सांगली : महापालिका निवडणुकीमध्ये राजकीय नेत्यांनी सांगलीचे शांघाय करण्याबरोबरच शुध्द पाणी, चकचकीत रस्ते यांचे दीड दशकापुर्वी दिलेली आश्वासने स्वप्नात असताना यावेळी प्रचारादरम्यान, कोण पिंजर्‍यातील मास्तरची आठवण काढतो तर कुणी नटसम्राट नाटकातील आप्पा बेलवलकर यांंची याद मतदारांना देत आहे. स्वच्छ पाणी, सुस्थितीतील रस्ते, सामाजिक सुरक्षा या बाबींवर चर्चाच होताना दिसत नाही.

कोट्यावधीचा निधी आणल्याचा दावा करणार्‍यांनी मागील कालखंडात झालेल्या गैर व्यवहारातील ५०० कोटींच्या वसुलीचे काय झाले? वसंतदादा शेतकरी बँकेत अडकलेल्या कोट्यावधींच्या ठेवीवर बोलायला कोणी तयार नाही, विकासाची स्वप्ने मात्र तीच तीच, पहाटेच्या गुलाबी स्वप्नातील सांगितली जात आहेत.

सांगली महापालिका निवडणुकीत या वेळी इच्छुकांना एकापेक्षा अधिक राजकीय पक्षांच्या उमेदवारीचे पर्याय उपलब्ध झाल्याने अमाप उत्साह दिसून येत आहे.प्रचाराच्या कालावधीत महिलांना लाडक्या बहिणी असल्याने पुळ्यातील गणेश दर्शन, पंढरपूरचे विठ्ठल दर्शन, तुळजापूरच्या आई अंबाबाई सोबतच अक्कलकोटच्या स्वामींचे दर्शन घडविण्यात आल्याने सगळीकडे आनंदी आनंदच दिसत आहे. अशातच आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यात लक्ष्मी दर्शनाची आस लागली असून तीही काही उमेदवारांकडून पुरवली जाईल.

देवदर्शनासोबतच लक्ष्मी दर्शनाची संधीही या वेळी मतदारांना भेटणार असल्याचे दिसते. कारण शहर वासियांची सेवा करण्याची हौस राजकारण हा धंदा आणि उपजिविकेचे साधन माननार्‍यांना तीव्रतेने आहे. याचबरोबर ठेकेदारी, मटकाबुकी बरोबरच नशेचा व्यापार करणारे, भूमाफिया आणि शिक्षण संस्थाचालकही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. एक पाय या पक्षात तर दुसरा पाय दुसर्‍या पक्षात आणि डोक्यात मात्र तिसरीच जुळणी अशांना राजकीय पक्षांनी उमेदवारीही दिली आहे. यातूनच महापालिकेचे काय व्हायचं ते होईल, मात्र, शहराची स्थिती एक मोठे खेडे या दिशेने वेगाने होउ घातली आहे.

शहराचा विस्तार ११८ किलोमीटर असल्याने नागरी सुविधा पुरविण्यात अडचणी येत असल्याचा देखावा प्रशासनाकडून वारंवार केला जातो. मात्र, दरवर्षी एखाद्या रस्त्यावर होत असलेला खर्च, आणि काढली जाणारी देयके यावर वचक ठेवावा अशा व्यक्तीच राजकारणापासून अलिप्त होउ लागल्या आहेत. यामुळे शहराचा कोंडवाडा नसला तरी खेंड्याचा अवतार प्राप्त होउ लागला आहे.

सांगली, मिरज व कुपवाड या शहरातील नागरी प्रश्‍न सोडविण्याचा विचार तर दूरच राहिला, मग शहरात आयटी उद्योग कसे उभारले जाणार असा साधा प्रश्‍न विचारायची चोरी झाली आहे. कारण नेत्यांने सांगितले म्हटल्यावर हे होणारच फक्त मुदत नको अशीच अवस्था दुसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांची झाली आहे. रखडलेल्या ड्रेनेज योजना, शेरीनाला, प्रदुषित कृष्णा, महापूराचा धोका, शहरातील दिवसातून चार-चार वेळा कोलमडली जाणारी वाहतूक व्यवस्था, गल्लीबोळातील रस्ते म्हणजे हक्काचे वाहनतळ झालेले अशा प्रश्‍नांवर या निवडणुकीत चर्चा अपेक्षित असताना भलतीकडेच वळली आहे.

पिंजर्‍यातील मास्तर तमाशापासून गावचे रक्षण करण्यासाठी पुढे येतो आणि नर्तिकीच्या नादी लागून फडावर तुणतुणे हाती घेतो असा आरोप राष्ट्रवादीकडून झाला तर, भाजपकडून नटसम्राटमधील नायक आप्पा बेलवलकर कुणी पक्षात घेता का असे विचारत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांवर झाला. यात सांगलीकरांच्या हाती ना तुणतुणे, ना सुस्थितीतील घर. अखेर कशी नशिबांने थट्टा आज मांडली असेच सांगलीकरांना म्हणावे लागेल.