सत्तांतराच्या उंबरठ्यावरील दुसरे मोठे राजकीय बंड

महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून पहिले सत्तांतर १९९५ साली झाले होते.

Eknath Shinde and Uddhav Thackeray
शिवसेनेची कोंडी

संजीव कुळकर्णी

महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून पहिले सत्तांतर १९९५ साली झाले; पण राजकीय बंडाच्या माध्यमातून सत्तांतर घडवून आणण्याची पहिली नोंद शरद पवार यांच्या नावावर असून त्यानंतर तब्बल ४४ वर्षांनी राज्यात शिवसेनेतील सर्वात मोठे बंड सत्तांतर घडविण्याच्या मार्गावर आहे.

महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६० ची, तर या स्वतंत्र राज्यातील पहिली विधानसभा निवडणूक १९६२ साली घेण्यात आली. त्याची ‘साठी’ सध्या सुरू असताना हे राज्य आणखी एका राजकीय बंडामुळे सत्तांतराच्या उंबरठ्यावर आहेच; पण मागच्या बंडामध्ये त्यावेळच्या राजकीय मंचावर पुढे आलेले पवार आताच्या राजकीय पेचप्रसंगात बचाव पक्षाच्या भूमिकेत दिसत आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्या १५ वर्षांत आधी यशवंतराव चव्हाण आणि मग वसंतराव नाईक यांनी या नव्या राज्याची घडी सुनियोजितपणे बसविली. १९६२ ते १९७२ दरम्यानच्या तीन निवडणुकांत राज्यावर काँग्रेस पक्षाचे जबरदस्त प्रभुत्त्व होते. (याच काळात मुंबईमध्ये शिवसेना या संघटनेची स्थापना झाली.) पण आणीबाणीनंतर इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षात फूट पडल्यामुळे १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन जनता पक्षाविरूद्ध  दोन काँग्रेस पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. या दोन्ही पक्षांना मिळून बहुमताच्या आसपास जागा मिळाल्यामुळे नंतरच्या वाटाघाटीतून मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांचे सरकार सत्तारूढ झाले. पण काही महिन्यांतच वसंतदादांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षातील धुसफूस बाहेर आली. पक्षाच्या ३८ आमदारांना सोबत घेऊन तेव्हा शरद पवार यांनी वेगळा गट स्थापन केला आणि जनता पक्षाच्या मदतीने त्यांनी पुलोद सरकार स्थापन केले.

राजकीय बंडातून आलेले ते राज्यातील पहिले सरकार होते. त्याचवेळी ‘पाठीत खंजीर खुपसला’ या वाक्याची नोंद महाराष्ट्राच्या राजकारणात झाली. पुढे १९८० साली महाराष्ट्रात विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक जाहीर झाली तेव्हा पवारांनी इंदिरा काँग्रेस विरूद्ध आपल्या समर्थकांना उभे करून निवडणूक लढविली. त्यात त्यांच्या काँग्रेस (यू) ला विधानसभेच्या ५४ जागा मिळाल्या होत्या. त्या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा इंदिरा काँग्रेसची सत्ता आली आणि केंद्रात पंतप्रधान या नात्याने इंदिरा गांधी यांचे स्थान बळकट झालेले होते. या काळात शरद पवार हे परदेशात म्हणजे लंडनला गेलेले असताना इकडे त्यांच्या पक्षातील तब्बल ४७ आमदार इंदिरा काँग्रेस पक्षात दाखल झाले होते. महाराष्ट्राच्या राजकारणात संख्यात्मकदृष्ट्या ती सर्वांत मोठी फूट होती. या फुटीमुळे इंदिरा काँग्रेस पक्ष अधिक बळकट झाला, असे दिसते. त्यावेळच्या पक्षफुटीचा पवारांनी आपल्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मकथेत उल्लेख केला आहे.

या मोठ्या बंडामुळे पवारांना विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद गमवावे लागले होते. कमलकिशोर कदम, मालोजीराव मोगल, डॉ.पद्मसिंह पाटील व इतर तीन आमदार त्यांच्यासोबत राहिले; पण या फुटीनंतर राज्याच्या राजकारणात त्यांनी नव्याने उभारी घेतली आणि पुढे समाजवादी काँग्रेसच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय निर्माण केला. त्यातून त्यांना प्रभावी राजकीय सहकारी लाभले.शिवसेनेतील मंत्री एकनाथ शिंदे यांचे सध्याचे राजकीय बंड त्या पक्षाच्या आजवरच्या वाटचालीतील सर्वांत मोठे  ठरल्यामुळे गेले तीन दिवस शिंदे आणि त्यांच्या गटातील हालचालींना प्रसारमाध्यमांमध्ये मोठे महत्त्व मिळत आहे.

शिवसेनेत मागील काळातही छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे  यांनीही बंड पुकारले होते. पण त्या त्या काळात शिवसेना सत्तेमध्ये नव्हती, त्यामुळे त्या बंडांमधून राज्यात सत्तांतर घडले नाही. भुजबळ-राणे यांच्या बंडामुळे काँग्रेस पक्षाला बळ मिळाले. राज यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षसंघटनेची धार बोथट झाली. ही सर्व बंडखोरी बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच झाली. आता स्वतःला बाळासाहेबांचा मावळा मानणार्‍या मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही सहकारी मंत्री व आमदारांना एकत्र आणून पुकारलेल्या बंडामुळे स्वपक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या आसनालाच सुरूंग लागला आणि सरकारचे भवितव्यही धोक्यात आले. शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी सुमारे दोन तृतीयांश आमदार शिंदे यांच्यासोबत असून अन्य काही अपक्ष आमदारांनाही त्यांनी एकत्र आणले आहे. हे राजकीय बंड संख्यात्मकदृष्ट्या सर्वात मोठे ठरणार का, ते पुढील राजकीय घडामोडींमध्ये स्पष्ट होईल.

पद गेल्यानंतर मानवंदना

१९८० साली सरकार बरखास्तीमुळे मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर शरद पवारांनी रातोरात सरकारी बंगला सोडला होता. दुसर्‍या दिवशी ते आपली स्वतःची फियाट कार चालवत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेले तेव्हा प्रेक्षकांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले. ही आठवण त्यांनी आपल्या पुस्तकात नमूद केली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Second political rebel in maharshtra which my results into big political change print politics news pkd

Next Story
परभणी सेनेची ताकद असल्याने बंडाळीची परिणामकारकता शून्य;औरंगाबाद, उस्मानाबादमधील बंडाळीला स्थानिक कारणेही
फोटो गॅलरी