छत्रपती संभाजीनगर : निदा खान प्रकरणात मदत करणारे मतीन पटेल यांचे घर बुलडोझरने पाडण्यात आल्यानंतर या प्रकरणात ‘एमआयएम’चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची चौकशी करावी, असे पत्र पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. या पत्राची प्रत समाजमाध्यमावर टाकून जलील यांनी पुन्हा एकदा संजय शिरसाट आणि त्यांच्यावरील गैरव्यवहाराच्या आरोपांच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केले आहेत. उत्तर प्रदेशातील ‘ बुलडोझर’ न्याय छत्रपती संभाजीनगरमध्ये लावला गेल्याने नव्या संघर्षाला तोंड फुटले आहे. यात शिरसाट आणि जलील यांच्यामध्ये जुंपल्याचे चित्र दिसून येते.

‘निदा खान प्रकरणात एमआयएम पक्षाशी संबंधित काही व्यक्ती व नगरसेवक मतीन पटेल आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नावाचा उल्लेख होत असून, त्यांची विशेष पथक स्थापन करून निष्पक्ष चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी,’ असे पत्र मंत्री शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.

हे पत्र स्वत:च माध्यमांमध्ये टाकून इत्मियाज जलील यांनी शिरसाट यांचा उल्लेख वाचाळ मंत्री असा केला आहे. ते पत्राला उत्तर देताना समाजमाध्यमात लिहितात, ‘त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात आणि विट्स हॉटेलची खरेदी, गरीब दलित कुटुंबांना वाटप केलेली सरकारी जमीन मुलाच्या नावावर हस्तांतरित करणे, शेंद्रा येथील ट्रक टर्मिनससाठी राखीव असलेली औद्योगिक जमीन आरक्षण बदलून बळकावणे आणि पुन्हा तीच जमीन मुलाला वाटप करणे, आधी उद्योग सुरू करण्यासाठी आणि एकदा जमीन मिळाल्यावर तेथे आता गोदाम बांधणे, यांसारख्या इतर प्रकरणांमध्ये उच्चस्तरीय चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना आणखी एक पत्र लिहिल्यास, मी या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे.’

‘नाशिकमध्ये आणि जिल्हा न्यायालयासमोर खरेदी केलेल्या जमिनी आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावावर असलेल्या प्रचंड मालमत्ता, या सर्व गोष्टी कवडीमोल भावाने खरेदी केल्या आहेत, याचीही चौकशी व्हावी,’ असेही जलील यांनी म्हटले आहे. ‘हे सारे गुवाहटीतून आलेल्या पैशातून खरेदी केली तर नाही ना,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोझर चालविण्यापूर्वी इम्तियाज जलील यांनी त्यांच्या घराला भेट दिली होती. हे घर पाडले, तर नवे घर बांधून देण्याची जबाबदारी आमची असेल, असेही म्हटले होते. या सर्व प्रकरणात शिवसेना अधिक आक्रमक आहे, असे दर्शविण्यात शिवसेना आणि मंत्री संजय शिरसाट पुढाकार घेत आहेत. भाजपचे स्थायी समितीचे सभापतीही ते अधिक आक्रमक आहेत, असे चित्र दिसावे यासाठी प्रयत्न करत आहेत. शहरातील शिवसेनेची ताकद कमी झाल्यानंतर आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा शिवसेना आहे, असे चित्र जाणीवपूर्वक तयार केले जात असल्याची चर्चा आहे.