….

जेम्स लेन प्रकरणानंतर पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवरील हल्ल्यानंतर प्रामुख्याने प्रकाशझोतात आलेल्या संभाजी ब्रिगेडने पुढे अनेकवेळा विविध मुद्दयांवर निदर्शने केली. पुरुषोत्तम खेडेकर यांनी १ सप्टेंबर १९९० रोजी मराठा सेवा संघाची अकोल्यात स्थापना केली होती. या संस्थेच्या काही वर्षातच पुढे आणखी बरेच विभाग सुरू केले. मात्र महिलांसाठी जिजाऊ ब्रिगेड आणि तरुणांसाठी संभाजी ब्रिगेड या संस्था वेगवेगळ्या कारणामुळे नेहमीच चर्चेत राहिल्या. सुरुवातीच्या काळात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या दोन्ही संघटनांमध्ये वैचारिक मतभेद पहायला मिळाले होते. दादरस्थित असलेल्या शिवसेना भवन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वरच्या बाजूस असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र काढून टाका असा इशारा संभाजी ब्रिगेडने २०१७ मध्ये दिला होता. त्यानंतर या दोन्ही संघटनांमधील वाद विकोपाला जात असल्याचे चित्र काही काळ निर्माण झाले होते. त्यानंतर काही काळ शिवसैनिकांनी शिवसेना भवन येथे जागता पहारा दिला होता. यामध्ये दादर, माहीम भागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने होते. यापूर्वी मराठा मोर्चा बाबत ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रावरुन वाद झाला होता. नवी मुंबईतील सामनाच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी ब्रिगेडने घेतली होती.

सत्ता समीकरण बदलले आणि भूमिकाही ?

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या दोन संघटनांचा इतिहास असा परस्परविरोधी असला तरी राज्यातील नव्या राजकीय समीकरणांमुळे यामध्ये बदल घडलेला अलीकडे दिसला. ‘प्रबोधनकारांचा विचार आम्हाला आणि शिवसेनेला एकत्र आणतो’ अशी भूमिका शिवसेनेशी युती करताना ब्रिगेडने मांडली होती. उद्धव ठाकरे यांनीही संभाजी ब्रिगेडचा उल्लेख लढवय्या झुंजार संघटना असा केला होता. दरम्यान या नव्या युतीमुळे राज्याच्या राजकारणावर नेमका कोणता परिणाम होईल याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात असताना बुधवारी होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यास ब्रिगेडकडून रसद पुरवली जात असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे गटाकडून तर वांद्रे येथील बीकेसी मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्यभरातील कार्यकर्त्यांची फौज या मेळाव्यासाठी गोळा करण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू असताना भाजपच्या प्रमुख नेत्यांनी शिंदे यांच्या बीकेसी येथील दसरा मेळाव्यापासून स्वत:ला दुर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे असताना शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यासाठी कोणताही गाजावाजा न करता ब्रिगेडची रसद उपलब्ध करून दिली जात असल्याची जोरदार चर्चा ठाणे, डोंबिवली तसेच आसपासच्या शहरांमध्ये आहे. मुंबई महानगर क्षेत्राचा भाग असलेल्या ठाणे जिल्ह्यात ब्रिगेडचे कार्यकर्ते अनेकदा सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. शिवसेनेतील बंडाचा सर्वाधिक फटका शिवसेनेला ठाणे जिल्ह्यात बसला आहे. बुधवारी दुपारपासूनच शिवसेनेचे कार्यकर्ते खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेने दादरच्या दिशेने प्रयाण करणार आहेत. यावेळी ब्रिगेडची रसद मिळते का याची चाचपणी केली गेल्याचे वृत्त आहे. मुंबईतील शिवसेनेच्या गोटातही ब्रिगेडच्या मदतीची चर्चा जोर धरू लागली असून ठाकरे तसेच संभाजी ब्रिगेड या दोन्ही बाजूंनी अशा हालचालींचे वृत्त मात्र फेटाळून लावले आहे.

हेही वाचा… शाही दसऱ्याला आर्थिक मदतीद्वारे शिंदे-फडणवीस सरकारचा कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याशी राजकीय सलगीचा प्रयत्न

दसरा मेळावा हा शिवसेना पक्षाचा मेळावा आहे. या मेळाव्याला जाण्यासाठी आम्हाला प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी कोणतेही आदेश दिलेले नाहीत. परंतु शिवसेनेसोबत आमची युती असल्याने त्यांच्या दसरा मेळाव्याला आमच्या शुभेच्छा आहेत. – सुहास राणे, प्रदेश उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड

ठाणे शहरातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रंगो बापूजी गुप्ते चौक तलावपाळी येथे बुधवारी जमा होतील. त्यानंतर ते वाजत गाजत ठाणे रेल्वे स्थानकावरून दादर स्थानकावर उतरून शिवाजी पार्कवर जाणार आहेत. संभाजी ब्रिगेड ही संघटना आमच्यासोबत असल्यामुळे त्यांचे कार्यकर्तेही दसरा मेळाव्यास येणार आहेत. विचारांचे सोने लुटण्यासाठी शिवाजी पार्क येथे सर्वांच स्वागत आहे. – चिंतामणी कारखानीस, शिवसेना ठाणे जिल्हा प्रवक्ते

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
गाडगेबाबांच्‍या दशसूत्रीची पुनर्स्‍थापना झाली. पण….

संबंधित बातम्या

सोलापुरात राष्ट्रवादीच्या दोन पाटलांमधील कलगीतुरा सुरूच..
पवारांची डी.लिट. : नांदेडला देणगी तर औरंगाबादेत वादाची ठिणगी!
भाजपचा बालेकिल्ला असतानाही दोन देशमुखांमधील भांडणात सोलापूरची उपेक्षा
अमरावती पदवीधरचा गड राखण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी
‘भारत जोडो’मुळे काँग्रेसचा ‘हत्ती’ जागा झालाय, काँग्रेसने बिगरभाजप पक्षांना ठणकावले!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
सुषमा अंधारे यांचे मोठे विधान! शिंदे गटात अनेकजण नाराज असल्याचे म्हणत थेट नेत्यांची घेतली नावे, म्हणाल्या “लवकरच…”
“…तर आयुष्यभर उद्धव ठाकरेंचे पाय चेपू, त्यांनी फक्त…”, आमदार संजय गायकवाड यांचं जाहीर आव्हान!
IND vs PAK: “वर्ल्डकपवर बहिष्कार…” माजी पाकिस्तानी क्रिकेटरने रमीज राजाच्या धमकीची उडवली खिल्ली
“माझ्या मुलीला बलात्काराच्या…” अनुराग कश्यपचा जीवनातील खडतर आणि चिंताजनक प्रसंगांविषयी खुलासा
“नितू, निलू आगाऊ लेकरं,” सुषमा अंधारेंचा खोचक टोला; म्हणाल्या, “नारायण राणेंनी संस्कार…”