सांगली : सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने सत्तांतर घडवून आणताना भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांची मदत घेतली; तसेच अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी असलेल्या मताधिक्यात वाढही केली. यानिमित्ताने आघाडीने आगामी सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था गटातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या आमदारकीच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपने या जागेवर लक्ष ठेवूनच सांगली व सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रणनीती आखली होती. मात्र, भाजपअंतर्गत निर्माण झालेल्या गटबाजीतून ही रणनीती काही प्रमाणात अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे.

सांगली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपला स्वबळावर १६ जागा मिळाल्या होत्या. गेल्या वेळी भाजपने २७ जागा जिंकून अन्य मित्रांच्या मदतीने जिल्हा परिषदेची सत्ता मिळवली होती. मात्र, गेल्या सात वर्षांत भाजपमध्ये येणार्‍यांची वृद्धी झाली. राज्यात भाजपप्रणित महायुतीची सत्ता आहे. तरीही या वेळी भाजपची पीछेहाट झाली. केवळ जनसुराज्य व रयत क्रांती संघटना हेच पक्ष सोबत राहिले. महायुतीत असलेल्या शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला सोबत राखण्यात भाजपला यश आले नाही.

गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीवेळी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्यावर जबाबदारी होती. माजी खासदार संजयकाका पाटील यांचा त्या वेळीही सवता सुभा असताना देशमुखांंनी जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या वेळी मात्र, जिल्हाध्यक्षपद सम्राट महाडिक यांच्याकडे आहे. त्यांचा वकूब केवळ शिराळा विधानसभा क्षेत्रापुरताच राहिला. ना त्यांनी जिल्हाभर दौरे केले, ना कुणाला ताकद दिली. यामुळे जिल्हाभर भाजपचे उमेदवार केवळ स्वबळावर आणि स्थानिक नेतृत्वाच्या जिवावर मैदानात उतरले. १६ पैकी ८ जागा केवळ जत तालुक्यातीलच आहेत. यामध्ये पक्ष नेतृत्वापेक्षा स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होऊ न शकल्याने फायदा भाजपला झाला.

जिल्हा परिषदेची सत्ता भाजपच्या हाती जाणार नाही, असाच निवडणूकपूर्व चक्रव्यूह विरोधकांनी रचला होता. एकमेकांना पास करत निवडणूक लढवत असताना स्थानिक पातळीवरचे मतभेद जिल्हा परिषद निवडणुकीत आड येणार नाहीत, यासाठी भलेही महायुती व महाविकास आघाडी एकत्रित असल्याचे दिसले तरी चालेल, अशीच भूमिका घेतली गेली. यामुळे खानापूर-आटपाडीमध्ये शिवसेना शिंदे गटाला, पलूस-कडेगावमध्ये काँग्रेसला, वाळव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला, तर शिराळ्यात राष्ट्रवादीच्या संयुक्त पॅनेलला मदत करण्याची भूमिका घेण्यात आली. याचा फटका भाजपला बसला.

निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (शिंंदे) या पक्षांना सोबत घेऊन महाविकास आघाडीने सत्तेचे सोपान लीलया पार केले. हक्काचे ३० सदस्य असताना सत्ताधारी गटाची संख्या सभापती निवडीवेळी ३७ पर्यंत नेली. दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना जिल्हा परिषदेतील सत्तेच्या पंगतीला एकत्र बसले आहेत. ही व्यूहरचना भेदण्याचे आव्हान यापुढील काळात भाजपसमोर आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, स्थानिक पातळीवरील नेत्यांकडून होत असलेली टीका हीच भाजपच्या हातून सत्ता निसटण्याची पहिली पायरी ठरली.

सातार्‍यात भाजपने शिवसेना शिंदे गटाला सत्तेपासून रोखले आहे, तर सांगलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने म्हणजेच आमदार जयंत पाटील यांनी आमदार डॉ. विश्‍वजित कदम, खासदार विशाल पाटील यांच्या मदतीने जुन्या सहकार्‍यांना सोबत घेत भाजपला सत्तेपासून दूर राखण्यात यश मिळवले. यापुढील निवडणुका आम्ही एकत्रितपणाने लढविणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. यामुळे सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवेळी याचा दुसरा अंक पाहण्यास मिळेल.