विश्वास पवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर सत्तांतर होत शिवसेनेचे नेते व साताऱ्याचे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे हे दरे तांब (ता. महाबळेश्वर) गावचे सामान्य कुटुंबातील सुपुत्र असल्याने सातारकरांना याचा वेगळा अभिमान आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने दरे तर्फ तांब गावातील ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. फटाके आणि ढोल- ताशांच्या गजरात या छोट्याशा गावात एकनाथ शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.

दरे तर्फ तांब हे महाबळेश्वर तालुक्यात कोयनाकाठच्या परिसरातील एक छोटेसे गाव आहे. गावातील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत होते. ते मुख्यमंत्री होत असल्याचे वृत्त गावात, महाबळेश्वर,जावळी तालुक्यात धडकताच ग्रामदैवत उत्तरेश्वर मंदिर परिसरात बाल, वृद्ध, महिला, युवक यांनी एकत्र येत मोठा जल्लोष केला. गावात आज आनंदमय वातावरण आहे.

एकनाथ शिंदे शिवसेना सोडतील असे वाटत नव्हते, ते कडवे शिवसैनिक असल्याने ते हिंदुत्व सोडणार नाहीत असा आशावाद गावकऱ्यांना होता. गावच्या या पुत्राचा राजकीय प्रवास सुखकर व्हावा यासाठी गावकऱ्यांनी ग्रामदैवत उत्तरेश्वराला साकडे घातले होते. या गावालगतच्या तापोळा, वेळापूर येथील ग्रामस्थही दरे गावात जमा झाले. सर्वांनी टीव्हीवर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी एकत्रित पाहिला. दरेचे शिवसेना शाखाप्रमुख बाबुराव शिंदे, तापोळाचे सरपंच आनंद धनावडे, वेळापूरचे सरपंच राम सपकाळ आदींकडे या याचे नेतृत्व होते.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री साताऱ्यातील कराडचे यशवंतराव चव्हाण हे सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातील होते. साताऱ्याची राज्याच्या राजकारणात वेगळी ओळख राहिली आहे. यशवंतराव चव्हाण यामध्ये अग्रभागी होते. त्यांच्यानंतर बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री झाले होते. त्यांचे मूळ गाव कलेढोण (ता. खटाव) असून ते बॅरिस्टर होते. अतुलेंनी राजीनामा दिल्यानंतर अल्पकाळासाठी भोसले हे मुख्यमंत्री झाले होते. त्यांच्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारच्या काळात कराडचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यांच्यानंतर आता जावळी तालुक्यातील दरे तांबे गावचे कट्टर शिवसैनिक असलेले एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आहेत. यांच्यानंतर आता महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांबचे एकनाथ संभाजी शिंदेंच्या नेतृत्वात साताऱ्याने सर्वसामान्य कुटुंबातील चौथा मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिला आहे.

शिंदे यांचे हे मूळ गाव साताऱ्यात महाबळेश्वर तालुक्यात कोयनाकाठावर आहे. या गावात त्यांची वडिलोपार्जित शेती, घर असून चुलतभाऊ, अन्य नातेवाईक, भाऊबंद या गावात आजही राहतात. गावातील अनेक लोक उद्योग धंद्यानिमित्त मुंबईमध्ये स्थलांतरित झाले. एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय असेच ठाणे येथे स्थलांतरित झाले. मूळ दरे तांबे गावचे असलेले एकनाथ शिंदे यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satara district gives fourth chief minister to maharashtra print politics news asj
First published on: 01-07-2022 at 09:52 IST