सांगली : शिराळा व जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार व अजित पवार या दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून तशी राजकीय मोर्चेबांधणीही करण्यात आली आहे.
राज्य पातळीवरील महायुती व महाविकास आघाडीचा खेळ स्थानिक पातळीवर अमान्य करत या दोन तालुक्यात वेगळीच मांडणी केल्याने याचे पडसाद जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर निश्चितच होणार आहेत. यामुळे राज्य स्तरावर आम्ही महायुती, महाविकास आघाडीच्या माध्यमातून ताकद दाखवू या घोषणा केवळ व्यासपीठावरून टाळ्या घेण्यासाठीच आहेत का अशी शंका येत आहे.
शिराळा नगरपंचायतीत गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची सत्ता होती. त्यांच्याकडे बहुमत आणि नगराध्यक्ष पद असले तरी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक यांच्या गटाचे सहा सदस्य सभागृहात होते. ते विरोधकांचे काम करत होते. मात्र, त्यावेळची राजकीय स्थिती आणि सद्यस्थिती यामध्ये बराच फरक पडला आहे.
विधानसभा निवडणुकीत आमदार सत्यजित देशमुख यांनी भाजपच्या उमेदवारीवर विजय मिळवला. यात त्यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक व जिल्हा बँकेचे संचालक राहलू महाडिक या महाडिक बंधूचे पाठबळ मोलाचे ठरले होते. तर माजी मंत्री नाईक यांनी भाजपमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
आता त्यांनी शरद पवार गट सोडून पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला असून त्यांना प्रदेश उपाध्यक्षपदही देण्यात आले आहे. हा पक्ष महायुतीत सहभागी असून त्यांची आणि भाजपची नाळ जुळलेली नाही. यातूनच त्यांनी पुन्हा माजी आमदार नाईक यांच्या गटाशी जुळवून घेतले असावे. अन्य तालुक्यात ते महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या मुलाखती घेत असताना त्यांचा गट मात्र शरद पवार यांच्या पक्षाशी तडजोडी करत आहे.
शिराळा मतदार संघामध्ये वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश आहे. यात खुद्द आमदार जयंत पाटील यांचे मूळ गाव कासेगावचाही समावेश आहे. या ४८ गावातील कौल शिराळा तालुक्याच्या राजकारणावर आतापर्यंत परिणाम करणारा ठरत आला आहे. आता ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांना घेरण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येत असताना शेजारी असलेल्या शिराळा तालुक्यात मात्र वेगळीच गणिते मांडली जात आहेत. हीच आघाडी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही कायम राहण्याची चिन्हे आहेत. याचे पडसाद वाळवा तालुक्यावर उमटले तर आश्चर्य वाटणार नाही.
दरम्यान, जतमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सुरेश शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष माजी आमदार विलासराव जगताप जत नगरपालिका निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. या ठिकाणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाला लगाम घालण्यासाठी हे दोन नेते एकत्र आले असले तरी काँग्रेसचे माजी आमदार तथा विद्यमान जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी एकला चलोचा नारा दिला आहे.
नगराध्यक्ष पद सोडून अन्य जागावर तडजोडीची त्यांची तयारी होती, मात्र, ही तडजोड शिंदे यांना अमान्य होती. यातूनच महाविकास आघाडीतून बाहेर पडून शिंदे यांनी जगताप यांची साथ घेण्याचा निर्णय घेतला. ते स्वत: नगराध्यक्ष पदाची निवडणूक घड्याळ चिन्हावर लढणार आहेत. तर बसपालाही सोबत घेतले जाणार आहे. यामुळे जतमध्ये भाजप, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तिरंगी लढतीचे चित्र आहे.
शिराळ्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचे संकेत मिळताच महायुतीमधून शिवसेना शिंदे गटाचे पृथ्वीसिंग नाईक यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मंत्री उदय सामंत यांनी भाजप आमदार सत्यजित देशमुख व जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या उपस्थितीत जाहीर केली.
