सांंगली : माजी उपमुख्यमंत्री आरआर आबांच्या मतदारसंघामध्ये यावेळी राष्ट्रवादीतील दोन्ही गटांतच लढतीचे संकेत मिळत असून आबांचे चिरंजीव रोहित पाटील या युवा नेतृत्वाला मतदारसंघातच अडकवून ठेवण्याची खेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून खेळली जाणार आहे. मतदारसंघातील एकूण गणिते लक्षात घेता आबांच्या पुत्रासाठी आमदारकीची वाट बिकट मानली जाते. आबांच्या पश्चात श्रीमती सुमनताई पाटील यांनी गेले एक दशक या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असले तरी पडद्याआड सर्व सुत्रे जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्याकडेच होती. आबांचे पुत्र रोहित पाटील हे राज्यभर व्यासपीठ गाजवत फिरत राहिले. मात्र, मतदारसंघात त्यांचा थेट संपर्क उणाच राहिला आहे. आता त्यांच्याशी लढत द्यायच्या तयारीत असलेले माजी खासदार संजयकाका पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांची लोकसभा निवडणुकीनंतर काहीशी पीछेहाट झाली असली तरी विधानसभेसाठी चाचपणी सुरू झाली आहे. हेही वाचा - चिपळूणमध्ये भास्कर जाधव यांच्या विरोधात कोण लढणार ? आबांचा मतदारसंघ म्हणून तासगावची ओळख राज्यभर आहे. मात्र, यापूर्वी झालेल्या काही निवडणुकांमध्ये त्यांनी आबांना रोखण्याचा केलेला प्रयत्न अल्प मतांनी अयशस्वी ठरला असला तरी तालुक्यात गट तोडीस तोड आहे हे मान्यच करावे लागेल. लोकसभा निवडणुकीमध्ये खासदारही आमचा आणि आमदारही आमचाच या दाव्यामुळे मतदारांनी पाठ फिरवली. आणि विशाल पाटील यांच्या पारड्यात मताचे दान टाकले. आता मात्र राजकीय फेरमांडणी सुरू झाली आहे. विसापूर मंडळातील २१ गावे खानापूर-आटपाडी मतदारसंघात समाविष्ट करण्यात आली. हा भाग कायम आबांच्या विरोधातच राहिला असल्याने मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर कवठेमहांकाळ तालुका या मतदारसंघाला जोडला गेला. यामुळे आबा गटाला हा मतदारसंघ सुरक्षित वाटत आला. तथापि, कवठेमहांकाळमधील माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे गटाची ताकद आहे. घोरपडे यांनी दोन वेळा कोणत्याही राजकीय पक्षाची ताकद न वापरता या मतदारसंघात यश मिळवले होते. त्यांना मिरज पूर्व भागातील गावांची साथ मिळत आली. आजही या भागात विकास आघाडीचे कट्टर कार्यकर्ते आहेत. मात्र, तासगावशी जोडले गेल्याने या ताकदीचे विभाजन झाले. याचा लाभ आबा गटाला मिळत आला. आता यावेळी आबांचे चिरंजीव रोहित पाटील हे पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुकीसाठी लोकांच्या समोर जात आहेत. मात्र, त्यांची ताकद ही केवळ आबांची पुण्याईच आहे. त्यांच्या मातोश्री या गट-तटाच्या राजकारणापासून अलिप्तच राहिल्या. गेल्या दहा वर्षांत आता आमदारकीसाठी मैदानात उतरत असलेल्या युवा नेत्याने मतदारसंघाऐवजी राज्य पातळीवरच अधिक वेळ दिला. कार्यकर्त्यांनी अडचणीच्यावेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर टाळण्याचेच अधिक प्रयत्न झाल्याचे अनेकजण सांगतात. यामुळे या मतदारसंघाला पर्याय हवा आहे. पण तो संजयकाक पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील ठरू शकतील का हा प्रश्नच आहे. हाडाचे कार्यकर्ते असले तरी विधानसभा निवडणुकीत बाजी पालटण्याइतपत सक्षम आहेत का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. संजयकाका पाटील यांचा असलेला करिष्मा लोकसभेवेळी कमी झाल्याचे दिसत असले तरी आबा गटाच्या उणिवांचा कितपत वापर होतो हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. हेही वाचा - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय यात्रांचा हंगाम सुरू आबा-काका राजकीय वादात अनेकांना संधी मिळाली नाही. राज्य पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या विभागणीचा फायदा उठवत जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रतापनाना पाटील हेही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी असलेले त्यांचे संबंध पाहता संधीही मिळण्याची चिन्हे आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला कवठ्याच्या घोरपडे सरकारनी लावलेली उपस्थितीही राजकीय मांडणी कोणत्या दिशेने आहे याचे सुतोवाच करणारी ठरली आहे. कवठ्याची ताकद ज्याच्या मागे असेल तो उमेदवार विधानसभेतील विजयाचा दावेदार ठरू शकतो. तासगाव-कवठेमहांकाळची जागा राष्ट्रवादीची असल्याने या ठिकाणी तुतारी विरुद्ध घड्याळ अशीच लढत अपेक्षित आहे. महायुतीमध्ये दादा गटाकडून ही जागा हक्काने मागून घेतली जाईल. काका गटही राजकीय अस्तित्वासाठी विधानसभेच्या मैदानात उतरला तर ही जागा भाजपला मिळणे कठीण असल्याने त्यांनाही दादा गटाच्या उमेदवारीवर विसंबून राहावे लागणार आहे. जर आबा गटाच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार समोर आलाच तर त्याला राज्य पातळीबरोबच जिल्ह्यातील आबा गटाच्या विरोधकांनाही अवकाश मिळणार आहे. लोकसभेवेळी केलेल्या मदतीची परतफेड खासदार विशाल पाटील यांना करावी लागणार आहेच, पण आमदार जयंत पाटील यांचे आणि आबांचे सख्य फारसे नव्हते. यातूनच सांगलीत भाजपला पाय पसरण्यास संधी मिळाली. यामुळे आबांचे पुत्र रोहित पाटील यांच्या आमदारकीची वाट फारशी सुरक्षित आहे असे मात्र वाटत नाही.