“पंतप्रधानपदासाठी मायावतींचे नाव जाहीर करा”, यूपीच्या नेत्याचे विरोधकांना आवाहन; अखिलेश यादव यांच्यावर केले आरोप

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर, अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन तिसऱ्या आघाडीची तजवीज करत आहेत. त्यावर ओमप्रकाश राजभर यांनी टीका केली.

OmPrakash Rajbhar Akhilesh Yadav Mayawati PM Candidate
सुभासपा पक्षाचे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी अखिलेश यादव यांच्यावर भाजपाला मदत करण्याचा आरोप केला आहे.

Om Prakash Rajbhar on UP politics : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील राजकीय पक्षांची लगबग सुरू आहे. निवडणुकीत यश मिळविण्यासाठी अनेक पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. विरोधकांना या वेळी भाजपाचा विजयरथ रोखायचा आहे. त्यासाठी विविध प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर प्रदेशमधील ‘सुहेलदेव भारतीय समाज पक्षा’चे (सुभासप) अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी गुरुवारी (दि. ३० मार्च) सांगितले की, विरोधकांनी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून घोषित करावे. भारताला आजवर खुल्या आणि मागास प्रवर्गातले पंतप्रधान मिळाले आहेत, पण अद्याप दलित पंतप्रधान लाभलेला नाही. तसेच आपला जुना सहकारी समाजवादी पार्टीवरदेखील राजभर यांनी अनेक आरोप केले. अखिलेश यादव हे भाजपाला मदत करत आहेत. भाजपाच्या विरोधात ते बसपा, काँग्रेस आणि सुभासपसारख्या पक्षांची आघाडी का नाही करत? असाही प्रश्न राजभर यांनी उपस्थित केला.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

उत्तर प्रदेशच्या गाझीपूर जिल्ह्यातील झहुराबाद मतदारसंघाचे आमदार असलेल्या ओमप्रकाश राजभर यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले, “खुल्या प्रवर्गातील अनेक लोक पंतप्रधानपदी बसले आणि आता तर मागास प्रवर्गातील व्यक्तीकडेही पंतप्रधानपद आहे. दलित प्रवर्गातून एकही व्यक्ती पंतप्रधानपदापर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे आता विरोधक दलित चेहरा पुढे का करत नाहीत? मायावती यांच्यापेक्षा एकही मोठा दलित नेता सध्या भारतात नाही.”

हे वाचा >> बसपाचा दलित मतदार सपाकडे वळविण्यासाठी अखिलेश यादव प्रयत्नशील; संपूर्ण राज्यात साजरी करणार आंबेडकर जयंती

मायावती यांनी विरोधकांना डावलून स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत राजभर यांना विचारले असता ते म्हणाले की, विरोधकांनी स्वतःहून मायावती यांच्याकडे जाऊन त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले पाहिजे. जर विरोधक असा प्रस्ताव घेऊन जात असतील तर कोणता नेता त्यांना नाही म्हणेल? विरोधकांकडून असा प्रस्ताव का तयार केला जात नाही? असे प्रश्न राजभर यांनी उपस्थित केले.

अखिलेश यादव यांची भाजपाला मदत

ओमप्रकाश राजभर यांनी अखिलेश यादव यांच्यावर भाजपाला मदत करत असल्याचा आरोप केला. “अखिलेश यादव सीबीआय आणि ईडीच्या चौकशीला घाबरत असल्यामुळे ते भाजपाला मदत करत आहेत. अखिलेश यादव विरोधकांची तिसरी आघाडी बनविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगतात. पण ते विरोधकांच्या दुसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील का नाहीत? त्यांनी भाजपाशी समोरासमोर येऊन भिडले पाहिजे. त्यांनी ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीगाठी घेतल्या. हे तीनही नेते अखिलेश यादव यांना उत्तर प्रदेशमध्ये किती मते मिळवून देणार आहेत? यादव तिसरी आघाडी तयार करत आहेत, याचे कारण त्यांना भाजपाला मागच्या दाराने पुन्हा सत्ता मिळवून द्यायची आहे,” अशी टीका ओमप्रकाश राजभर यांनी केली.

हे ही वाचा >> लोकसभा निवडणुकीसाठी अखिलेश यादव वेगळी चूल मांडणार; काँग्रेस, बसपा नव्हे तर छोट्या पक्षांशी करणार युती!

अखिलेश यादव यांनी मागील विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेल्या आघाडीतील घटकपक्ष म्हणून राजभर यांचा सुभासप सामील होता. मात्र निवडणुकीनंतर दोघांमधले मतभेद वाढल्यानंतर दोन्ही पक्षांनी वेगळ्या वाटा धरल्या. मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुभासपला सहा विधानसभा मतदारसंघांत विजय मिळाला. अखिलेश यादव यांच्या तिसऱ्या आघाडीबाबत बोलत असताना राजभर म्हणाले, “अखिलेश यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मायावती यांची भेट घेतली पाहिजे. राहुल गांधी आणि अखिलेश यादव मागच्या काही दिवसांत जी भूमिका मांडत आहेत, त्याकडे माझे लक्ष आहे. अखिलेश म्हणाले की, काँग्रेस, बसपा आणि इतर पक्षांशी त्यांना आघाडी करायची नाही. याचा अर्थ तिसरी आघाडी निर्माण करून त्यांना भाजपाचा विजय सोपा करून द्यायचा आहे. संपूर्ण भारताला माहीत आहे की, दिल्लीच्या सत्तेचा राजमार्ग उत्तर प्रदेशमधून जातो. जर काँग्रेस कमजोर झाल्याचे अखिलेश यांना वाटत असेल तर त्यांनी बसपाशी आघाडी करायला हवी.”

आणखी वाचा >> समाजवादी पक्ष ‘अमेठी’ लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविणार; काँग्रेसशी आघाडीची शक्यता संपुष्टात?

राजभर पुढे म्हणाले, “केसीआर, लालू प्रसाद यादव, केजरीवाल आणि ममता बॅनर्जी सपाला किती जागा जिंकून देण्यात मदत करतील? शून्य. पण मायावती, काँग्रेस आणि ओमप्रकाश राजभर हे अखिलेश यांना बऱ्याच जागा जिंकून देण्यात मदत करू शकतात. मग ते आमच्याकडे का येत नाहीत? जर या पक्षांशी दुसरी आघाडी केली, तर राज्यातील ८० पैकी ५० जागा जिंकण्याची शक्यता निर्माण होते. पण तिसरी आघाडी एवढ्या जागा जिंकू शकत नाही.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 17:15 IST
Next Story
कर्नाटकमध्ये मुस्लिमांचे आरक्षण काढले, पण जैन आणि ख्रिश्चनांना मात्र राखीव जागांचा लाभ मिळणार
Exit mobile version