अकोला : पश्चिम वऱ्हाडात राजकीय घडामोडींना वेग आला असून पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. खामगाव, अकोला येथील मोठ्या नेत्यांच्या सोडचिठ्ठीमुळे काँग्रेसला मोठा फटका बसला. नेत्यांचा आता सत्ताधारी राष्ट्रवादीकडे ओढा असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार १२ जूनला अकोला आणि खामगाव दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेण्याची तयारी अनेक नेत्यांनी सुरू केली. त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकावर पडण्याची चिन्हे आहेत.
राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष कामाला लागले. वरिष्ठ नेतृत्वाकडून संघटनात्मक बांधणी केली जात आहे. पक्षांतर्गत नाराजीमुळे अनेक नेत्यांनी पक्षांतराची देखील वाट निवडली. बुलढाणा व अकोला जिल्ह्यात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. खामगावचे १५ वर्ष आमदार व ४० वर्षांपासून पक्षात कार्यरत ज्येष्ठ नेते दिलीपकुमार सानंदा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्यांना जबाबदारी दिल्या जात असल्याची नाराजी व्यक्त करून दिलीपकुमार सानंदा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला.
सानंदा यांच्या मार्गदर्शनात खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता होती. मात्र, त्यांचे खंदे समर्थक खामगाव बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे यांच्यासह चार संचालकांनी अगोदरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या इतरही अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस पक्षांतर्गत मोठी गटबाजी दिसून येते. त्यामुळेच नाराज होऊन सानंदा यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याचे बोलल्या जात आहे. खामगावमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पडले. काँग्रेसमधील नाराजीचे लोण अकोला जिल्ह्यात देखील पोहोचले. माजी महापौर मदन भरगड यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. या अगोदर त्यांनी २०१९ मध्ये बंडखोरी करून वंचितकडून विधानसभा निवडणूक लढली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापरी केली. विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, पक्ष नेतृत्वाने समजूत काढल्यानंतर भरगड यांनी माघार घेतली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
काँग्रेसचा त्याग केलेले नेते राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत. त्यासाठी १२ जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार पश्चिम वऱ्हाडाच्या दौऱ्यावर येणार आहेत. अकोला येथे आढावा व पक्षप्रवेशानंतर ते खामगाव येथे जातील. खामगावमध्ये अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांच्या उपस्थितीत माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचा राष्ट्रवादी प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती आहे. यासाठी खामगाव येथे आढावा बैठक झाली. सानंदा समर्थक काँग्रेसचे इतरही पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल होणार असल्याचे सांगण्यात येते. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मोठा झटका बसला, तर राष्ट्रवादीचे बळ वाढण्याचे संकेत आहेत.
पडझड रोखण्यात प्रदेशाध्यक्ष अपयशी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना स्वजिल्ह्यातच मोठा धक्का बसला. माजी आमदार व ज्येष्ठ नेते दिलीपकुमार सानंदा यांनी पक्षातील कार्यपद्धतीवर नाराज होऊन सोडचिठ्ठी दिली.अकोला जिल्ह्यातही अनेक जण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद आल्यानंतर या भागात पक्ष वाढण्याऐवजी नाराजी पसरली.पक्षांतर्गत पडझड रोखण्यात प्रदेशाध्यक्ष अपयशी ठरल्याची टीका होत आहे.