पुणे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ म्हणत काँग्रेसने टीका केल्यानंतर माजी खासदार संजय काकडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ‘पवार यांचा महिलांबद्दलचा आणि सुनेबद्दलचा आदर कुठे गेला?’ असे वक्तव्य काकडे यांनी केल्याने ते वादात सापडले आहेत. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष काकडे यांच्या विरोधात आक्रमक झाला आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल काँग्रेसच्या टीकेनंतर माजी खासदार संजय काकडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पत्र पाठवले आहे. शरद पवार यांनी याप्रकरणी भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. ‘महिलांबद्दलचा आणि सुनेबद्दलचा आदर कुठे गेला?’ असे वक्तव्य काकडे यांनी केल्याने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
संजय काकडे हे भाजपचे माजी खासदार आहेत. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून त्यांचे पुत्र आमदार विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळणे अशक्य असल्याचे लक्षात येताच त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे. २०१७ च्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत माजी खासदार काकडे यांच्या नेतृत्वामुळे भाजपने १०० नगरसेवकांचा आकडा पार केला होता. त्या महापालिका निवडणुकीत शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील, असे भाकीत त्यांनी केले होते. ते खरे ठरले होते. मात्र, त्यानंतरच्या काळात भाजपने काकडे यांना पक्षापासून दूर ठेवले. त्यामुळे पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला.
‘राष्ट्रवादी’कडून काकडे ‘लक्ष्य’
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने माजी खासदार संजय काकडे यांना लक्ष्य केले आहे. काकडे यांच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष श्रीकांत पाटील म्हणाले, ‘राजकारणात काही जण स्वतःच्या सावलीएवढीही उंची गाठू शकले नाहीत; पण हिमालयालाची उंची कशी वाढवायची, याचे धडे देण्याचा आव आणतात. काकडे यांचा राजकीय प्रवास हा विचारांपेक्षा सत्तेच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यावर ठरत आला. त्यांनी तत्त्वनिष्ठ नेतृत्वाला सल्ले देऊ नये. निवडणुकांपूर्वी आकड्यांची जादू दाखवणारे आणि स्वतःला भविष्यवेत्ता म्हणणरे काकडे यांचे भाजपमध्ये भवितव्य अधांतरीच ठरले.’
‘जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाचे राजकारण अजूनही देशाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची खात्री नसलेल्यांनी इतरांच्या राजकीय वारशाचे मोजमाप करण्याचा अट्टाहास करू नये,’ अशी टीका पाटील यांनी केली
‘राजकारणात उंची पदामुळे मिळत नाही, तर ती कर्तृत्व, सातत्य आणि जनमानसाच्या विश्वासाने मिळते. काकडे यांनी पात्रता नसताना असे वक्तव्य करून स्वतःचेच हास्य केले आहे. याबाबत त्यांनी माफी मागावी अन्यथा पक्षाकडून योग्य ती कार्यवाही केली जाईल,’ असा इशारा पाटील यांनी दिला.
