पंजाबच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल झाला आहे. पहिल्यांदाच आमदार झालेल्या संजीव अरोरा यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. पंजाबच्या राजभवनात आयोजित केलेल्या एका सोहळ्यात राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांच्या उपस्थितीत त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री, अनेक कॅबिनेट मंत्री, आमदार, सरकारी अधिकारी आणि आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांची उपस्थिती होती. अरोरा यांनी शपथ घेताच कॅबिनेट मंत्र्यांच्या समावेशानंतर कुलदीप धालीवाल यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आली.

कुलदीप धालीवाल यांच्याकडे असणारे एकमेव खाते नवीन मंत्र्याकडे सोपवण्यात आले. त्यांच्याकडे अनिवासी भारतीय व्यवहार खाते होते. या खात्यासह नवीन मंत्र्याला उद्योग आणि वाणिज्य खातेदेखील देण्यात आले आहे. हे खाते पूर्वी तरुणप्रीत सिंग सोंड यांच्याकडे होते. सोंड यांच्याकडे आता पर्यटन, संस्कृती व्यवहार, कामगार, आतिथ्य, ग्रामीण विकास, पंचायत ही खातीआहेत. त्यामुळे नेमका काय वाद निर्माण झाला आहे? कोण आहेत संजीव अरोरा? जाणून घेऊयात.

पंजाबच्या मंत्रिमंडळात तीन वर्षांत सातव्यांदा फेरबदल झाला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोशल मीडियावर नवीन मंत्रिमंडळाची घोषणा केली आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

नवीन मंत्रिमंडळाची घोषणा

पंजाबच्या मंत्रिमंडळात तीन वर्षांत सातव्यांदा फेरबदल झाला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोशल मीडियावर नवीन मंत्रिमंडळाची घोषणा केली आहे. “संजीव अरोरा यांच्याकडे उद्योग आणि वाणिज्य, गुंतवणूक प्रोत्साहन व अनिवासी भारतीय व्यवहार या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मला आशा आहे की, ते पंजाबमधील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील आणि राज्याचा विकास व राज्यातील तीन कोटी लोकसंख्येचे कल्याण यांसाठी प्रामाणिकपणे आणि कोणत्याही भेदभावाशिवाय काम करतील,” असे मुख्यमंत्र्यांनी ‘एक्स’वर लिहिले. संजीव अरोरा हे तीन वर्षे राज्यसभेचे सदस्य होते. २३ जून रोजी लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांना विजय मिळाला. त्यांनी काँग्रेस नेत्याचा १०,६३७ मतांनी पराभव केला. त्यांनी मंगळवारी राज्यसभेतून राजीनामा दिला.

कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धालीवाल काय म्हणाले?

कुलदीप धालीवाल म्हणाले की, त्यांना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्यास सांगितले होते आणि त्यामुळे त्यांनी लगेच राजीनामा दिला. कुलदीप धालीवाल अजनालाचे आमदार आहेत. त्यांनी पत्रकारांना सांगितले, “मानसाहेब यांनी सकाळी मला फोन केला आणि मी त्यांना भेटलो. हा मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार आहे. कदाचित हा पक्षाच्या वरिष्ठांचा निर्णय असेल. त्यांनी मला राजीनामा देण्यास सांगितले आणि मी माझा राजीनामा लगेच त्यांना सोपवला.” धालीवाल पुढे म्हणाले की, त्यांना असेही सांगण्यात आले होते की, त्यांना पक्षातील दुसरे काही कामकाज दिले जाईल. धालीवाल म्हणाले की, त्यांना कोणताही पश्चात्ताप नाही आणि पक्षाने त्यांना साडेतीन वर्षे मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली.

“मी पंचायती राज मंत्री असताना आम्ही अतिक्रमित जमिनीच्या ११,००० क्षेत्रांवर कारवाई केली. अनिवासी भारतीय व्यवहार मंत्री म्हणून मी नऊ अनिवासी भारतीयांच्या मिलन कार्यक्रमांचे आयोजन केले. मी माझ्याकडे कोणतेही मंत्रिपद असल्याशिवाय काम करून, माझी योग्यता सिद्ध करीन,” असे ते पुढे म्हणाले. काय चूक झाली, असा प्रश्न त्यांना केला असता, त्यावर केवळ मुख्यमंत्रीच बोलू शकतात, असे ते म्हणाले. ते म्हणाले, “मुख्यमंत्रीसाहेबांनी मला सांगितले की, इतरांना संधी दिली पाहिजे. मी कधीही काहीही मागितले नाही. आमच्याकडे ९५ आमदार आहेत आणि इतरांनाही संधी मिळाली पाहिजे.” परंतु, पक्षाच्या अंतर्गत अशी चर्चा आहे की,पक्षनेतृत्व विशेषतः मुख्यमंत्री त्यांच्या कामाबाबत समाधानी नव्हते. या नियुक्तींमुळे पक्षांतर्गत कलह निर्माण होण्याची शक्यतादेखील वाढली आहे.

पहिल्यांदाच आमदार झालेल्या धालीवाल यांना २१ मार्च २०२२ रोजी राज्य मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले होते. त्यांच्याकडे ग्रामीण विकास व पंचायत, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय आणि अनिवासी भारतीय व्यवहार विभाग, अशी महत्त्वाची खाती होती. जुलै २०२२ मध्ये त्यांना पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय यांच्या जागी कृषी व शेतकरी कल्याण ही खाती देण्यात आली. ३१ मे २०२३ पर्यंत त्यांनी कृषी आणि शेतकरी कल्याण या खात्याचा कार्यभार सांभाळला. त्यानंतर गुरमीत सिंग खुदियान यांच्याकडे हे खाते सोपवण्यात आले. धालीवाल यांच्याकडील ग्रामीण विकास आणि पंचायत ही खातीदेखील काढून घेण्यात आली. अखेर त्यांच्याकडे केवळ अनिवासी भारतीय व्यवहार आणि प्रशासकीय सुधारणा या खात्यांचे कामकाज होते; मात्र आता तेही कामकाज त्यांच्याकडे राहिलेले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजीव अरोरा कोण आहेत?

  • संजीव अरोरा हे लुधियाना येथील एक व्यापारी आहेत. ते १० एप्रिल २०२२ ते १ जुलै २०२५ पर्यंत राज्यसभेचे खासदार म्हणून कार्यरत होते.
  • पहिल्यांदाच खासदार झालेले अरोरा पंजाबमधून राज्यसभेवर निवडून आले आणि त्यांचा कार्यकाळ ९ एप्रिल २०२८ पर्यंत होता.
  • १ जुलै २०२५ रोजी पंजाबमधील लुधियाना पश्चिम मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकीत ते विजयी झाले.
  • त्यानंतर अरोरा यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
  • १९ जून रोजी झालेल्या लुधियाना पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीत अरोरा यांनी काँग्रेसचे उमेदवार भारत भूषण आशू यांचा १०,६३७ मतांनी पराभव केला.

अरोरा यांना ३५,१७९ मते मिळाली; तर आशू यांना २४,५४२ मते मिळाली. भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) जीवन गुप्ता यांना २०,३२३ मते मिळाली आणि शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) उमेदवार परोपकार सिंह घुमान यांना ८,२०३ मते मिळाली. अरोरा हे लुधियानातील दयानंद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे उपाध्यक्षदेखील आहेत. त्यांनी लुधियानातील सतलज क्लबचे सचिव म्हणूनही काम केले आहे. त्यांचा दरेसी येथील वेद मंदिर ट्रस्टशीही संबंध राहिला आहे.