सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून महायुती विरूध्द महाविकास आघाडी असा वरकरणी सामना दिसत असला तरी गेल्या निवडणुकीचा अनुभव पाहता पै-पाहुण्यासोबतच आप्तस्वकियांची वर्णी लावण्यासाठीच पडद्याआडचे प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुती सर्वच्या सर्व २१ जागा  लढविणार असल्याचे सांगितले असले तरी त्यांच्याच पक्षातील काही मंडळींनी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संधान साधले असल्याचे दिसत आहे. प्रस्थापितांच्या ताब्यातून बँक काढून घेण्यासाठी महायुती मैदानात उतरणार असल्याचे पालकमंत्री सांगत असले तरी त्यांच्या पक्षाकडून जे इच्छुक आहेत, त्यांना वगळून उमेदवारी देणार आहेत का हाही प्रश्‍नच आहे.

सध्या उमेदवारी दाखल करण्याची धांदल सुरू असून गुरूवारपर्यंत ही धांदल सुरू  राहणार आहे. गुरूवार दि. १ ऑक्टोंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. ५ ऑक्टोंबर रोजी छाननी झाल्यानंतर उमेदवारी अर्ज माघारीची मुदतीपर्यंत चर्चेच्या फेर्‍या या होत राहणार आहेत. अर्ज माघारीची मुदत २१ ऑक्टोंबरअखेर आहे. तोपर्यंत रूसवे-फुगवे, या गटातून की त्या गटातून हे मतांची बेरीज मारून होत राहणार आहे.

गेल्या म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने पॅनेल उभे केले होते. मात्र, सत्ताधारी पॅनेलने २१ पैकी १७ जागा जिंकल्या होत्या. यामध्ये राष्ट्रवादीच्या ९, काँग्रेसच्या ७, शिवसेनेच्या ३ जागा होत्या, तर भाजपने ४ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळच्या निवडणुकीत विकास सोसायटी गटवगळता अन्य गटात म्हणजे प्रक्रिया संस्था, महिला राखीव, भक्या विमुक्त जाती,  नागरी पतसंस्था, आर्थिक दुर्बल गटामध्ये सत्ताधारी गटाने सोयीस्कर मदत केली होती. तर ज्यांना सत्ताधारी गटाची मदत मिळाली नाही त्यांचे मताधिक्य हजारांच्या फरकात होेते. मात्र गेल्या पाच वर्षाच्या काळात सांगलीच्या आयर्विन पूलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राजकीय संदर्भ बदलले आहेत. सत्ताधारी पॅनेलमधील बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, संचालक पृथ्वीराज पाटील, चिमण डांगे ही मंडळी भाजपमध्ये प्रवेश करती झाली.

नवीन सहकार नियमानुसार दहा वर्षे एकाच सहकारी संस्थेत काम करणार्‍याला पुन्हा निवडणुक लढविता येणार नाही. यामुळे प्रस्थापित नेतेमंडळींनी पर्याय शोधला तो कुटुंबातील व्यक्तीचाच असे दिसत आहे. अध्यक्ष मानसिंगराव नाईक आपला मुलगा विराज नाईक यांना संधी देत आहेत. खासदार विशाल पाटील पत्नी पूजा पाटील अथवा मातोश्री शैलजा पाटील यांच्यासाठी प्रयत्नशील राहतील, कडेगावच्या देशमुख घराण्यातील सतीश देशमुख मजूर सहकारी संस्थेतून येउ पाहत आहेत. आमदार डॉ. कदम यांच्या घराण्यातून माजी संचालक मोहनराव कदम यांचे पुत्र शांताराम कदम अथवा नातू डॉ. जितेश कदम यांची नावे चर्चेत आहेत. आमदार जयंत पाटील हे अंतिम  क्षणी आपले चिरंजीव प्रतिक पाटील यांच्या राजकीय भवितव्यासाठी हक्काची जागा निवडतील असे दिसत आहे. म्हणजे प्रस्थापितच पुन्हा बँकेत असतील याची मात्र खात्री आहे.

दुसर्‍या बाजूला चर्चेत असलेले जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम या निवडणुकीच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. हा नवा कोरा चेहरा असेल, मात्र, आमदार गोपींचद पडळकर, आमदार सुरेश  खाडे यांनाही बँकेचे अर्थकारण जवळून अनुभवयाचे आहे. यासाठी त्यांचेही प्रयत्न असून आ. खाडे बँकेच्या निमित्ताने सूनबाई स्वाती खाडे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. म्हणजे प्रस्थापितांना हटविण्याची पालकमंत्री पाटील यांची भूमिका केवळ चेहरे बदलाचीच दिशा आहे. प्रस्थापितांच्या घराण्यातीलच चेहरे पुन्हा जिल्ह्याच्या अर्थकारणावर विराजमान होण्यास धडपडत आहेत असेच म्हणावे लागेल. या माध्यमातून केवळ मुखवटा बदलून पुन्हा तोच डाव आणि तोच खेळ, हाच आहे राजकीय खेळ असेच म्हणावे लागेल.