सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड शुक्रवारी (दि. २० मार्च) होणार आहे. साताऱ्यात कोणत्याही एका पक्षाला बहुमत नसल्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी-शिवसेना असा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. साताऱ्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष कोण होणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.
जिल्हा परिषदेत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नाही. भाजपला २७, राष्ट्रवादी काँग्रेस २०, शिवसेना १५, स्वाभिमानी शेतकरी संघटना एक, अपक्ष एक आणि काँग्रेस एक असे पक्षीय बलाबल आहे. बहुमतासाठी ३३ जागांची आवश्यकता आहे. मात्र, भाजपकडे एवढे बहुमत नाही. सर्वांत मोठा पक्ष भाजप असल्याने भाजपलाच जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळावे, असा आग्रह भाजपने धरला आहे. ‘आमचे २८ सदस्य आहेत आणि आमचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होणार,’ असे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे सांगत आहेत. त्यामुळे पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांनी सावध भूमिका घेतली आहे. कोणताही धोका पत्करण्याच्या मनःस्थितीत हे तिघे नाहीत. त्यांनी पूर्वीच आपले सदस्य सहलीवर पाठवले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून एक महिना झाला, तरी अद्यापही अध्यक्षपदाचा तिढा सुटलेला नाही. पण, ‘अध्यक्षपदाचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोडवतील,’ असा विश्वास गोरे यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा परिषदेत भाजप मोठा पक्ष असला, तरी त्यांना स्पष्ट बहुमत नाही. भाजपला सहा जागा कमी आहेत. सत्तेसाठी वाटाघाटी सुरू आहेत. त्यातच फलटण येथील घडामोडीमुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे पदाधिकारी सावध झाले आहेत. ऐन वेळी फोडाफोडीचे राजकारण होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य सहलीवर गेले आहेत. जिल्हा परिषदेत भाजपचे संख्याबळ २८ च्या पुढे जात नाही. त्यांना अजून पाच सदस्यांची गरज आहे.
पुढील दीड दिवसात राजकीय घडामोडींना वेग येणार, असे दिसून येत आहे. भाजपला राजकीय जुळवाजुळवीची तयारी करावी लागली, तरी त्यातून त्यांच्या हाती कितपत यश येणार, हे निवडीच्या दिवशीच कळेल. जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींच्या निवडीमध्ये राष्ट्रवादीने भाजपबरोबर पाच पंचायत समित्यांची सत्ता मिळवली आहे. शिवसेनेने पाटण पंचायत समिती कायम राखली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत या दोन्ही पक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यात दोन मंत्री, खासदार, आमदार असूनही राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवलेले यश हे उल्लेखनीय मानले जात आहे.
निवडणुकीपूर्वी महायुती म्हणून एकत्र लढू या, असे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपला सांगितले होते. पण, भाजपने या दोन्ही पक्षांना झुलवत ठेवले. त्यानंतर आमची जिल्हा परिषद आणि सर्व पंचायत समित्यांवर सत्ता येणार आहे, त्यामुळे स्वतंत्र लढू, असे त्यांनी अंतिम क्षणी सांगितले. यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक झाली. आपापला प्रभाव असणाऱ्या ठिकाणी दोन्ही पक्षांनी उमेदवार उभे करण्याचे ठरवले. या वेळी निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेविरोधात ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी मोठी आघाडी उघडली. त्यांच्यावर; तसेच शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून अनेक आरोप-प्रत्यारोप केले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे २२, शिवसेनेकडे १५ जागा आहेत. या दोन्ही पक्षांचे मिळून बहुमत आहे. या दोन्ही पक्षांनी आपले सदस्य एक महिन्यापूर्वी सहलीवर पाठविले आहेत.
दुसरीकडे, भाजपने आमचे सर्वांत जास्त सदस्य असल्याने आमचाच अध्यक्ष होईल, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष सावध झाले आहेत. त्यांनी भाजपविरोधात शड्डू ठोकून भाजपबरोबर तडजोडीला कोणतीही जागा ठेवलेली नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचीच सत्ता येणार असे शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील सांगत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेचा तिढा तयार झाला आहे. शुक्रवारी (दि २० मार्च) होणाऱ्या अध्यक्षपद निवडीसाठी भाजपने मोर्चेबांधणी केली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) सदस्यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. ‘जे निवडणुकीत विरोधात लढले, त्यांनी आता विरोधी बाकांवरच बसावे’ अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे.
