सांगली : सागली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीचे अद्याप चित्र स्प्ष्ट झाले नसले तरी जिल्ह्याच्या राजकीय पटलावर वर्चस्व सिध्द करण्यासाठी भाजप-महायुती व काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) हे तीनही पक्ष प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. छाननीत अर्ज अवैध ठरल्याने भाजपचे आमदार सुरेश खाडे रिंगणाबाहेर पडले असून बँकेची एकहाती सत्ता मिळवण्याच्या भाजपच्या प्रयत्नाला खीळ बसली आहे. दुसर्या बाजूला आमदार गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी अवैध ठरविण्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रयत्नही फोल ठरल्याने दोन्ही गट सध्या समदुखी असल्याचे मानले जात आहे.
राज्यात अग्रगण्य असलेल्या मोजक्या पाच बँकामध्ये सांगली जिल्हा बँकेचा समावेश आहे. सुमारे दहा हजार कोटींच्या ठेवी असलेली ही बँक शेतकर्यांची बँक म्हणून सांगितली जात असली तरी उमेदवारी दाखल करण्यासाठी झालेले शक्ती प्रदर्शन पाहता धनसत्ता ज्याच्याकडे आहे अशाच मंडळींची ही बँक असल्याचे दिसून आले. कारखाने, सूतगिरण्या, मजूर सोसायट्या या माध्यमातून मिळणारी ठेकेदारी आणि ठेकेदारीतून मिळणारी माया हे मूळ भांडवल आणि हे भांडवल अबाधित ठेवण्यासाठी बँकेच्या तिजोरीची रखवाली करण्याची जबाबदारी या मंडळींना हवी आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळासाठी खासदार विशाल पाटील, पत्नी पूजा पाटील, आई शैलजा पाटील, आ. डॉ. विश्वजित कदम, डॉ.जितेश कदम, आमदार पडळकर, आ. सत्यजित देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख व देवराज पाटील, माजी आमदार सुमनताई पाटील, महांकाली कारखान्याच्या माजी अध्यक्षा अनिता सगरे, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, माजी खासदार संजयकाका पाटील, विराज उद्योग समूहाचे विराज नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचे पुत्र रणधीर नाईक, आ.सुहास बाबर यांचे बंधू अमोल बाबर, विट्याचे माजी नगराध्यक्ष असलेले पती-पत्नी वैभव पाटील, प्रतिभा पाटील, आष्ट्याचे वैभव शिंदे, ईश्वरपूरचे अण्णा डांगे यांचे पुत्र चिमण डांगे, राहुल महाडीक आदी मातब्बर मंडळी नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या मैदानात उतरली आहेत.
बँकेची निवडणूक अविरोध करण्याचे प्रयत्न सुरू राहतील असे दिसत असले तरी या प्रयत्नांना मुख्य अडसर हा भाजपमधील महत्वकांक्षी मंडळींचा राहणार आहे. कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या याचबरोबर कोणत्या पक्षांतर्गत गटाला किती जागा द्यायच्या यावर घोडे अडणार आहे. आ. पडळकर यांना कोणत्याही स्थितीत बँकेचे संचालक व्हायचे आहे. याची तयारी त्यांनी अगोदरपासूनच सुरू केली असून जतमधील ज्या विकास सोसायटी गटातून त्यांची उमेदवारी दाखल आहे, त्या गटातील मतदान ८७ आहे. यापैकी निम्म्याहून अधिक मतांची बेजमी झाली असल्याचा दावा पडळकर समर्थकाकडून करण्यात येतो आहे. त्यांनी गेल्या दोन वर्षापासून सातत्याने आ. जयंत पाटील यांच्यावर केलेली टीका आणि जिल्हा बँकेच्या कारभारावर उपस्थित केलेले भ्रष्ट कारभाराचे आरोप पाहता त्यांचे बँकेत येणे सत्ताधारी गटाला अडचणीचे ठरू शकते. यामुळे त्यांना रोखण्याचे प्रयत्न येनकेन प्रकारे सुरू राहतील. यामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जरी अविरोध निवडीचा मार्ग करायचा म्हटला तरी ते सध्या तरी अशक्य दिसत आहे.
यावेळी आ. विश्वजित कदमयांची उमेदवारीही आश्चर्यकारक मानली जात असून बँकेचे अध्यक्ष पद काँग्रेसला हवे आहे. यामुळे निवडणूक होण्यापुर्वीच अध्यक्ष पदासाठी डॉ. कदम आणि आमदार पाटील यांचे चुलत बंधू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील असा सुप्त संघर्ष असल्याचे दिसत आहे. त्यात खासदार पाटील यांनी पत्नी पूजा पाटील यांची महिला गटातून उमेदवारी दामटली तर वेगळेच चित्र पाहण्यास मिळेल असे दिसते. सोसायटी गटातील श्रीमती पाटील यांची उमेदवारी अवैध ठरल्याने अन्य पर्याय म्हणून त्यांनाच पुन्हा मैदानात उतरावे लागणार आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक महाविकास आघाडी विरूध्द महायुती अशीच लढवली जाणार असे सध्या जरी दिसत असले तरी महायुतीतील अडचणीचे ठरू शकणारे मोहरे मतदानाच्या रणांगणात गारद करण्याची रणनीती राहील असेही दिसते. या मोहर्यात आता कुणाचा नंबर लागते हे पॅनेल निश्चितीनंतरच स्पष्ट होणार आहे.
