सांगली : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी वरकरणी लढत होत असली तरी ती प्रबळ विरोधी उमेदवाराअभावी एकतर्फी झाली आहे. या प्रबळ विरोधी उमेदवार न देण्यामागे नगरमधील प्राजक्त तनपुरे यांना मिळालेल्या भाजप उमेदवारीची पार्श्वभूमी असून यातून सहमतीचे राजकारण सुरू असल्याची चर्चा आहे.
तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटातील निवडणूक चुरशीची होईल, असा सुरुवातीपासून अंदाज वर्तवला जात होता. दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येऊन या निवडणुकीत काही तरी चमत्कार करतील, अशी जी आशा कालअखेर होती, ती आता मावळली आहे. अखेरच्या क्षणी बिनविरोध निवडणुकीचा धोका ओळखून काँग्रेसने उमेदवारी दाखल केली असली तरी तोळामासा ताकदीची काँग्रेस आणि उमेदवार या निवडणुकीत रंगत आणतील, असे सध्या तरी वाटत नाही.
सांगली व सातारा या दोन जिल्ह्यांतील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती अशा ८५३ मतदारसंख्या असलेल्या या निवडणुकीत आतापर्यंत चुरस पाहण्यास मिळाली होती. या निवडणुकीत अर्थकारणही मोठ्या प्रमाणात होत असल्याने मतदार खऱ्या अर्थाने राजा होत असल्याचे आजपर्यंतच्या राजकीय खेळीवरून वाटत होते. मात्र, भाजपने जशी उमेदवार निश्चितीची घाई टाळत अंदाज घेऊन उमेदवारी जाहीर केली, तीच पद्धत विरोधक असलेल्या महाविकास आघाडीनेही अवलंबली.
भाजपने चार नावे चर्चेत ठेवून अखेर सातारा जिल्हा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना उमेदवारी अखेरच्या क्षणी जाहीर केली. कदम हे पक्षाचे निष्ठावंत आहेत असेही नाही, त्यांनी यापूर्वी काँग्रेस, शिवसेना यांच्या उमेदवारीवर दक्षिण कराड मतदारसंघातून आपले राजकीय भवितव्य अजमावण्याचा प्रयत्न केला. उमेदवारीसाठी मंत्री जयकुमार गोरे यांनी आपले बंधू शेखर गोरे यांच्या ऐवजी कदम यांच्या नावाचा आग्रह धरला होता. तर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आपले व्याही माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यासाठी तर खा. उदयनराजे भोसले यांनी सुनील काटकर यांच्यासाठी पक्षाकडे आग्रह धरला होता.
अखेर मंत्री गोरे यांचा आग्रह कामी आला आणि कदम यांना उमेदवारीचा टीळा लागला. दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषद निवडणुकीवेळी महायुती अंतर्गत झालेल्या राजकीय खेळीमुळे महाविकास आघाडी विजयाची आस घेऊन होती. आमदार जयंत पाटील आपल्या पुत्राचे राजकीय बस्तान बसविण्यासाठी आग्रही राहतील आणि राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्यासाठी आघाडीची उमेदवारी मिळवतील अशी अपेक्षा होती, त्यांना कदाचित राजकीय गणिते जुळवताही आली असती, मात्र, त्यांनी डाव सोडण्याचा निर्णय घेतला यामागे भाचे प्राजक्त तनपुरे यांना मिळालेली भाजपची उमेदवारी हे कारण असू शकते, अशी शंका काहींना येत आहे.
निवडणूक बिनविरोध केली याचा ठपका बसायला नको म्हणून अखेर चुलत बंधूच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असल्याची चर्चा मात्र रंगतदार होत आहे. यामुळे तनपुरे यांना उमेदवारी देऊन भाजपने सांगली-साताऱ्याची जागा खिशात घातली असा अर्थ कुणी काढत असेल तर त्यात वावगे काहीच नाही असेच म्हणावे लागेल. निवडणूक अविरोध होईल ही अटकळ बांधूनच काँग्रेसनेही उमेदवारी दाखल केली आहे. मात्र, ही उमेदवारी मैदानात अखेरपर्यंत टिकेल याबाबत शंका आहे. उमेदवारी माघारीची मुदत ४ जून रोजी संपणार आहे. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी मतदारांच्या पदरात मात्र या निवडणुकीत फारसे काही पडण्याची आशा मावळली आहे.
