नांदेड : जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर आणि त्यांच्या समर्थकांचे अखेर ठरले. भाजपाकडून सतत झालेल्या उपेक्षेबद्दल वेगवेगळ्या भागातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत खतगावकर यांनी पुन्हा स्वगृही जावे आणि काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात उभारी द्यावी, अशी भावना व्यक्त केली. त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून आलेला प्रस्ताव मान्य करण्याचा ठराव शंकरनगर येथील मेळाव्यात करण्यात आला.

हेही वाचा >>> महाविकास आघाडीची १२५ जागांवर सहमती, उर्वरित मतदारसंघाबाबत चर्चा सुरु – बाळासाहेब थोरात

भास्करराव खतगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास जि.प. चे माजी अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर, बाळासाहेब पाटील कवळे, डॉ. मीनल पाटील खतगावकर, भीमराव जेठे, माधवराव सुगावकर, प्रताप पाटील जिगळेकर, गणपतराव धुपेकर, सरजीतसिंघ गिल, मसूद देसाई आळंदीकर, मंगल देशमुख, बी.पी.नरोड, राजू गंदीगुडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मागील काही दिवसांपासून खतगावकर आणि जिल्ह्यातील दोन माजी आमदारांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. खतगावकरांनी भाजपा सोडू नये, असा प्रयत्न खा. अशोक चव्हाण यांनी चालवला होता तर काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी खतगावकरांना काँग्रेस पक्षप्रवेशाचा प्रस्ताव कळविला होता. या पार्श्वभूमीवर शंकरनगर येथे नायगाव, उमरी, धर्माबाद तसेच बिलोली, देगलूर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी पार पडला. त्यात खतगावकर गटाच्या काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले. तथापि, त्यांच्यासोबत राहणारे ओमप्रकाश पोकर्णा व अविनाश घाटे हे दोन माजी आमदार मेळाव्यास हजर नव्हते.