आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : खासदार संजय राऊत आगामी काळात ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा सनसनाटी दावा भाजपाच्या प्रवक्त्याने केला… मशाल चिन्हावर निवडून आल्यानंतर शिंदे सेनेत प्रवेश करणाऱ्या अकोल्यातील चार नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची मागणी ठाकरे गटाने केली…मंत्री झिरवाळांच्या व्हायरल व्हिडीओमागे एका माजी मंत्र्याचा हात असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला… शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाबाबत केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली… पेट्रोल-डिझेलसंदर्भात कोणीही अफवा पसरवल्यास गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
संजय राऊत ठाकरेंची साथ सोडणार?
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत धुसफूस होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे सांगितले जात आहे. राज्यसभेची जागा शरद पवार गटाला सोडण्यात आल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी एका बैठकीत तीव्र संताप व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. याच मुद्द्याला हाताशी धरून भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी एक सनसनाटी दावा केला आहे. ठाकरे गटात सध्या दुफळी माजली असून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे आगामी काळात राऊत हे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन निश्चितपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. कारण, राज्यसभेच्या खासदारकीसाठी त्यांना काँग्रेसच्या मदतीची गरज आहे, असे नवनाथ बन यांनी म्हटले आहे.
शिंदेंच्या चार शिलेदारांचे पद धोक्यात?
मशाल चिन्हावर निवडून आल्यानंतर शिंदे सेनेत प्रवेश करणाऱ्या अकोल्यातील चार नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. अकोला महापालिकेतील ठाकरे सेनेचे गटनेते विजय इंगळे यांनी त्या संदर्भातील पत्र विभागीय आयुक्तांना दिले आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत अकोल्यात ठाकरे गटाचे मनोज पाटील, सोनाली सरोदे, सागर सुभाषचंद्र भारुका, सुरेखा मंगेश काळे, अभय खुमकर आणि विजय इंगळे हे सहा नगरसेवक निवडून आले होते; पण त्यातील चार नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे सेनेत प्रवेश केला. त्याविरोधात ठाकरे गटाने थेट विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली असून पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत या चारही नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे.
आणखी वाचा : Ajit Pawar Case : झिरो एफआयआर कसा नोंदवला जातो? रोहित पवारांनी कर्नाटक पोलिसांत का नोंदवली तक्रार? कारण काय?
झिरवाळांच्या ‘त्या’ व्हिडीओमागे माजी मंत्र्याचा हात?
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांची तृतीयपंथी व्यक्तीसोबतची अश्लील चित्रफित समाज माध्यमावर व्हायरल झाली. हा प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातच घडल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून झिरवाळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टीची मागणी केली. यादरम्यान काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सूचक विधान केले. नरहरी झिरवाळांचे मंत्रिपद खाली करून घेण्यासाठी एक माजी मंत्री प्रयत्नशील असून तोच हे सगळे करत आहे. याचे कारण जागा खाली झाल्यास त्यांची मंत्रिमंडळात एन्ट्री होईल, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.
ठाकरे गटात पुन्हा फूट पडणार?
शिवसेना ठाकरे गटाच्या एका बैठकीत राज्यसभेच्या उमेदवारीवरून माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. मात्र, खासदारांच्या बैठकीत असे काही घडले नसल्याचे स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. यादरम्यान शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाबाबत केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उबाठा गटाचे खासदार कोणत्यातरी गटात विलीन होण्याची शक्यता आहे, असे मोठे विधान शिरसाट यांनी केले आहे. ठाकरे गटातील टोकाचे वाद होत असून लवकरच मोठा विस्फोट होईल, असेही त्यांनी माध्यमांना सांगितले आहे.
मंत्री गिरीश महाजन यांचा इशारा
अमेरिका-इस्रायल व इराण यांच्यातील युद्धामुळे जगभरात खनिज तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारतातील काही महत्वाच्या शहरात पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपचालकांनी जास्तीत जास्त २०० किंवा ३०० रुपयांचेच पेट्रोल देण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान पेट्रोल-डिझेलसंदर्भात अफवा पसरवल्यास गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराच मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. राज्यातील पेट्रोल पंप चालकांकडे इंधनाचा मोठा साठा आहे; परंतु मागणी अधिक वाढल्याने तुटवडा जाणवत आहे. काही समाजमाध्यमांवर अफवा पसरवत असल्याने हे सगळे घडत आहे. असा प्रकार लक्षात येताच तातडीने गुन्हा दाखल केला जाईल, असे महाजन यांनी स्पष्ट केले आहे.
