सांगली : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालानंतर जिल्ह्याच्या राजकारणाला आता नवी दिशा मिळण्याचे संकेत मिळत आहेत
एकहाती सत्ता असलेल्यांची चलती मोडीत काढून आमदार गोपीचंद पडळकर यांचा झालेला विजय आणि निवडणूक निकालानंतर माजी खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी व्ययत केलेली वक्तव्ये जिल्ह्याच्या एकूण राजकीय वाटचालीला नवी दिशा देणारी ठरू शकतील. याचबरोबर आज पर्यंत जयंत जनता पार्टी असे संबोधले जाणारी राजकीय सोयरीक पडळकरांसह आ. सदाभाउ खोत यांच्या जहरी टीकेच्या अग्रभागी राहण्याची चिन्हे आहेत. ही नवी राजकीय मांडणी प्रस्थापित नेत्यांना जमिनीवर आणण्यास सहायभूत ठरतील यात शंका नाही.
जिल्हा बँकेचे संचालक मंडळ अविरोध निवडण्याचे प्रयत्न उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम क्षणापर्यंत सुरू होते. १५ संचालकांची अविरोध निवड करण्यात यशही आले. या वाटाघाटीत भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, महाडिक बंधूसह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भूमिकाही महत्वाची ठरली. महाविकास आघाडीकडून स्वत: आमदार जयंत पाटील, आ. डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील हे चर्चेत सहभागी होते. या तडजोडीत पै-पाहुणे, इष्ट मित्र यांना संधी देण्यात आली. सांगलीतून पृथ्वीराज पाटील, वाळव्यातून देवराज पाटील, कडेगावमधून आ. डॉ. कदम, पलूसमधून महेंद्र लाड, खानापूरमधून अमोल बाबर, आटपाडीतून तानाजी पाटील, जतमधून माजी आमदार विक्रम सावंत यांच्या पत्नी वर्षा सावंत, शिराळ्यातून विराज नाईक,रणधीर नाईक, खासदारांच्या पत्नी पूजा पाटील, वैभव शिंदे आदी प्रस्थापित अथवा वारसदार यांना संधी देण्यात आली. इष्ट मित्रांना संधी देण्यात अडचणी निर्माण झाल्या त्या ठिकाणी म्हणजे जत, तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज या ठिकाणी निवडणूक लागली. या निवडणुकीतही आ. पडळकर, माजी खासदार पाटील, माजी मंत्री घोरप्डे हे आजपर्यतं सत्तेत अथवा सत्तेच्या परिघात असलेलेच निवडून आले.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूकच होउ नये, तडजोडीने निवडी व्हाव्यात अशी भूमिका सर्व प्रस्थापितांचीच होती. याला ना भाजप अपवाद होता, na शिवसेनसेचा, ना काँग्रेस-राष्ट्रवादीचा अपवार होता. एकमेकांच्या सोयीनुसार या निवडी करत असताना प्रस्थापितांची सद्दी राहावी अशी सूप्त इच्छा होती. यातूनच आ. पडळकर हे रिंगणाबाहेर कसे जातील यासाठी न्यायालयीन पातळीवरही लढा देण्यात आला. सहकारात पक्षिय राजकारण नको म्हणून आ. पाटील यांनी निवडणूक लागण्यापासूनच प्रयत्न सुरू ठेवले होते. यासाठी प्रसंगी दोन पावले माघार घेत मेव्हणे मनोज शिंदे यांची उमेदवारी थोपवण्यात आली. भाजपनेही स्वबळाचा नारा देत असतानाच पक्षातूनच तडजोडीसाठी प्रयत्न सुरू होते. या तडजोडीत पृथ्वीराज पाटील, राहूल महाडिक, सतीश देशमुख, अपर्णा देशमुख यांची वर्णी लावण्यात यश आले. राष्ट्रवादीकडून माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचे पुत्र रणधीर नाईक यांनाही संधी मिळाली. मात्र, या घडामोडीत भाजपने मित्र पक्षांना फारसे महत्व दिल्याचे दिसले त नाही. जनसुराज्य शक्तीचे समित कदम यांना माघार घ्यावी लागली.
तडजोडीमध्ये प्रस्थापितांना वगळून संधी देण्याची मागणी पडळकर, खोत या आमदारद्वयांनी रेटली होती. मात्र ही मागणी पुढे रेटण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील उणे पडले. जतमध्ये आ. पडळकर यांच्या विरोधात भाजपचे जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार यांचे बंधू विनोद पवार मैदानात होते. म्हणजे एकाअर्थी ही भाजपअंतर्गत लढाई होती. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आ. खोत यांनी पालकमंत्री पाटील यांच्यावरही टीका केली आहे. गावगाड्यातील सामान्य माणसाला वगळून पालकमंत्री वाड्यावरच्या आवातनांना भुलले असल्याची जहरी टीका केली आहे. यामुळे या पुढच्या काळात राजकीय सारीपाटावर होणारी मांडणी जेजीपीची की भाजपची हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
