सांगली : मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या सांगली जिल्हा परिषदेची सत्ता भाजप कशी राखणार असा प्रश्‍न नव्याने जिल्ह्यात झालेल्या राजकीय मांडणीमुळे निर्माण झाला आहे. केंद्र व राज्य स्तरावरील सत्तेच्या जोरावर सांगली जिल्हा परिषदेची सत्ता महायुतीच्या ताब्यात येईलही मात्र ती राबवत असताना सत्तेच्या जवळ पोहचलेल्या महाविकास आघाडीच्या प्रखर मार्‍याचा सामनाही करावा लागणार आहे. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची पीछेहाट होत असल्याचे दिसून आले असून या पक्षाचे वेगाने काँग्रेसीकरण होत असल्याचेच हे निदर्शक मानावे लागेल.

जिल्हा परिषदेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला २६ जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपचे संख्याबळ १६ वर आले आहे. पलूस, कडेगाव, खानापूर, शिराळा, कवठेमहांकाळ, तासगाव या तालुक्यात भाजपला एकही जागा जिंकता आली नाही, जत व मिरज या तालुक्यानी भाजपची अब्रू वाचवली असेच म्हणावे लागेल. मित्र पक्षातील जनसुराज्य शक्तीने एक जागा जिंकली आहे, तर महायुतीत सत्तेत असलेल्या शिवसेना ठाकरे पक्षाने भाजप विरूध्द निवडणुक लढवून ७ जागा पटकावल्या आहेत. स्थानिक पातळीवरील राजकारणात होत असलेल्या कुरबुरीकडे दुर्लक्ष करणे, प्रसंगी भाजपला अनुकूल भूमिका स्वीकारणे भाजपला अडचणीचे ठरले असे म्हणावे लागेल. खानापूरमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न जनतेने उधळून लावला. नगरपालिका निवडणुकीनंतर त्यांनी खानापूर पंचायत समितीत एकहाती सत्ता मिळवलीच पण एकावर एक फ्री या तत्वाने आटपाडीमध्येही वर्चस्व स्थापन केले.

जतमध्ये मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या आघाडीला नेस्तनाबूत करत निर्विवाद वर्चस्व सिध्द केले. ९ पैकी ८ जागा जिंकत असताना जाडर बोबलादची जागा केवळ स्थानिक वर्चस्वातून तमणगोंडा रविपाटील यांनी सावित्री पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवारीवर राखली. तर कवठेमहांकाळमध्ये आमदार रोहित पाटील यांना घेरण्याचा सर्व पक्षिय प्रयत्न मतदारांनी झिडकारला आहे.

तासगाव पंचायत समिती परंपरागत आमदार गटाकडे होती. यावेळी माजी खासदार संजयकाका पाटील यांनी नगरपालिकेनंतर पंचायत समिती ताब्यात घेतली. शिराळ्यात दोन्ही नाईकांची दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने केवळ कोकरूड या विद्यमान आमदार सत्यजित देशमुख यांचा गड सोडता अन्यत्र महायुतीची जबर पीछेहाट झाली. वाळव्यात महायुतीच्या माध्यमातून आमदार जयंत पाटील विरोधक एकत्र आले असतानाही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आपले वर्चस्व राखत टायगर अभी जिंदा है चा नारा दिला.

पलूस व कडेगाव तालुक्यात आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी आपला गड अधिक मजबूत केला. दोन्ही तालुक्यातील आठही जागा काँग्रेसच्या हातात घेतल्या. कडेपूरचे देशमुख बंधू एकत्र येउन आणि कुंडलच्या शरद लाडांना सोबत घेउनही भाजपला या तालुक्यात एकही जागा जिंकता आली नाही. क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांच्या पत्नी धनश्री लाड यांचाही या ठिकाणी पराभव काँग्रेसने केला. म्हणजे लाड यांचे भाजपमध्ये जाणे मतदारांनी पसंत केले नाही का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. मिरजेत भाजपचे संख्याबळ घटले असले तरी उमेदवार निवडीत झालेल्या चुकामुळे काही जागा गमवाव्या लागल्या. याची जबाबदारी कुणाची असा प्रश्‍न नेतृत्वाला पडणार आहे का? जर पडणारच नसेल तर त्याची उत्तरे नजीकच्या काळात द्यावी लागतील.

या निवडणुकीत भाजप विरोधात सर्व विरोधात असेच चित्र होते. भाजपच्या १६ आणि जनसुराज्य व रयत क्रांती संघटनेची एक जागा असे १८ सदस्यांचे संख्याबळ महायुतीच्या पारड्यात आहे. तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे १८, काँग्रेसचे ११ आणि शिवसेना ठाकरे गटाचे १ असे संख्याबळ ३० होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ६ सदस्य आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे ७ सदस्य आहेत. या पक्षांची भूमिका सत्ता स्थापनेत महत्वाची ठरणार आहे. या दोन पक्षाकडून काय भूमिका घेतली जाते यावर पुढची रणनीती अवलंबून राहणार आहे.