चर्चेतील चेहरा: सत्यजित तांबे नक्की कोणाचे ? | Satyajit Tambe Role in the Election of Teachers and Graduate Constituencies of Legislative Council print politic news amy 95 | Loksatta

चर्चेतील चेहरा: सत्यजित तांबे नक्की कोणाचे ?

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने चर्चा झाली ती सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीची. नाशिक पदवीधर मतदारसंघातून ते मोठ्या मताधिक्याने निवडूनही आले.

satyajit tambe
सत्यजित तांबे

संतोष प्रधान

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने चर्चा झाली ती सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीची. नाशिक पदवीधर मतदारसंघातून ते मोठ्या मताधिक्याने निवडूनही आले. निवडून येताच त्यांनी त्यांची भूमिका जाहीर करताना यापुढे आपण अपक्ष आमदार म्हणून काम करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या एकूणच भूमिकेवरून सत्यजित तांबे यांनी काँग्रेसशी संबंध तोडून भाजपशी जवळीक साधल्याचे अधिकच अधोरेखित होत आहे.

हेही वाचा >>>रामचरितमानस वादात मायावतींची उडी, म्हणाल्या, “संविधान हाच उपेक्षितांचा ग्रंथ”, गेस्ट हाऊस प्रकरणावरून अखिलेश यादवांना टोला

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष असलेल्या सत्यजित तांबे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत कमी कालावधीत चांगला पल्ला गाठला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरलीच पण केवळ नेत्याच्या नातेवाईक नाही तर संघटनात्मक पातळीवर त्यांनी काम केले. बाळासाहेब थोरात यांच्यामुळेच अगदी लहान वयात जिल्हा परिषदेचे सदस्यत्वपद (नगर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी नाव निश्चित झाले होते पण पक्षांतर्गत गटबाजीतून मागे पडले ) त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये विविध पदे भूषवित अध्यक्षपद मिळाले. घराणेशाहीची पार्श्वभूमी असल्याने दिल्लीतील नेत्यांच्या वर्तुळात प्रवेश मिळाला. राहुल गांधी यांच्या संपर्कात आले. मराठीबरोबरच हिंदी आणि इंग्रजी भाषा अवगत, संवाद कौशल्य यातून राजकीय आलेख अल्पावधीतच वर गेला.

राजकारण्यांच्या घरात एकापेक्षा अधिक मुले, मुली, पुतणे, भाचे, नातवंडे सक्रिय असल्यावर घरातच पदांवरून स्पर्धा सुरू होते. महाराष्ट्राच्या प्रमुख घराण्यांमध्ये ही स्पर्धा बघायला मिळते. त्यातून घरातच वितुष्ट निर्माण होत जाते. राजकीय वारसदार म्हणून मुलगी की भाचा हा प्रश्न जेव्हा बाळासाहेब थोरात यांच्यासमोर उपस्थित झाला तेव्हा त्यांनी मुलीच्या पारड्यात वजन टाकले. ही बाब सत्यजित यांना खटकत होती. अन्य पक्षातील नेते अशा वेळी घरात फोडापोडी करण्याकरिता टिपूनच बसलेले असतात.

हेही वाचा >>>नागपूर: भाजपचा गड सर करणारे अडबाले यांनी दीड वर्षापासूनच केली होती तयारी

विधान परिषदेच्या शिक्षक किंवा पदवीधर मतदारसंघांमध्ये मतदार नोंदणी हा घटक फार महत्त्वाचा असतो. मतदार नोंदणी अधिक करतो त्याला यशाची खात्री असते. नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित यांचे वडिल डॉ. सुधीर तांबे होते. उमेदवारी मिळणार हे गृहित धरूनच बाळासाहेब थोरात आणि तांबे कुटुंबियांनी सारी ताकद पणाला लावली. सर्व शिक्षण संस्था, सहकारी संस्थांमधून मतदार नोंदणी करण्यात आली होती. नाशिक पदवीधरमध्ये सुमारे दोन लाख मतदार नोंदणी झाली होती. यापैकी निम्म्यांपेक्षा अधिक नोंदणी ही तांबे यांनी केली होती. यामुळेच यशाची खात्री होती.

माफीनामा चार वेळा बदलला
उमेदवारीचा घोळ झाल्यावर सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. लगेचच त्यांनी भाजपकडे आपण पाठिंब्याची अपेक्षा करणार असल्याचे जाहीर केले. तेव्हाच तांबे कोणत्या मार्गाने जाणार हे निश्चित झाले होते. त्यातच भाजपने आपल्या उमेदवाराला अधिकृत पक्ष (ए व बी फाॅर्म) दिले नाही. सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर करावा, असा काँग्रेसमध्ये मतप्र‌वाह होता. पण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाठिंबा दिला जाणार नाही, असे जाहीर केले होते. बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी चर्चा केल्यावर सत्यजित यांनी झाल्याप्रकरणी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करावी मग काँग्रेसने पाठिंबा जाहीर करण्याचा तोडगा काढण्यात आला. त्यानुसार दिलगिरीच्या पत्राचे चार नमुने दिल्लीला पाठविण्यात आले. पक्षाचे सरचिटणीस वेणूगोपाळ यांना काही केल्या माफीनामा मान्यच होत नव्हता. चार चार वेळा माफीनाम्याचा मसुदा पाठवूनही दिल्लीतील काँग्रेस नेते अडून बसले. या गोंधळात दिल्लीने आधी डॉ. सुधीर तांबे व नंतर सत्यजित यांनाच पक्षातून निलंबित केले.

हेही वाचा >>>विधान परिषदेत भाजपची आता कसोटी; विधेयके मंजूर करण्यात अडथळे

निवडून आल्यावर सत्यजित तांबे यांनी आपल्या उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात झालेल्या सर्व घडामोडी जाहीर करून एक प्रकारे पक्षाला आव्हान दिले. तसेच प्रदेशाध्यक्षांवर सारे खापर फोडले. यापुढे आपण अपक्ष आमदार म्हणून काम करणार असल्याचे जाहीर केले. यावरून सत्यजित तांबे काँग्रेसशी संबंध संपवून आडपडद्याने भाजपशी नवा घरोबा करणार हे स्पष्टच झाले. तसे सत्यजित यांनी स्वत:च सूचित केले. निवडणुकीच्या तोंडावर पुस्तक प्रकाशानाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करून त्यात फडणवीस यांनी सत्यजित यांचे केलेले कौतुक हे सारेच ठरवून झाले का, असा प्रश्न उपस्थित झाला. सत्यजित तांबे आता नेमके कोणाचे हा प्रश्न उपस्थित झाल्यावर काँग्रेसचे नक्की नाहीत हे एवढे उत्तर मात्र निश्चित झाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-02-2023 at 16:08 IST
Next Story
फडणवीस यांना नागपुरात ‘तोच’ अनुभव